पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रबोधिनी एकादशी

  प्रबोधिनी एकादशी

 

      कार्तिक महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला 'प्रबोधिनी एकादशी' असे संबोधले गेले आहे.आषाढी एकादशीपासून 

निद्रावस्थेत गेलेले भगवंत चार महिन्यांच्या प्रदीर्घ निद्रेतून याच दिवशी जागृत अवस्थेत येतात असे मानले जाते.त्यामुळेच या एकादशीला 'देवउठणी एकादशी' किंवा 'देवोत्थानी एकादशी' असेदेखील म्हणतात.झोपलेल्या भगवंताला दीर्घ झोपेतून उठवण्याचा दिवस म्हणजे प्रबोधिनी एकादशी.प्रबोधन म्हणजे उठवणे किंवा जागविणे.खरं तर ज्याची चराचरावर सत्ता आहे ,त्या भगवंताला झोपवणे किंवा जागृत करणे,आपल्या हातची गोष्ट नक्कीच नाही.तरीही आपल्या सांस्कृतिक विचारधारेने लक्षणात्मकरित्या त्या भगवंताला झोपवले आणि जागवलेसुद्धा!आपल्याला आपल्या जबाबदारीचे भान यावे हा यापाठीमागील भावार्थ!माणसाला लाभलेले जीवन हे कमलपत्रावर असलेल्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे आहे.केव्हा निसटून संपून जाईन याचा नेम नाही.त्याला व्यर्थ प्रमादामध्ये उधळून न टाकता माणसाने जागृत राहून त्याचा सदुपयोग केला पाहिजे.कोंबड्याच्या आरवण्याने किंवा सूर्याच्या उगवण्याने सकाळ होत नाही तर माणसाच्या उठण्याने सकाळ होते हे त्याने लक्षात घेतले पाहिजे.आळस,अज्ञान व अंधार यांच्या घोर निद्रेत असणाऱ्या मानवाला जागृत होण्याची शिकवण देणारी एकादशी म्हणजे 'प्रबोधिनी एकादशी' असे म्हणता येईल.

         उठणे आणि जागणे यात खूप फरक आहे.बरीच माणसे उठतात ;पण ते जागी नसतात.वर्षानुवर्षे स्वतःचे सर्व व्यवहार झोपेसारख्या निष्क्रिय व बेभान अवस्थेत ते करीत असतात.भौतिक सुख थोडेही कमी पडू नये याची सतत काळजी घेताना जागृत असणारे लोक मानसिक,बौध्दिक किंवा आत्मिक विकासाच्या बाबतीत मात्र जागृत नसतात.कदाचित त्यामुळेच आज या जगातील आनंद तसेच संस्कार हरवत चालले आहे.आज आपण धर्म,नीती,संस्कृती ह्यासारख्या महत्त्वाच्या बाबतीत अपेक्षित जागृती गमावलेली आहे.अनीतीने नीतीला झाकून टाकले आहे.त्यामुळे अधर्म बळावलाय.संस्कृतीच्या नावाने विकृतीच खपू लागली आहे.आपल्या जीवनाचे सर्वच व्यवहार वरवरचे बनले आहेत.आपण आपल्या जीवनाची खोली गमावून बसलोय.आपण खूप चालतो;पण कोठेच पोहोचत नाही.आपण खूप काही पाहतो;पण दर्शन मात्र कसलेच घडत नाही.आपण ऐकतोही खूप ;पण समजत मात्र काहीच नाही.आपण बोलतो खूप;पण आपल्या वाणीत तपश्चर्येचे बळ नसते.आपण कामेही खूप करतो पण कर्मयोगाची उंची गाठू शकत नाही.कारण आपल्या कर्मांमध्ये ज्ञानाचा प्रकाशही नसतो आणि भावनांची आर्द्रताही नसते.हे सर्व  घडतयं ते ख-या जागृतीच्या अभावी!असे यंत्रवत काम करणे हे झोपेत असल्यासारखेच आहे. अशा विभिन्न निद्रांतून जागण्यासाठी 'प्रबोधिनी एकादशी' जागण्याचा संदेश घेऊन येते.

          आपली सांस्कृतिक विचारधारा असे सांगते कि प्रमादाच्या निद्रावस्थेत  गेलेल्या सुग्रीवाला लक्ष्मणाने ताकिद देवून जागृत केले तो दिवस म्हणजेच 'प्रबोधिनी एकादशी'.रामायणात राम आणि सुग्रीव यांच्या अतुलनीय मैत्रीचे वर्णन आहे.लंकेश्वराच्या ताब्यात असलेल्या सीतेचा शोध घेण्यासाठी जात असतांना रामाने सुग्रीवाच्या भावाला अर्थात बालीला मारुन सुग्रीवाची त्याच्या अन्यायातून मुक्तता करावी आणि सुग्रीवानेही मग सीतेची सुटका करण्यात रामाला सहाय्य करावे अशी परस्परांना सहाय्य करण्याची दोघांनी शपथ घेतली होती.बालीला मारुन रामाने सुग्रीवाचे काम पूर्ण केले.पण स्वतःचे काम पूर्ण होताच सुग्रीव रामाचे काम विसरला आणि प्रमादवश होऊन सुखोपभोगात मग्न झाला.रामाला खूप दुःख झाले.त्याने सुग्रीवाला त्याच्या कर्तव्याचे स्मरण करुन देण्यासाठी,त्याचे प्रबोधन करण्यासाठी लक्ष्मणाला पाठवले.तोच हा प्रबोधिनी एकादशीचा दिवस!त्यानंतर सुग्रीवाचे सहाय्य घेऊन रामाने रावणावर विजय मिळवला.  सुग्रीवाला जागवण्याचे काम जसे लक्ष्मणाने केले तसे आपल्याला जागवण्याचे काम आपल्या संस्कृतीला लाभलेले संत,महापुरुष,समाजसुधारक,प्रबोधनकार सतत करीत असतात.ते वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला जागवण्याचा प्रयत्न करीत असतात.कारण झोपलेल्याला उठवणारी,बसलेल्याला उभे करणारी,उभा असेल तर त्याला चालायला लावाणारी आणि चालत असेल तर धावायला लावणारी ही भारतीय संस्कृती एक जीवंत आणि प्रेरणादायी अशी वैदिक संस्कृती आहे.सुग्रीवाप्रमाणे जागृत होऊन ,जबाबदारीचे भान ठेवून आपणही आपल्या रामाच्या कामाला अर्थात सत्कर्माला लागलो तर तो दिवस आपल्यासाठीही प्रबोधिनी एकादशीसारखाच पवित्र बनेल!

 

वैशाली निकम

औरंगाबाद

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू