पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सविता दामोदर

सविता दामोदर


दिल्लीत असताना अमॅच्युअर गृप हा नाट्य निर्मिती करणारा आमचा गृप होता. अविनाश केतकर आमचे गुरू आणि डायरेक्टर. कानिटकर म्हणजे शिडाचा खांब.

आम्ही सादर केलेल्या अनेक नाटकांपैकी एक 'सविता दामोदर परांजपे'. व्यवसायिक प्रयोगाच्या तोडीस तोड असा आमचा प्रयोग झाला होता. रंजना कर्णिक या गळ्यातले मंगळसूत्र काढत आणि एकदम त्यांची सर्व देहबोली बदलत असे. प्रेक्षक अक्षरशः बांधून ठेवले गेले होते. त्या प्रयोगात मध्यंतरातला बटाटेवड्याचा खप जेमतेम अर्धाच झाला होता आणि प्रेक्षक मध्यंतर संपायच्या आधीच सीटा पकडून बसले होते. मी नाटकांत बॅकग्राऊंड म्युझिक टेप वर लावत होतो.


आज सोनीवर तोच सिनेमा सुरू आहे त्यामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या.


सिनेमा आणि नाटक यात खूपच फरक आहे. ते स्वाभाविकही आहे. दोन्ही माध्यमांच्या कक्षाच वेगळ्या आहेत. स्टेज आणि पडदा हे वेगळे जग असते. प्रेक्षक 'कट्यार' किंवा 'नटसम्राट' या नाटक आणि सिनेमा यांची तुलना करतात, पण मला ते पटत नाही. अभिनय, सेट, आऊटडोअर, लायटींग सगळे सगळे वेगळे असते. ही तुलना अनाठायीच वाटते.


हौशी नाटक म्हणजे एक रात की बात. तीन महिने मेहेनत करायची ती त्या एका प्रयोगासाठी, एका रात्रीसाठी. ती एक झिंग असते. पण त्या एका रात्रीच्या आठवणी आयुष्यभर पुरतात. इथे कमावले काय आणि गमावले काय असले हिशोब कोणीच करत नाहीत.


आज सविता दामोदर बघताना डोळे स्क्रीनवर होते आणि मन मात्र 1986 मधे दिल्लीच्या रंगायतन मधे रमलेले होते. नाटक संपल्यानंतर प्रेक्षक सुन्न होऊन सीटवर बसून राहिले होते. आता माझेही तसेच झाले आहे.


अरूण गाडगीळ

13 सप्टेंबर, 2020

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू