पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मास्तकी ची मास्टर की

"मास्तरकी ची मास्टर-की"


{प्रशांत सुसर, बुलडाणा}


 "काय झालं...? बाळ रडत होतं....वूडवर्ड्स द्यायला सांग तिला.. तू लहान असताना 

मी ही  तुला तेच देत होते..." पिढ्यानपिढ्या  असलेली विश्वासार्हता दाखवणारी ही दूरदर्शन वरील ग्राईप वॉटर ची जाहिरात सगळ्यांना आठवत असेल. अशीच विश्वासार्हता असलेला आणखी एक घटक आहे. तो म्हणजे  बालकांना ज्ञानरुपी बाळगुटी पाजणारा शिक्षक. परंतु तो विश्वास आता हळूहळू कमी होत आहे हेही जाणवते.इथे 'परिवर्तन संसार का नियम है' हे विसरून कसं चालेल. तंत्रज्ञानाच्या क्रांतीने झपाट्याने बदलणाऱ्या या जगात काळानुरूप तोही बदलणारच.पूर्वीच्या गुरुजींचा 'सर'पर्यंत 

(व्हाया मास्तर) झालेला प्रवास तेच दर्शवतो.मात्र हा शाब्दिक बदल असला तरी मानसिक- भावनिकदृष्ट्या 'खरा शिक्षक' कधीच बदलत नसतो. त्यामुळे शिक्षकांना 'आदर्श' मानणारा एक मोठा वर्ग आजही समाजात आहे. परंतु त्यांना हिणवणारा, त्यांच्या कार्यकर्तृत्वावर शंका घेणारा एक नकारात्मक वर्ग वाढत चालला आहे.जो भावी  पिढीच्या भविष्यासाठी घातक आहे.(तसा  तो आदिगुरू सावित्रीमाई व ज्योतीबांच्या काळातही होताच. त्यांनाही या पवित्र कार्यासाठी शिव्या व शेंणगोळे खावे लागले.) 'मास्तर' या शब्दातून उपरोधिकपणे गरळ ओकणाऱ्यांना त्याचा अर्थही माहित नसतो. 'मास्टर' या इंग्रजी शब्दाचा मराठीत  मालक, शिक्षक किंवा पारंगत असा  अर्थ होतो. त्याचा अपभ्रंश होऊन मास्तर झाला. 'मास्तर' म्हणजे जो 'माय'च्या स्तराला' जाऊन शिकवतो. 

जी किल्ली  कोणतंही कुलूप उघडू शकते तिला 'मास्टर-की' असं म्हणतात. तसंच जे काम कोणीही करू शकत नाही ते मास्तर अगदी सहज करतात म्हणूनच कदाचित त्यांना 'मास्टरजी' म्हटलं जात असावं. त्यामुळे 'जिथे कमी तिथे आम्ही' हीच परिस्थिती शिक्षकांची आहे. येथे इतर कामे करण्याबाबत आक्षेप नाही तर यामुळे मूळ कामापासून दूर जाऊन जे प्रतिमाभंजन होते त्याविषयी तीव्र नाराजी आहे. अध्ययन-अध्यापन या प्रक्रियेपासून दूर गेलेल्या शिक्षकांची पालक वर्गात किंवा समाजात हेटाळणी होणे हे अपरिहार्य आहे. त्यामुळेच एक दिवसाच्या 'टीचर्स डे' ने तो सुखावतो मात्र दररोजच्या 'मास्तरडे' ने तो दुखावतो.

 महाराष्ट्राला शैक्षणिक उपक्रमांची प्रयोगशाळा म्हटले जाते. त्यामुळे येथे नवनवीन प्रयोग राबवले जातात.

त्यांची परिणामकारता तपासण्याआधीच दुसरा उपक्रम तयार असतो. त्यामुळे शिक्षक- विद्यार्थी यांची अवस्था 'एक ना धड भाराभर चिंध्या' अशी होते. प्राथमिक शिक्षकाला सगळच आलं पाहिजे या अट्टाहासापायी तो 'Jack of all trades but master of none' होऊन बसतो.(इथे मला नारदमुनींची ती गोष्ट आठवते ज्यात वाटीतील तेल सांडू न देता नामस्मरण करायचे असते .एक तर नामस्मरण होईल किंवा तेल तरी सांडणार नाही.अशीच अवस्था शिक्षकांची होते) आपल्याला डॉक्टर, इंजिनियर स्पेशलाइज्ड हवेत, शिक्षक मात्र सर्वसमावेशक, जनरलाइज्ड हवा. मग रिझल्ट तो काय येणार..? एखाद्याला इंग्रजी चांगले येते म्हणून तो गणितात तज्ञ असेलच असं नाही. मग त्या ज्ञानाचा उपयोग घेण्याऐवजी त्याला 'सब घोडे बारा टक्के' या न्यायाने कामाला लावलं तर रसभंग होणारच..

 डिसले गुरुजींना तंत्रज्ञानात गती होती. त्यांनी पहिल्या पगारातून मोटारसायकल ऐवजी लॅपटॉप घेतला आणि लोकल ते ग्लोबल अशी झेप घेतली. त्यांच्या QR  कोड चा फायदा जगभरातल्या विद्यार्थ्यांना झाला.असे किती तरी डीसले गुरुजी आपल्या आजूबाजूला विद्यार्थ्यांसाठी धडपडत आहेत. गरज आहे ती त्यांना भौतिक ,आर्थिक, मानसिक पाठबळ देण्याची.

 परंतु 'सिस्टम' नावाची एक चौकट आहे जी आपण भेदू शकत नाही आणि 'पिंजरा' बनून 'मास्तर' त्यात अडकतो, तो सतत इतरांच्या इशाऱ्यावर नाचण्यासाठी.

दिल्ली सारख्या छोट्या राज्यात शासनाने मनात आणल्यावर आमूलाग्र बदल होऊ शकतो तर आपल्याकडे का नाही..? 

शासन- शिक्षक -पालक आणि विद्यार्थी  असा हा चौकोन आहे ज्‍यायोगे शिक्षण क्षेत्रात बदल होऊ शकतो. शासन स्तरावर विचार केल्यास पुरेशा आर्थिक व भौतिक सुविधांचा अभाव, रिक्तपदे, बदली धोरण याबाबतची अनिश्चित ध्येयधोरणे, कागदी घोडे नाचवण्याची कायम असलेली इंग्रजी परंपरा यामुळे शिक्षकी पेशाबद्दल तरुणवर्गात कमालीची अनास्था निर्माण झाली आहे. आज गुणवान व कौशल्यपूर्ण युवा वर्गात स्वयंप्रेरणेने शिक्षक बनण्याचे प्रमाण नगण्य आहे.

डी एड, बी एड च्या रिक्त जागा वरून ते दिसतेच आहे. स्वातंत्र्यानंतरच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही आपण प्राथमिक शाळांसाठी एक शिपाई किंवा कारकून ही व्यवस्था उभी करू शकलो नाही.

 तलाठी वा ग्रामसेवकांकडे एका क्‍लिकवर सातबारा, आठ अ मिळेल.मात्र एका दाखल्यासाठी शिक्षकाला आजही खर्डेघाशीच करावी लागते,का..? तर अजून पर्यंत शालेय  रेकॉर्डचे डिजिटायझेशन होऊ शकले नाही. म्हणून शिक्षकांचा वेळ कारकुनी करण्यात वाया जातोय. समाजातून आणि समाज माध्यमातूनही नेहमी जाणवणारा रोष म्हणजे शिक्षकांना भरपूर पगार व सुट्या आहेत. या बाबत सांगावेसे वाटते की हा पगार फक्त गेल्या दहा वर्षात वाढला असून तो ही महागाईच्या प्रमाणात. बहुतेक शिक्षक हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत त्यांना गरिबीची व गरिबांच्या मुलांची जाणीव आहे.इतर भ्रष्ट व मुजोर अधिकारी व कर्मचाऱ्यापेक्षा 'त्याची' नैतिकता अजून टिकून आहे. मग त्याने थोडसं सुखवस्तू जीवन जगलं तर काय बिघडलं...?

(बालकांसाठी तो रोल मॉडेल असतो त्यामुळे आचार, विचार व उच्चार यात तारतम्य ठेवण्याची जबाबदारी त्याचीही असते. शेवटी आपलं काम हाच आपला आरसा असतो) याबाबत शाळेत असताना वाचलेलं एक वाक्य आठवते की न्यायाधीशांना भरपूर वेतन व भत्ते या सुविधा असाव्यात जेणेकरून ते समाधानी राहून आपले काम करतील व गैरमार्गाकडे वळणार नाहीत. त्यालाच अनुसरून ही बाब शिक्षकांना लागू होत नाही का..? याबाबत खाजगी शाळा व विनाअनुदानित तत्त्वावरील शिक्षकांची अवस्था आपण पाहतच आहोत.

सुट्यांच्या बाबतीत सांगायचे तर शिकणे आणि शिकवणे हे 'येरागबाळ्याचे काम नव्हे' हे गेल्या दीड वर्षात आपण अनुभवतो आहोतच. ऑनलाइन शिक्षणाने काहीअंशी शिक्षणाला सहारा दिला असला तरी तो पर्याय पूरक आहे परिपूर्ण नाही, हे त्यातून उद्भवणाऱ्या  हानीकारक समस्यांमुळे कळते.त्यामुळे 4G,5G च काय तर कोणतीच टेक्नॉलॉजी गुरुजीला पर्याय होऊ शकत नाही, हा धडा आपण शिकलोय.शिक्षण ही एक मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे. त्यामुळे 'पी हळद नि हो गोरी' असे अघोरी उपाय करून भागत नाही. त्यासाठी रोपट्यांप्रमाणेच  मुलांनाही ज्ञानरुपी खतपाणी घालून पुरेसा वेळ द्यावा लागतो. तेव्हाच ती बहरतात.

 ज्ञान हे  नेहमी प्रवाही असतं आणि म्हणून शिक्षक हा आजन्म विद्यार्थी असावा लागतो.त्याने स्वतःला सतत अपडेट ठेवले पाहिजे. त्यासाठी शिक्षकांना वाचन, मनन, चिंतन,लेखन, निरीक्षण व नियोजन या गोष्टींसाठी पुरेसा वेळ हवाच. त्यासाठी या सुट्ट्यांचा उपयोग शिक्षकांनी करावा अशी अपेक्षा आहे.

 पण आजकाल आपल्याला सगळं झटपट हवे असते.झटपट फक्त मॅगी बनते,विद्यार्थी नाही. त्यासाठी पालकांनी संयम, सामंजस्य व संवाद ही त्रिसुत्री अवलंबवावी. यासाठी समाजाचा शिक्षकांवर व शिक्षकांचा स्वतःवर विश्वास असायला हवा. विद्यार्थ्यांनीही ज्ञानपिपासू बनले पाहिजे. कृतीयुक्त शिक्षण हेच खरं शिक्षण आहे त्यासाठी शिक्षण व व्यवहारज्ञान यांची सांगड घालून मन ,मनगट व मेंदू मजबूत केला पाहिजे. शेवटी शिक्षकांच्या प्रति येणाऱ्या काही नकारात्मक प्रतिक्रियांविषयी एवढेच सांगावेसे वाटते की 'अपवाद' हे प्रत्येक क्षेत्रात असतात. त्यासाठी संपूर्ण शिक्षकीपेशाला बदनाम करणे योग्य ठरणार नाही. काम न करणाऱ्यांसाठी नियंत्रण करणारी यंत्रणा आहेच.मात्र त्यापेक्षाही महत्वाचे आहे ते चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीवर पडणारी कौतुकाची थाप.यंत्रमानव घडवण्यापेक्षा 'माणूस' घडवणे हे खरे शिक्षणाचे काम आहे.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणतात आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो, पाण्यात माशाप्रमाणे पोहायला शिकलो पण जमिनीवर माणसाला माणसाप्रमाणे वागवायला शिकलो तरच खऱ्या अर्थाने शिकलो असे म्हणता येईल. 'खरा शिक्षक' म्हणजे मला सोनाराच्या दुकानात एका कोपऱ्यात बसून प्रामाणिकपणे आपलं काम करणारा कुशल कारागीर वाटतो. जो त्याचं काम एकाग्रतेने, कष्टाने व चोखपणे करतो. तेव्हाच घडवले जातात सुंदर अलंकार.आपण मात्र कौतुक करतो ते त्या काचपेटीतील अलंकारांचे. त्यामागील झिजलेल्या हातांना विसरून...!


 शिक्षक दिनाच्या

 हार्दिक शुभेच्छा...????

✒️ प्रशांत रामभाऊ सुसर,

बुलडाणा


9860412825

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू