दिवाळी आणि आठवणी
दिवाळी या शब्दातच किती आनंद भरला आहे, नाही का ? खरं तर... मनाच्या पटलावर कोरलेल्या दिवाळीच्या आठवणी पुसणं केवळ अशक्य आहे.
शाळेची सहामााही परिक्षा संपली की आम्हाला किल्ला करायचे वेध लागायचे. कापडी पिशव्या घेऊन किल्यासाठी माती आणायला थेट हनुमान टेकडी गाठायचो. माती बरोबरच रंगीत दगडं,शंखही आणायचो.
दगडं विटा रचून आधी ओलं पोतं त्यावर टाकून मग चिखल थापून आमचा किल्ला तयार व्हायचा. मग शिवाजी महाराज त्यांचे मावळे, गुहेत ठेवायला वाघ सिंह आणायचो. कधी कधी मागच्या वर्षी जपून ठेवलेली खेळणीही असायला. मग रस्ता, विहीर, शेत, घर तयार व्हायची. अळीवाचं शेतही मस्त डोलायचं. सगऴ्यात शेवटी विमानतळ तयार व्हायचा.
किल्या जवळ पणतीही ठेवत असू.
नरकं चतुर्दशीला कुडकुडत्या थंडीत पहाटे लवकर उठून वाड्यात पहिला फटाका आमचाच वाजत असे. मग उटणं लावून अभ्यंगस्नान उरकली नवीन कपडे घालून घरी केलेल्या फराळाची बैठक होत असे.
नंतर वाड्यात प्रत्येकाकडे फराळाची ताटं पोहचवली जायची.
आत्ताच्या या आधुनिक रेडिमेड युगात ती मजा कधीच येणार नाही.
???? महेश कुलकर्णी ( मदमस्त ) ????
