माझं पिलू
जागतिक कन्यादिनानिमित्त एक लेख... माझ्या लाडक्या कन्येसाठी!
माझं पिलू
अगदी काल परवाचीच गोष्ट ! एका समारंभाला तयार होऊन जाण्यासाठी मी निघत होते.इतक्यात माझी लेक जोरात ओरडली..
"आई,अगं केस मोकळे सोड बरं!काय काकूबाई स्टाईला मागे बांधले आहेत.कशी दिसतेय बघ जरा!आणि प्रत्येक कार्यक्रमात नेहमी साडीच नेसली पाहिजे का गं?"
क्षणभर मी हादरले.गडबडीत मिळणाऱ्या सूचनांचा थोडा रागही आला.पण माझी चिमुरडी,माझी अर्पिता आज इतकी मोठी झाली आहे कि तिने माझेच वाभाडे काढावेत,याची मला खूप गंमत वाटली आणि नकळत मन भूतकाळातील आठवणीत रममाण झाले.
देवाशपथ सांगते,माझ्या काळ्याभोर जावळाची ,देखणी,गोरीपान,गुटगुटीत,सुंदर बाहुली डाॕक्टरांनी जेंव्हा पहिल्यांदाच माझ्या कुशीत ठेवली होती,तेंव्हा मला खूप खूप आनंद झाला होता.अगदी अपूर्व आणि अवर्णनीय असा!ते नाजूक सुंदर, फूल माझ्या कुशीत विसावले.माझं पिल्लू..माझी अर्पिता! त्या इवल्याशा निरागस सोनुलीकडे पाहून माझं वात्सल्य पालवलं.खरंच किती आनंददायी अनुभूती होती ती!
असे म्हणतात ,आईमुळे एका नव्या जगाची ओळख आपल्याला होते;पण माझ्या अर्पितामुळे मलाच एका नव्या जगाची ओळख झाली.
दिवसागणिक तिचं हळूहळू मोठं होणं,तिचं वागणं ,तिचं गोड बोलणं,तिचं चुकणं,तिचं खेळणं,तिचा हट्ट,तिचा खोडकरपणा असे सगळे तिच्या बाल्याचे सहजसुंदरअविष्कार पाहणं,त्यांची अनुभूती घेणं यातच माझ्या मातृत्वाचे सार्थक झाल्यासारखे आहे.
अत्यंत मनमिळावू स्वभावाची असल्यामुळे तिला मैत्रीणीही खूप सा-या लाभलेल्या आहेत.अत्यंत नम्र ,आज्ञाधारक असलेल्या माझ्या या पिल्लूची घरात सतत काहीतरी लुडबूड सुरू असते.कधी अंगणात आईसोबत रांगोळी काढण्याचा हट्ट,कधी स्वयंपाकघरात इवल्या-इवल्या पोळ्या लाटण्यासाठी लाडीगोडी ,कधी आईबाबांना वाढून देण्याची लगबग तर कधी छोट्या भावावर केलेली लटकी ताईगिरी....सा-या घरभर जे चैतन्य भरून आहे ना ,ते केवळ आणि केवळ माझ्या ह्या पिलूमुळे.अभ्यासाची गोडी तर तिला आहेच ,शिवाय ती विलोभनीय चित्रेदेखील रेखाटते.सार्वजनिक गणेशोत्सवातील कोणत्याही स्पर्धेतील सहभाग असो ,अर्पिताचा नंबर ठरलेलाच ! शाळेतील गीतगायन स्पर्धा असो, वक्तृत्व स्पर्धा असो अथवा सूत्रसंचालन,अर्पिताचा सहभाग ठरलेलाच!इतरांना मदत करण्यात तिला जो विशेष आनंद मिळतो ना,तोही अगदी अवर्णनीयच!
आपल्यावर विशेष माया करणारी आई,प्रेमाची पाखर घालणारे बाबा यांच्याविषयी तिच्या मनात हळवा कोपरा आहेच;पण आपल्या आईबाबांच्या अनुपस्थितीत आपल्या छोट्या भावाला विलक्षण लळा लावणारी ही ताई विरळीच आहे जणू!मी भावनिक झाल्यावर माझे डोळे पुसते ना ही सोनुली तेंव्हा मी तिच्यात माझ्या आईला पहाते.घरी यायला मला कधी उशीर झाला तर चातक पक्षाप्रमाणे माझ्या वाटेकडे डोळे लावून असते माझी ही लेक!'कराटे' स्पर्धेत राज्य पातळीपर्यंत मजल मारलेली माझी ही अर्पिता माझा अभिमान आहे.किती भरभरून सांगू या आणि अशा अनेक न संपणा-या गोष्टी माझ्या पिलूच्या!हे सगळं मला तिचा मोठेपणा मिरवायचा म्हणून नाही तर आपल्या पोटी अशी मुलगी जन्माला आली याची धन्यता वाटते म्हणून मुद्दाम सांगावसं वाटतंय.आपल्या मुलांना वाढवणं इतकं आनंददायी असेल असे मला कधी वाटले देखील नव्हते .
आपल्या मुलांना सर्वचजण डोळसपणे वाढवत असतात.माझ्या पिलूचं संगोपन ,तिचं शिक्षण ,तिचं करिअर ,तिचं लग्न या सगळ्या जबाबदाऱ्या तर आहेतच ,परंतु तिने कोणते करिअर निवडावे ,कोणते स्वप्न मनी बाळगावे यावर माझे कधीही बंधन नसेल.प्रत्येक मुलीला जागतिक किर्तीचे यश मिळेलच असे नाही;पण तिला जे शिकावेसे वाटते ,त्या शिक्षणातील आनंद तिला मिळायला हवा. आणि दुर्दैवाने तिचा रस्ता चुकलाच तर दुसऱ्या वाटेवर चालायला जातांना माझा आश्वासक हात नेहमीच तिच्या पाठीशी असेल.तिने तिच्या स्वयंनिर्णयाने ,स्वकर्तृत्वाने स्वतःचे जग निर्माण करावे व माझ्या आयुष्याचा आधार व्हावे.आणि मला खात्री आहे की ,माझं पिलू माझी ही अपेक्षा पूर्ण करीनच.
कधी कधी माझ्यातील आईला उगीचच भीती वाटते.माझ्या पिलूचा माझ्या घरातील लाघवी वावर,तिचा लडिवाळ हट्ट पुरवण्यासाठी मी केलेला आटापिटा ,सारेच संपुष्टात आले तर?तिच्यावर प्रेमळ हक्क गाजवणारे नवे माणूस कधीतरी येवून तिला माझ्यापासून खूप दूर घेवून गेले तर?माझी ही चिमणी मला सोडून उडून गेली तर?
नुसत्या कल्पनेनेच ऊर भरून येतो,डोळे डबडबून येतात आणि नकळत ओठांतून शब्द बाहेर पडतात......
'सोनुलीला न्यायला राजकुमारा
जरा उशीराच ये ना तू
कारण .....
अजूनही अल्लड मला
दिसते माझे पिलू
अजूनही अल्लड मला
दिसते माझे पिलू'
वैशाली निकम-देशमुख
औरंगाबाद
