पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पसायदान भारतमातेचे

!!**!! पसायदान भारतमातेचे !!**!!

 

 

                     " आता भारतमाता देवी! 

                    आमच्या कर्म यज्ञे तोषावी! 

                तोषोनी आम्हा द्यावे पसायदान हे!!" 

             खरे म्हणजे ज्ञानेश्वर माउलींनी जगाचे कल्याण होण्यासाठी विश्वात्मक देवाकडे प्रार्थना केली होती आणि पसायदान म्हणजेच प्रसाद मागितला होता. पण मज अल्प मती पामरास एवढा मोठा अधिकार नाही त्यामुळे मी माझ्या जन्मभूमी असलेल्या भरातमातेच्या चरणी प्रार्थना करून सकल देशवासीयांच्या आणि माझ्या भारत देशाच्या प्रगतीचे पसायदान मागावे असे ठरवले आहे म्हणूनच त्या भारत मातेला विनंती करतो की तिने आगामी वर्षात आमच्या सगळ्यांच्या सकारात्मक कृतीने आणि सदगुण रुपी कर्माने प्रसन्न होऊन देशाच्या प्रगतीचा राजमार्ग दाखवावा आणि देश महासत्ता होण्याची किमया साधली जावी असा प्रसाद आम्हास द्यावा.

                    आपण नेहमी बदलाची किंवा चांगल्या गोष्टीची दुसऱ्याकडूनच का बरी अपेक्षा करतो? अश्याने अपेक्षेच्या ओझ्याखाली गुदमरून जाण्याची वेळ येते स्वतःवर. मग बदलासाठी किंवा सुककर जीवनासाठी स्वतः बदल करा स्वतः सकारात्मक विचार करून त्यादृष्टीने प्रयत्न करा म्हणजे अपेक्षित यश नक्कीच मिळेल आणि अपेक्षा भंगाचे दुःखही पदरात येणार नाही. त्यामुळेच पुढील काळाकडे कोणत्याही अपेक्षेने न बघता आपण स्वतः देशाच्या समस्यांचा अभ्यास करून बदलाची सुरुवात स्वतः पासूनच करू आणि अपेक्षापूर्ती कडे वाटचाल सुरू करू.मग पाहुयात बरे कोणते सकारात्मक बदल स्वतः मध्ये करण्याची गरज आहे.कोणत्या जटिल समस्या देशासमोर उभ्या आहेत.

                       १) भ्रषटाचार ही देशातील सर्वात मोठी समस्या आज मितीस आहे.त्यामुळे देश आतून पोखरण्याला सुरुवात झाली आहे अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत छोट्या मोठ्या गोष्टींसाठी वशिला लावावा लागतो किंवा पैसे खर्च करावे लागतात आणि ह्या मुळे योग्य लायक व्यक्ती अनेक गोष्टींपासून दूर लोटल्या जातात मग स्वतः निश्चय करा की मी लाच देणार नाही किंवा लाच घेणार नाही. त्यामुळे ही किड देशाला पोखरणार नाही.

                         २) शेतकरी देशात सन्मानाने जगाला पाहिजे.आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे पण आज त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येऊ लागली आहे आणि ती येऊ नये शेतकरी समृध्द व्हावा यासाठी सर्वांनी त्यांच्या शेत मालाला योग्य बाजारपेठ आणि योग्य बाजार भाव मिळवून दिले पाहिजे तेव्हाच देश खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होईल.

                        ३) बेरोजगारीची कुऱ्हाड देशावर कोसळली आहे त्यात प्रामुख्याने देशाच्या तरुणाईचा बळी जात आहे. त्यासाठी सर्वांनी देशातच उत्पादन करणे गरजेचे आहे स्वदेशीचा पुरस्कार सर्वांनी करणे गरजेचे आहे जमेल ते काम करण्याची तयारी केली पाहिजे.परकीय गुंतवणूक देशात वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत.

                       ४) शिक्षणासाठी व्यापक प्रमाणावर सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. देशात आजही मुलभूत शिक्षणापासून मुल वंचित राहतात त्यासाठी अनेक आघाड्यांवर निकराचे प्रयत्न देशाचे नागरिक म्हणून आपण करणे सगळ्यांनी स्वतचे आद्य कर्तव्य समजले पाहिजे.जास्तीत जास्त महिला साक्षर करण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे.वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील होणे गरजेचे आहे.

                        ५) आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त अशी पावलं उचलली गेली पाहिजेत. आज देशात आरोग्याच्या समस्या वाढत चालल्या आहेत कारोना महामारीने तर ते जास्त प्रमाणात सिद्ध करून दाखवून दिले आहे. सर्व नागरिकांनी स्वतच्या आरोग्याची काळजी स्वतः घेतली पाहिजे अनेक उपाय योजना अमलात आणण्यासाठी प्रयत्नशील होणे गरजेचे आहे.आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करणे गरजेचे आहे.सरकारी आरोग्य यंत्रणा सक्षम केल्या पाहिजेत.

                          ६) महिला सबलीकरण होणे ही देशाची प्रमुख गरज आहे.आजमितीस देशातील महिलांचे सर्वच बाबतीत सबलीकरण होणे ही काळाची गरज बनली आहे.त्यांना स्वातंत्र्य देणे अपेक्षित आहे त्यांच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न घरा घरातून व्हायला पाहिजे.त्यांना त्यांच्या सुरक्षेचे प्रशिक्षण देण्यात आले पाहिजे.पुरुषांनी तिला तिचा दर्जा देणे गरजेचे आहे. स्वतच्या पुरुषी वृतीत बदल केल्यास हुंडा बळी,बलात्कार, स्री भ्रूणहत्या आणि महिला अत्याचार रोखणे सहज शक्य होईल.  

                           ७) राजकीय अनास्था ही अत्यंत जटिल समस्या आज देशासमोर आ वासून उभी आहे.सर्व राजकीय पक्ष आणि राजकीय नेते देशाच्या प्रगतीच्या बाबतीत उदासीन असल्याचे दिसून येतात. वरील सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी सरकार चालवणाऱ्या राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी सकारात्मक विचार करून योग्य ते निर्णय घेऊन त्यांची योग्य अंमबजावणी केली तर अनेक प्रश्न चुटकी सरशी सुटतील देशाच्या प्रगतीचा वारू चौफेर उधळू लागेल.कारण सरकारी योजना देशाच्या प्रगतीचा राजमार्ग असतो.

                             ८) देशाची आर्थिक स्थिती बदलण्यासाठी प्रत्येकाने टॅक्स वेळेत भरून सकारात्मक प्रतिसाद देणे गरजेचे आहे.देशाची स्वच्छता,मुलभूत गरजा,पायाभूत सुविधांची निर्मिती,देशाच्या सुरक्षेची जबाबदारी म्हणून देशाशी प्रामाणिक राहून सरकारला सहकार्य करावे. जाती धर्माची तेढ निर्माण होऊ नये म्हणून नेहमी जागरूक नागरिक व्हावे.देशातील कुपोषण दूर करून सक्षम नवी पिढी निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळेच मला हे सर्व बदल घडण्याची अपेक्षा मी स्वतः करतो आणि आपल्या सर्वांकडून देखील अपेक्षा ठेवत आहे. 

                      त्यामुळे असे बदल येणाऱ्या काही वर्षात घडून यावेत असे सुद्धा मनस्वी वाटते त्याकरताच सर्वांनी माझा देश माझी जबाबदारी म्हणून स्वतः कडूनच अपेक्षा करा आणि परम पूज्य साने गुरुजींच्या स्वप्नातील भारत देश घडवू या. त्यासाठी मग करणार ना सर्वजण प्रयत्न त्यासाठी एकदिलाने म्हणुया,

" बल सागर भारत होवो,विश्वात शोभुनी राहो 

  हे कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दिधले." 

                           याज साठी केला होता अट्टहास अस म्हणतात ना त्याप्रमाणे माझ्या या स्वतःतील बदलाच्या अट्टाहासासाठी भारतमातेच्या चरणी मागितलेला पसायदान फलद्रूप व्हावा एवढीच माफक माझी अपेक्षा असेल.

                  ✍️ नितीन गजानन सुर्वे.

                मु.पो. बोर्ली पंचतन,रायगड

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू