बदल : सुव्यवस्थेचा गाभा
शाॅपिझन व महाराष्ट्राची साहित्यगाथा समूह आयोजित
निबंध स्पर्धा
विषय - *समजा तुम्हाला आपल्या देशात काही बदलता आले तर तुम्ही काय बदलाल, का बदलाल आणि कसे बदलाल?*
अनंततेचे गहन सरोवर
त्यात कडेला विश्वकमल हे,
फूल सनातन.....
त्या कमलाच्या एक दलावर
पडले आहे थोडे गहिवर
थरथरणाऱ्या या थेंबाला
पृथ्वीवरचे आम्ही मानव,
म्हणतो जीवन....
अशी जीवनाची फार सुंदर व्याख्या आहे. मानवी जीवनाला कटिबद्ध व सुशोभित बनवण्याचे काम 'नियम' करत असतात.. मग ते नियम स्वतःच्या शिस्तीसाठी असो किंवा देशाच्या भविष्यासाठी.. मात्र जेव्हा हेच नियम देशाच्या विकासासाठी, देशाच्या सुयोग्य कारभारासाठी नियोजित केले जातात तेव्हा ती जबाबदारी बनते कारण त्यावर संपूर्ण देशातील नागरिकांचे भविष्य अवलंबून असते. आणि याच नियमांना अनुसरून जर मला देशात बदल करण्याची संधी मिळाली तर निश्चितच स्त्री - पुरुष समानता या धोरणावर मोठया प्रमाणावर लक्ष केंद्रित करून देशातील प्रत्येक स्त्रीला तिचे अधिकार मिळवून देण्याबाबतच्या संबंधित विविध कायद्यांमध्ये बदल करेल.
'स्त्री - पुरुष समानता' या विषयाकडे, या मुद्द्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वप्रथम बदलणे अत्यंत गरजेचे आहे असे मला मनापासून वाटते... कारण स्त्री - पुरुष समानता म्हणजे स्त्रियांची हुकुमशाही किंवा पुरुषांची हुकुमशाही नसून स्त्री व पुरुष या दोघांनीही स्वतःची जबाबदारी जाणून घेऊन एकमेकांच्या गरजा भागवण्यासाठी सलोख्याने कार्य करून प्रगती साधली पाहिजे. हीच खरी स्त्री - पुरुष समानता होय. खरंतर स्त्री - पुरुष समानता या विषयासंदर्भात एखादी व्याख्या करणे खूप अवघड आहे कारण नुसत्या एका नियमाच्या चौकटीत बसणारा हा विषय नाही. ह्या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यामुळे बदल घडवून आणतांना सामान्य जीवनाचा निश्चितच विचार करावा लागेल असे मला वाटते...
स्त्री - पुरुष समानतेबद्दल अनेकवेळा युध्दपातळीवर प्रयत्न केले जातात. मात्र मला असे वाटते की, जागतिक पातळी किंवा देश पातळी नव्हे तर प्रत्येक घराघरातून स्त्री - पुरुष असमानता / भेदभाव याला खरी सुरुवात होते. स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच प्रत्येक क्षेत्रात समान संधी मिळण्यासाठी फक्त कायदा व सुव्यवस्थेत बदल घडवून फायदा होणार नाही. तर माणसाच्या विचारसरणीत बदल घडवून आणला पाहिजे असे मला वाटते.. कारण आज स्त्रियांना स्वतःचे स्वातंत्र्य जपण्यासाठी विविध कायदे आहेत, परंतु तरीही आज समाजात आपण हुंडाबळी, महिला अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार या सारख्या घटना वारंवार वाढत चालल्या आहेत. ही अतिशय खंत वाटणारी गोष्ट आहे... हे सर्व पाहून आपण खरोखरच विज्ञान युगात जगत आहोत का? असा प्रश्न मला पडतो.
आजच्या युगात स्त्री - पुरुष समानता, स्त्री स्वातंत्र्य हे सर्व फक्त भाषणाचे आणि वाचनाचे विषय झाले आहेत. त्यामुळे सर्वप्रथम वास्तविक जीवनात यांची अंमलबजावणी करण्याचा बदल प्रत्येकाने केला पाहिजे. अनेक वेळा "ती चा उंबरठा...." असे विषय आपण ऐकतो. या विषयाकडे अगदी खोलवर जाऊन पाहिलं तर असं समजतं की विषयात ती च्या पुढे उंबरठा आहे, म्हणजेच वास्तविक आयुष्यात सुद्धा स्त्रियांच्या पुढे अनेक अनिष्ट रूढी परंपरांचे , अंधश्रद्धांचे उंबरठे आहेत. ते नष्ट करण्याचा सर्वात मोठा बदल करणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळा कायदा व सुव्यवस्थेच्या सर्व चौकटी ओलांडून माणसाची क्रूर मानसिकता महिला अत्याचारासारख्या घटनांची संख्या वाढवतांना दिसते. त्यामुळे मानसिकतेत बदल करणे महत्त्वाचे आहे. विचारपद्धतीत बदल करणे जास्त महत्वाचे आहे कारण कुठलेही राष्ट्र प्रसिद्धी, आर्थिक संपदा यावर विकसित होत नसून तेथील माणसांच्या विचार पातळीने विकसित होत असते.
पुरुषांबरोबरच महिलांनीसुद्धा आपल्या विचारांमध्ये बदल करणे गरजेचे आहे कारण असंख्य वेळा सासू सुनेचा छळ करते, आई मुलीला अनिष्ट बंधने घालते असे प्रसंग दिसून येतात. आणि मग यावरून प्रश्न पडतो की एक स्त्रीच स्त्रीला अधिकारापासून अडवत आहे का? हा बदल करणे सुद्धा आवश्यक आहे. काव्य ओळींच्या माध्यमातून मला हे स्पष्ट करावेसे वाटते.. जसे की,
लेक सौंदर्याचा लेप नाही तर ,
अवकाशाची झेप.....
लेक माहेर सासरचं आंदण नाही तर,
यशाचं लखलखतं प्रांगण....
लेक उंबरठ्याचं गाऱ्हाणं नाही तर,
जिद्दीचे प्रखर आव्हान....
या काव्य ओळींप्रमाणेच बदल करणे करणे गरजेचे आहे.
इतिहासातील स्त्री आणि आजची स्त्री यामध्ये फार मोठा फरक जाणवतो... हे का? स्वराज्य जननी जिजामाता, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डाॅ.आनंदीबाई जोशी, अहिल्याबाई होळकर, पंडिता रमाबाई, कल्पना चावला या सगळ्यांचे विचार कधी आपण आत्मसात करणार??? या सर्व स्त्रियांनी अन्यायाच्या, रूढी व परंपरांचे सर्व उंबरठे पार करून स्त्री- पुरुष समानतेचा पाया रोवला आहे. आणि हीच संस्कारांची शिदोरी पुढे अविरत नेणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच ' 'आत्मविश्वास' कायम ह्रदयात ठेवण्याचा सर्वात मोठा बदल करूया आणि स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करूया. शेवटी मी एवढेच म्हणेन,.....
देशाच्या प्रगतीसाठी
स्त्री शक्तीचा जागर पाहिजे,
इथल्या घराघरात पुन्हा एकदा
जिजाऊ सावित्रीचा आविष्कार पाहिजे...
लेखन - कु.नेहल जोशी
