पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कैकेयी

कैकेयी


विश्वास देशपांडे, चाळीसगाव  


रामायणात सर्वात जास्त गैरसमज आणि अन्याय कोणत्या पात्रावर  झाला  असेल, तर ते पात्र म्हणजे कैकेयीचे होय. आपण रामायणातील श्रीरामासह अनेक  महत्वाच्या पात्रांबद्दल यापूर्वीच्या लेखातून चर्चा केली आहे. परंतु कैकेयीबद्दल लिहायचे राहिले. त्यामुळे आज तिच्या व्यक्तिमत्वावर थोडा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू या. 


कैकेयीला रामायणात अन्यायी, पापी, चांडाळणी इ शब्दांनी निर्भत्सना करून श्रीरामाच्या वनवासासाठी दोषी ठरवण्यात आले आहे. पण तिला दोष देण्यापूर्वी दोन गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्यात. एक म्हणजे ती श्रीरामाची सावत्र असली तरी आई आहे. तिचे अपार प्रेम श्रीरामावर आहे. दुसरे म्हणजे तिने श्रीरामाला वनवासात पाठवणे यामागे विधिलिखित होते असे म्हणायला हरकत नाही. कारण तिने जर श्रीरामाला वनवासात पाठवले नसते, तर पुढचे रामायण घडलेच नसते. अन्यायी, अत्याचारी रावणाचा वध झालाच नसता. आणखी एक गोष्ट. श्रीराम, लक्ष्मण आणि भरत, शत्रुघ्न यासारख्या भावंडांची माता होण्याचे भाग्य लाभणे ही गोष्ट कोणत्याही पूर्वपुण्याईशिवाय शक्य नाही. 


कैकेयी ही केकय देशाची राजकुमारी. म्हणून तिचे नाव कैकेयी. तिच्या वडिलांचे नाव अश्वपती. कैकेयी ही सात भावांची एकटीच बहीण होती. त्यामुळे अश्वपतीचे ते अतिशय लाडाचे अपत्य होते. दिसायला खूप सुंदर होती. युद्धकलेत निपुण होती. दुसरे म्हणजे तिला आपल्या आईचे प्रेम फारसे लाभले नाही. कारण अश्वपतीने तिच्या आईला काही कारणासाठी घरातून घालवून दिले होते. या सगळ्या गोष्टीमुळे तिचा स्वभाव थोडा अहंकारी, आपल्या तंत्राने वागणारी आणि हट्टी असा झाला होता. शिवाय नंतर ती दशरथ राजाची दुसरी राणी झाली. त्यावेळी तिचे वय अतिशय कमी होते. दशरथाचे वय त्यामानाने बरेच जास्त होते. त्यामुळे साहजिकच ती दाशरथाची लाडकी पट्टराणी झाली. त्यामुळे तिच्या मूळच्या  गर्विष्ठ आणि हट्टी असलेल्या  स्वभावाला आणखीनच खतपाणी मिळाले. 


आता तिचा विवाह दशरथ राजाशी कसा झाला हे पाहू. त्याकाळात दशरथ हा भरतखंडातल्या महान राजांपैकी एक होता. त्याला आपल्या राज्यात येण्यासाठी अश्वपतीने म्हणजेच कैकेयीच्या वडिलांनी आमंत्रित केले होते. दशरथ राजा त्यांच्याकडे आल्यानंतर साहजिकच तो खूप राजा असल्याने त्याचे खूप मोठ्या प्रमाणात आणि थाटामाटात स्वागत झाले. अश्वपतीच्या राजप्रासादातच तो उतरला . त्यावेळी त्याची सरबराई स्वतः कैकयीने केली. त्याचवेळी ही अतिशय अल्लड, चंचल आणि सुंदर असलेली राजकुमारी दशरथाच्या नजरेत भरली. त्याने अश्वपती राजाकडे तिची पत्नी म्हणून मागणी केली. त्यावेळी अश्वपतीने दशरथाला एक अट घातली. ती म्हणजे कैकेयीच्या मुलाला राजा करण्याची. तोपर्यंत दशरथाची पहिली राणी कौसल्या हिच्यापासून त्याला काही अपत्य नव्हते. त्यामुळे त्याने अश्वपतीला हे वचन सहज देऊन टाकले. हे वचन देताना त्याने फारसा विचार केला नाही. ही गोष्ट आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसते. म्हणजे दशरथाने पुढे कैकेयीला जे दोन वर दिले होते, त्यापूर्वीच हे वचन त्याने तिच्या पित्याला सुद्धा दिले होते. आणि ही गोष्ट खुद्द कैकेयीला सुद्धा माहिती नव्हती. 


पुढे लग्न होऊन आल्यानंतर तर दशरथ राजाची ती लाडकी पट्टराणी बनली. दशरथ राजा तिचे इतके ऐकत असे की कोणाला एखादे काम दशरथाकडून करून घ्यायचे असेल तर ते आधी कैकेयीला सांगत. तिने एखादी गोष्ट दशरथाला सांगितली की ती हमखास झालीच म्हणून समजा . पुढे इंद्राने शंबरासुर राक्षसाशी लढताना दशरथ राजाची मदत मागितली. त्यावेळी कैकेयी देखील आपल्याला युद्धात सोबत घेऊन चला असे दशरथाच्या मागे लागली. दशरथ राजाने युद्धाला जाताना तिला सोबत घेतले. शंबरासुर हा अतिशय शक्तिमान होता. तो इंद्राला देखील आवरत नव्हता. त्याने दशरथावर सुद्धा हल्ला चढवला. त्याचा बाण लागून दशरथाच्या रथाचा सारथी गतप्राण झाला. तेव्हा कैकेयीने दशरथाच्या रथाचे सारथ्य केले. दशरथाला देखील तो आवरेना. अशातच त्याच्या रथाचे चाक जमिनीत रुतले. कैकेयीने खाली उतरून ते खड्ड्यातून बाहेर काढले. युद्धात दशरथ जखमी झाला होता. अशा वेळी कैकेयीने शंबरासुराशी दोन हात केले. तिचे युद्धसामर्थ्य पाहून खुद्द शंबरासुर देखील भयभीत झाला आणि रणांगणातून पळाला. अशा रीतीने कैकेयीने दशरथाचे प्राण वाचवले. त्यामुळे प्रसन्न होऊन दशरथाने तिला दोन वर माग असे म्हटले. ते त्यावेळी तिने मागितले नाहीत. 


पुढे दशरथाने पुत्रकामेष्टी यज्ञ केला. आणि त्याला श्रीरामासह चार दिव्य असे सुपुत्र प्राप्त झाले. कैकेयीचे एक आई म्हणून सर्वांवर अतिशय प्रेम होते. श्रीराम तिचा अतिशय लाडका. त्याच्या आनंदाने ती आनंदी होई. जेव्हा श्रीरामाला राज्याभिषेक होणार ही वार्ता तिला कळली, तेव्हा तिला कोण आनंद झाला ! ती अशा रीतीने आनंदाच्या शिखरावर विराजमान असताना, मंथरा दासीने तिचा हा आनंद क्षणभंगुर ठरवला. मंथरा ही तिची आईसारखी काळजी घेणारी दासी तिच्या सोबत केकय देशातून म्हणजेच कैकेयीच्या माहेराहून तिच्यासोबत लग्नानंतर अयोध्येला आली होती. तिने सांगितले की दशरथाने तुझ्या वडिलांना तुझ्या मुलाला राजा करीन असे वचन दिले होते. ते विसरलीस का ? राजाची लाडकी राणी होण्यापेक्षा राजमाता होणे ही किती मोठी आणि भाग्याची गोष्ट आहे हे कैकेयीला पटवण्यात मंथरा यशस्वी झाली आणि मग कैकेयीने दशरथाकडे ते दोन वर कसे मागून घेतले आणि पुढचे रामायण कसे घडले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 


हे सगळे वाचताना दोन गोष्टी लक्षात येतात. पहिली म्हणजे कैकेयी ही कावेबाज, धूर्त किंवा पाताळयंत्री नव्हती. तिला आपल्या वडिलांनी दशरथाला दिलेल्या वचनाची सुद्धा माहिती नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजे श्रीरामाला राजा करण्याचे बहुमताने ठरल्यावर तिला ती गोष्ट कळली. तोपर्यंत तिला त्याबद्दल काहीही माहिती नव्हती. ती जर कटकारस्थानी असती तर रामाला राज्याभिषेक होण्याचा हा निर्णय होण्यापूर्वीच तो रोखला असता. या सगळ्या गोष्टी तिच्या निष्पाप मनाची साक्ष देतात. मंथरेचं ऐकून ती बिथरले आणि दशरथाकडून आपले वर मागून घेते ही गोष्ट चुकीची असली तरी तिच्या स्त्रीसुलभ स्वभावाची निदर्शक आहे. 


पुढे भरत आपल्या मामाकडून परत आल्यानंतर त्याला जेव्हा हे कळते की श्रीरामाच्या वनवासाला आपली आई कारणीभूत आहे, तेव्हा तो अत्यंत कठोर शब्दात तिची निर्भत्सना करतो. त्यावेळी कैकेयीला आपली चूक लक्षात येते. ती आपली चूक कबूल करते एवढेच नव्हे तर श्रीरामाला अयोध्येला परत आणण्यासाठी भरतासह जे प्रजाजन अरण्यात जाणार असतात, त्या सगळ्यांच्या आधी ती श्रीरामाला परत आणण्यासाठी रथात जाऊन बसते. एवढी ती सरळ मनाची आणि आपली चूक स्वीकारणारी आहे. या सगळ्यात आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती ही की श्रीराम तिला आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आई म्हणून प्रेमानेच वागवतात. त्यांच्या मनात तिच्याबद्दल प्रेम आणि आदरच आहे. श्रीरामाच्या मनाचा हा किती मोठेपणा आहे ! आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळणारा, त्यासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करणारा, कोणत्याही प्रसंगात आपल्या मनाची शांती न ढळू देणारा श्रीराम म्हणूनच आपला आदर्श आहे. 


©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव


प्रतिक्रियेसाठी क्र ९४०३७४९९३२


( कृपया लेख नावासहित शेअर करावा. )

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू