पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माझी आई


       व्यक्ती म्हणून जन्म घेण्याआधीच या भूतलावर आपलं नातं जुळतं ते आपल्या आईशी, नऊ मास ती तिचाच एक भाग समजून आपल्याला वाढवते, तिची आणि आपली जैविक आणि भावनिक नाळ आपल्या अस्तित्वाच्या अगदी पहिल्या दिवसापासून जोडली गेलेली असते.  आपल्याला आवडतं तेच ती खाते, नको ते तिला आवडत असेल तरीही नकोसं वाटून त्यागते.  गर्भातली आपली हालचाल, आपले वेळीअवेळी मनसोक्त गर्भात हिंदोळणे सगळं ती आनंदाने स्विकारते.  इथेच सुरू होतो तिच्या आणि आपल्या अद्वैताचा प्रवास, तिचं आईपण आणि आपलं बालपण अखंड सुरू होतं, आपण कितीही मोठे झालो तरी तिच्यापाशी लहानच, आणि तिचं कितीही वय होऊदे आपण तिच्या हातचे चार गरम गरम घास खाल्ले की तिचं मातृत्व सुखावतं. 

      माझी आई स्मिता श्रीकांत प्रभुणे, प्रभुणे कुटुंबात आलेली त्या पिढीतली एकुलती एक सून.  अर्थशास्त्राची पदवीधर, दिसायला सुंदर, लांबसडक दाट केसांची वेणी, तिने नेसलेल्या कोणत्याही साडीला तिच्यामुळे शोभा यावी इतकी छान.  प्रभुणेंच्या घरात आली आणि इथलीच झाली, सासरच्या जबाबदाऱ्या, कर्तव्य यात तिने माहेर मागेच ठेवलं आणि आदर्शवत सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत राहिली.  सासरच्या घरात शेतीवाडी, गायी गुरं, सोवळं ओवळ, हे सगळं तिच्यासाठी नवीनच पण शिकत राहिली आणि सांभाळत पण राहिली.  घरी असणारा माणसांचा राबता, वेगवेगळ्या वेळा सगळं तिने आपलंसं करून टाकलं.   आजी आजोबांच्या हाकेला समोर उभी असणारी ती त्यांची सून कमी अन लेक जास्त झाली. 

     चहा आणि आई हे एक अतूट समीकरणच, सकाळी लवकर उठून तिच्या ठरलेल्या जागी बसून मोठ्या कपातून ती चहा घेते, आम्ही गंमतीने तिला विचारतो अमृतपान झालं का?  पण त्या छोट्याश्या गोष्टीवर ती अगदी दिवसभर खुश असते.  सकाळी सकाळी तिचे हात सुरू असतात, एकीकडे कुकर, कणिक भिजविणे यासोबतच रोज गीतेतील एक अध्याय, विष्णू सहस्रनाम, शिवमहिम्न, मनाचे श्लोक, अन्नपूर्णा स्तोत्र खड्या आवाजात सुस्पष्ट आजही 65व्या वर्षी न चुकता सुरू असतं, ही सगळी स्तोत्रं तिची ऐकूनच आमचीही पाठ झाली, संस्कार वेगळे नसतातच, आपल्या कृतीतून ते मुलांपर्यंत पोहोचविणे हे तिने तिच्या कृतीतून आम्हालाही दिलं. तिचा हा वारसा अत्यानंदाने आम्ही पुढे नेतोय. संध्याकाळी दिवा लावून शिवा महादेवा सगळ्या लेक सुना जावई नातवंडांना सुखी ठेवा , हीच तिची प्रार्थना असते, घरातली संध्याकाळ तिच्यामुळेच तिच्यासारखीच पवित्र आणि उदबत्तीच्या आपण झिजून दुसऱ्याला सुगंधाचं देणं देणारी भासते. 

       देवपूजेचं फुलांनी भरगच्च तबक,  नैवेद्याच्या वाटीत घरचं त्या ऋतुमनातलं छान पिकलेलं फळ हे सगळं तिच्या  बागेतल्या कष्टाचं फलित असतं, त्याबद्दल तिला खूप कौतुकही असतं, बघ ग चिकू काय मधुर आहेत, आंबे अगदी अमृत फिके पडावे असे आलेत यंदा, असं ती खूप आनंदाने सांगते. नारळ वाळवून खोबरं करून ठेवायचं, त्याच गिरणीतून खोबरेल तेल करून आणायचं, या सगळ्याची निगा, साठवण हे सगळं ती ममतेने करते, आम्ही मुलं घरी जाताना एक पिशवी घेऊन जातो पण येताना हमखास चार पिशव्या बरोबर असतात, घरचेच आहे म्हणत नारळ, आंबे, कैऱ्या, तेलाच्या बाटल्या, चिकू, जाम, आंब्याच्या बर्फ करून ठेवलेला रस, चिकूचा गर, कढीपत्ता, भाजीचं, वडीचं आळू हे सगळं तर देतेच पण गेल्यावर कुठे स्वयंपाक करत बसतेस म्हणत मला लेकीला तर डबा देतेच पण सुनांनाही तितक्याच मायेने सगळं देते.  माझ्या लग्नाला आता तेरा वर्ष झालीत, तरीही प्रत्येक निरोपाचा क्षण तिला अश्रूंनी अनावर होतो, वरचेवर भेटतो पण तरीही ती निरोपाच्या वेळी हळवी होतेच, आणि प्रत्येक वेळी माझ्या पाठवणीच्या वेळी ती मला म्हणाली होती माझा हात मोडला ग आज, ते आठवतं

       आईचं वय फक्त 38 वर्षाचं होतं जेव्हा माझे बाबा गेले.  त्यांचं अचानक जाणं तिच्यासारखी हळवी स्त्री कसं सहन करणार याची सगळ्यांना काळजी होती.  थोडे दिवस तिला याचा खूप त्रास झालाही पण जेव्हा ती सावरली तेव्हा ती एकुलता एक मुलगा गेलेल्या माझ्या आजी आजोबांची लेक झाली, त्यांचा भावनिक आधार बनली, आम्हा मुलांसाठी आईची ममता आणि वडिलांचा धाक दोन्ही तिने अंगिकारले आणि आमच्या शिक्षणासाठी अक्षरशः तिने जीवापाड कष्ट केले. आजही माझ्या 86 वर्षाच्या आजीची ती लेकीपेक्षा जास्त काळजी घेते. याच काळात माझं आणि माझ्या आईचं नातं बरंच घट्ट झालं, कॉलेजमधून मी घरी आले की आई मागच्या अंगणात आंब्याच्या झाडाखाली पायरीवर बसलेली असायची, मग मी तिला बोलतं करायला दिवसभरात काय काय घडलं ते सांगायला लागले, तिच्या प्रतिक्रिया विचारायला लागले, मग हळूहळू तीही तिने आज काय वाचलं, त्यातला अर्थ, नवीन घातलेली एखादी स्वेटरची वीण मला दाखवायला लागली आणि ही आमची सवयच झाली, अजूनही फोनवर दिवसभराचं सगळं मी तिला सांगते, अर्थात तिला वाईट वाटणाऱ्या गोष्टी सोडून आणि तिनेही काय केलं ते तिला विचारते.  कितीतरी पदार्थ करताना हक्काने वेळीअवेळी फोन करून तिला रेसिपी विचारत बसते.  वाचलेलं लिहिलेलं सांगते.

      घरची परिस्थिती सधन असूनही कधीही अनावश्यक खर्च तिने आम्हाला करू दिले नाहीत, स्वावलंबन शिकविले. तिला शिक्षण असूनही कमावती नसल्याची खंत होती, ती सतत मला सांगते आपल्या हक्काचे चार पैसे आपल्या गाठीशी हवेत, मला शिक्षण घेऊन नोकरी करण्याबाबत तिचा खूप आग्रह होता, जे आर्थिक स्वातंत्र्य तिला मिळालं नाही ते मला मिळावं ही तिची इच्छा होती.  आजही माझ्या भावजयांना ती हाच सल्ला देते. मुलीचं शिक्षण वाया जाऊ नये असं तिला वाटतं मग ती स्वतःची असो किंवा दुसऱ्या घरातून आलेली.

     भावनिक, भोळ्या स्वभावाची माझी आई, खूप मायाळू आणि आम्हा मुलांच्या बाबतीत तितकीच कडक शिस्तीची आहे.  आम्ही लहान असताना रागावून उलट सुलट बोलण्याऐवजी ती मौन धरायची, आई बोलत नाहीये म्हणलं की फार वाईट वाटायचं, मग आईने बोलावं म्हणून तिला आवडतं तस आपसूकच वागायचो.  मराठीचं तिने शिकविलेलं व्याकरण, संत साहित्य, बखरींचे अर्थ त्यातले सांगितलेले अवांतर प्रसंग सगळं आजही अगदी काल घडल्याप्रमाणे स्मरणात आहे, अगदी एम कॉम ला पण तिने मला इकॉनॉमिक्समध्ये समजून सांगितलेलं ऑप्टिमम युटिलिटी आजही तसंच लक्षात आहे.

      बाबा असतानाही तिची रहाणी अत्यंत साधीच होती मोठी टिकली काळ्या मण्यांचं मंगळसूत्र, कानात सुवर्णफुलं आणि पाटल्या बिलवर, काचेच्या बांगड्या आणि अबोलीचा गजरा एवढीच तिची आवड, कधीही पावडरचा हातही चेहऱ्यावर नसायचा पण ती चारचौघीत उठून दिसायची, बाबा गेल्यावर तर ती ऐहिक गोष्टींमधून स्वतः मधून खूपच अलिप्त झाली, विरक्त जीवन फार लवकर स्वीकारलं तिने, कोणतीच अपेक्षा नाही,  साडी घेतली कधी तर आहेत ग कपाटभर माझ्याकडे तुम्हालाच न्या त्यातल्या आवडतील त्या म्हणणार, हात सतत सढळ.

      आईने हाताने विणलेले छोटे छोटे स्वेटरचे सेट घातलेली बाळं अजूनच छान दिसतात, बाळांतविडा असो की रुखवत तिची कलाकुसर लक्षवेधी असते. पुरणपोळी खावी तर आईच्या हातची, इडल्या पण तिच्यासारख्याच गोऱ्यापान आणि मऊ, पोहे, उपमा, आमटी तिने केलेलं काहीही चवदारच होतं, अन्नपूर्णा आणि सरस्वती दोघींचा सुरेख संगम म्हणजे माझी आई, तिच्याच पायाने घरी लक्ष्मी पण आली, आजूबाजूच्या बायकांना वाटायचं सून हवी तर स्मिता सारखीच, लेकींना त्या आईचं उदाहरण द्यायच्या. 

     माझ्या माहेरासाठी सासरी आज 65 व्या वर्षीही अखंड माझी माय नांदते आहे,  आजी म्हणून मिळालेली बढती अनुभवते आहे, दुधावरच्या सायीवर तिचा कमालीचा जीव, आम्हाला कठोरपणे शासन करणारी ती आता फणसाच्या गऱ्यासारखी गोड झाली आहे, मध्ये एकदा माझ्या भाचीने तिचे सगळे पांढरे झालेले केस आहेत त्याला सिल्व्हर मेडल म्हणलं होत, खरंच आयुष्याच्या शर्यतीत तिने चंदनासारखं झिजत, चांदीसारखंच निर्लेप आणि शांत जगणं स्वीकारलं आहे, ती आजही चाळीशी पार केलेल्या तिच्या मुलांचा भावनिक आधार आहे, हा आधार खूप खूप सुखावह आणि हवाहवासा आहे, या माझ्या आईला निरोगी दीर्घायुष्य लाभूदे एवढंच मागणं, बाकी तर सगळं तिने जिंकलेलंच आहे, तिच्या या संघर्षाशिवाय येईल ते स्वीकारत सहनशक्तीने आयुष्याशी झालेल्या लढ्याला तिच्या लेकीचा प्रणाम????

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू