पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

काही तरी छान


प्रिया- "अगं आई, असं काही तरी छान खावंसं वाटतंय"


आई- "काही तरी आणि छान म्हणजे नेमकं काय"


प्रिया- "अगं ते मला नाही माहीत, पण कर ना काही तरी छान असं"


आई- "हे बघ मला काय ते स्पष्ट सांग, तुझी छान ची व्याख्या आणि आमची छान ची व्याख्या वेगळी आहे"


प्रिया- "हा...झालं? हे असंच असतं तुमचं, शब्दात अडकवायंच"


आई- (हसून)" अगं मग हे खरंच आहे,नाही का?"


प्रिया- "नाही"


आई- "नाही?"


प्रिया- "हो , असं काहीही नाहीये"


आई- "बरं, मग काय करू खायला, मस्त पोहे करू का?"


प्रिया- "छे छे कालच तर झाले"


आई- "अगं काल कांदे पोहे झाले ना, आज दडपे पोहे करू"


प्रिया- "आई काय गं"


आई- "बरं बाई,  मग उपिट करू का?"


प्रिया- "नको गं ते, तू रवा भाजणार मग मला च कांदा चिरून द्यायला हवा, वेळ पण जाईल त्यात, नकोच ते"


आई- "अगं मी करते सगळं, पण चालेल का सांग"


प्रिया- "नाही कशाला तुला एवढे कष्ट, मला काही तितकासा आवडत नाही उपमा"


आई- "हा , मग हे सांग! तुला करायला लागेल हे नको"


प्रिया- "आई, पण काही तरी चांगलं कर ना,  भूक लागलीय"


आई- "काही तरी चांगलं असा पदार्थ कुठे असतो का?मला माहिती करून घेतला पाहिजे"


प्रिया- "आई काय गं , मस्करी कसली करतेस?"


आई- "बरं, धिरडी घालु का?"


प्रिया- "नाही , आज धिरडी खायचा मूड नाहीये"


आई- "मग फ्राईड राईस?"


प्रिया- "भाज्या नाहीयेत ना? आणि भाज्यांशिवाय फार काही चव नाही त्याला"


आई- "मग भाज्या घेऊन ये ना नाक्यावर जाऊन, दहा मिनिटात आणशील"


प्रिया- "नको गं आई, आता म्हणजे घरचा ड्रेस बदलून दुसरे चांगले कपडे हवे घालायला, नकोच तो"


आई- "मग काय? आता?"


प्रिया- "पण मला काही तरी छान असं वेगळंच खायचंय"


आई- "वेगळंच म्हणजे नाव सांग काय ते"


प्रिया- "आई काय गं तू, चांगलं काही सुचवत पण नाहीस आणि मला नेहमीच असं नाहीच खायचं काही"


आई- "मॅगी करू का?"


प्रिया- "आई मॅगी कुठे वेगळी आहे? दोन दिवसांपूर्वी च खाल्ली"


आई- "मग आता मी काय म्हणते वेगळं अस पिठलं भात करूया आपण"


प्रिया- "आsssssssssssssssssईsssss! खरंच? पिठलं? पिठलं भात? चांगलं म्हटलं मी चांगलं"


आई- "अगं पिठलं भातासारखं सुख नाही सांगते मी तुला"


प्रिया- "आई मला असलं सुख नकोय"


आई- "मग ? काय हवंय काय मग तुला?" 'चांगलं','छान','काहीतरी वेगळं', हे असले पदार्थ मी काही ऐकलेले नाहीत.


प्रिया- "हे असंच असत आई तुझं, टोमणे च मारतेस तू मला.मला वाटलं तुझ्याकडे जरा ऑपशन्स असतील खाण्याचे, पण नाहीच"


आई- "माझं काय हॉटेल आहे ऑपशन द्यायला?"


प्रिया- "पण मी खादाड खाऊ आहे ना"


आई- "खाबू आहेस खाबू"


प्रिया- "आई खवय्यी असा निरागस आणि लोभस शब्द आहे खाण्याची आवड असलेल्याला. खाबू म्हणे हुह!"


आई- "हो? मग बरं ना आज तू थोडे टोमणे च खा. अतिशय वेगळे असे जिलेबी फाफडयासारखे, छान अशा सुरळी वडी सारखे, चांगले फुगलेल्या इडल्यांसारखे , झणझणीत मिसळीसारखे, कुरकुरीत कांदा भजीसारखे, चमचमीत पाव भाजीसारखे, नाका तोंडाने पाणी येईल अशा गरम मसाल्याच्या आमटी सारखे, चटकदार पाणी-पू..."


प्रिया- "अगं अगं अगं ...आई!थांब थांब थांब!"


आई- "का आता का?"


प्रिया- "आता का काय? केवढी भारी भारी नावं घेतलीस. पण हे सगळं करायला खूप वेळ लागतो. मला आत्ता हवंय काही तरी चविष्ट आणि छान"


आई- "परत तेच! कठीण आहे या मुलीचं"


प्रिया- "आई....अगं ऐक ना.."


आई- "काही ऐकायचं नाहीये. बास झालं. ऐकायला लागलं की जास्तच होतं तुझं"


प्रिया- "हुह! तुम्हाला ना असं काही तरी छान, युनिक असं सुचतच नाहीये. सारखी धिरडी, पोहे खाऊन कंटाळा आला हा मला."


आई- "माणसांचा पण कंटाळा आलाय असं म्हटलं तर चालेल?"


प्रिया- "काहीही हा आई"


आई- "हो मी असं म्हटलं; मला पण कंटाळा आलाय तुझा तर?"


प्रिया- "हॉsssहॉssssहॉssss....असं बोलतात का मुलीला"


आई- "हा मग? मला कसं बोलतेयस? तुला सांगितलं स्पष्ट सांग काय करू ते तर सगळा वेळ खाल्लास माझा. बरं खाल्लास तो खाल्लास तरी भूक आहेच अजून तुला"


प्रिया- "आई...काय गम्मत करतेस माझी? वेळ खाऊन पोट भरत का?"


आई- "मग हे कळतंय ना तुला? मग मी सुचवते त्याला तरी हो म्हण नाही तर तू तरी सुचव. मला बाकीची पण कामं आहेत."


प्रिया- ".....पण आई.....मला ना काही तरी वेगळंच खायचंय. असं काही तरी की जे मी कधीच खाल्लं नाहीये."


आई- "बघ ना इंटरनेट वर वगैरे काही तरी मिळेल तुला हवं तसं, ते करु आपण"


प्रिया- "बघितलं गं, तिथे तेच आहे सगळं. मला काही तरी छान हवंय"


(आईला समजून चुकलं. ही असाच वेळ घालवणार इथे विचार करत बसून आणि आपली पण काही कामं होणार नाहीत.)


आई- "माझ्याकडे एक उपाय आहे."


प्रिया- "उपाय काय? पदार्थ सुचव"


आई- "पदार्थचं आहे. अतिशय चविष्ट, वेगळा, छान आणि खातच राहावा असा"


प्रिया- "वा! सांग ना पटकन काय ते"


आई- " हो धीराने जरा. ते काय आहे, त्याची काही शास्त्र आहेत. त्याला म्हणजे एक खमकी बाई लागते, तिच्या हातात ताकद असावी लागते, चेहऱ्यावर पदार्थानुसार भाव आणावे लागतात, हातात बांगड्या असतील तर त्या घट्ट अशा मागे सरकवाव्या लागतात;जेणेकरून पदार्थ करताना मध्ये येणार नाहीत, थोडा धावण्याचा सराव लागतो आणि मन घट्ट करावं लागतं."


प्रिया- "आई काय बोलतेयस? असा कसा असेल पदार्थ?"


आई- "हो मग आहे असा पदार्थ, आणि तुला हवा तसा आहे चविष्ट."


प्रिया- "हो? मग काय लागतं साहित्य? आणि कृती काय आहे? आणि आधी मुख्य नाव काय आहे?"


आई- "साहित्य तर सांगितलं सगळं मगाशीच आणि कृती आता करते समोर."


प्रिया- "नाव काय ते नाही सांगितलंस?"


आई- "नाव ऐकायचं?"


प्रिया- "हो मग? नावाशिवाय व्यर्थ च सगळं"


आई- "अगं हा एक प्रकारचा लाडू आहे."


प्रिया- "लाडू? वॉओ!"


आई- "हो लाडू. हे लाडू उठता-बसता-झोपता वाटेल तसे वाटेल त्या वेळेत, वाटेल त्या परिस्थिती मध्ये खाता येतात. डायट फूड चं सुद्धा हे काम करतात. हे खाल्ल्याने अंगातील चरबी कमी होते, डोक्यातील नको ते विचार आपोआप निघून जातात. बरं सतत या लाडूचं सेवन केल्यामुळे शरीर धडधाकट राहतं, वेगळा व्यायाम करायची गरज लागत नाही. मात्र इतर पदार्थांसारखा हा पदार्थ सगळ्यांना सढळ हस्ते वाटला जात नाही, ज्याच्या त्याच्या कालागुणांनुसार याचं वाटप होतं असा आहे हा मौल्यवान आणि युनिक पदार्थ. प्रत्येक आई ला हा पदार्थ माहीत असतो. प्रत्येकीची पद्धत वेगळी इतकंच."


प्रिया- "आई, करून टाक लवकर.गेला एक तास नुसता विचार करतेय मी. नाव सांग ना, मग मी सगळ्यांना सांगेन. हॅशटॅग आईचा युनिक पदार्थ"


आई- "पदार्थाचं नाव आहे......आहे...."


प्रिया- "अगं काय सस्पेन्स यात? सांग ना पटकन"


आई- "धम्मक लाडू!.....असं म्हणत आईने साडीचा पदर खोचला. बांगड्या खणखण करीत मागे चांगल्या घट्टपणे अडकवल्या. इतका वेळ फुकट गेल्याचा राग चेहऱ्यावर आला. आई प्रियाच्या मागे धावू लागली.

ये चांगले लाडू देते धम्मक लाडू पाठीवर! हे नको ते नको, अमकं दे तमकं दे, युनिक दे, चांगलं दे.......आ!! आता कशाला पळतेस ये इकडे ये!"


प्रिया पळायला लागली.

प्रिया- "आई....डेंजर आहेस गं तू! असं कोणी करत का मुलीसोबत?"


आई- "आणि तू वेळ खातेयस तो? उगाच नाहक काही तरी. कधी पासून सांगते काय ते सांग नीट काय करू काय करू ? पण नाही छान कर, वेगळं कर...हे काय आहे काय?"


पळता पळता प्रिया बाहेरच्या दाराकडे गेली आणि तिच्या बाबांशी तिची छोटीशी टक्कर झाली. बाबा नुकतेच कामावरून घरी येत होते. प्रिया ला काही तरी जाणवलं, कसला तरी वास येत होता.


प्रिया- "अतिशय सुंदर असा, चविष्ट असा वास येतोय आई....यम्म्म!!"


बाबा- "चला मस्त समोसा खाऊ. गरमागरम आणलाय. स्पेशल थांबुन आणले आहेत गरम गरम समोसे. प्रिया साठी एक जादाचा आणलाय हो. मी हात पाय धुवुन येतो तोवर जरा मांडामांड करा."


प्रिया- "बाबा...ग्रेट आहात हो तुम्ही! हे असं कसं काय कळतं तुम्हाला माझ्या मनातलं? आत्ता मांडते मी सगळं. आणि आई....."


आई- "हा काय आहे? मी काहीही करणार नाहीये"


प्रिया- "अगं तू नको करुस काही, मी सांगतेय तुला की तू पण जर फ्रेश होऊन ये मी मस्त आलं घालून चहा करते, युनिक असा माझ्या हातचा. मग आपण समोसा चहा वर ताव मारू, व्हॉट से?"


आई- "आता कशी सरळ आलीस?काय पण युनिक मिळालं? समोसे च ना? हुह! आलेच मी"


प्रिया- "असुदे गं आई. एवढे आणलेत बाबांनी गरमागरम! नाही कशाला म्हणायचं?"


बाबा- "काय गं काय झालं?"


आई- "काही नाही हो डोकं खाल्लं या पोरीने अगदी खरंच!"


(थोड्या वेळाने)


सगळी छान मांडामांड करून झाली. चटईवर मधोमध काचेच्या भांड्यात शिस्तीत बसलेले समोसे, काचेच्या बाउल मध्ये टोमॅटो सॉस, वाफाळता आल्याचा चहा, घरातली आपली माणसं, मनमोकळ्या गप्पा.....आणि काय हवं?

हॅशटॅग समोसा पार्टी

हॅशटॅग काही तरी छान

एक वेगळीच , छान संध्याकाळ पार पडली. अर्थात धम्मक लाडू वळले गेले नाहीत म्हणूनच बरं का!














पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू