आठवणीतली दिवाळी
दिवाळी आठवणीतली .....
टीव्ही वर जाहिरात पहिली "उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली" आणि जाणवलं खरंच दिवाळी आली सुद्धा. ते अलार्म काका मध्ये वारल्याच कळलं. मन फार उदास झालं. प्रत्येकाच्याच मनात त्यांनी दिवाळी मात्र जिवंत ठेवली आहे .अजूनही आमची दिवाळी मोती साबण आणल्याशिवाय साजरी होत नाही. दिवाळी म्हटलं ना की आपसूक मन माहेरी धाव घेत. काय दिवस असायचे ते. आजही आठवलं की मन अगदी मोहरुन उठतं. माहेरी आजी, आजोबा, आई, बाबा, आम्ही तिघी बहिणी मस्त माणसांनी भरलेलं घर. दसरा झाला की दिवाळीचे वेध लागायचे. कधी एकदा सहामाही परीक्षा संपते असा होऊन जायचं. घरी साफ सफाईला सुरुवात झालेली असायची. घरातली सगळी जणं आपापल्या परीनं हातभार लावायची. परीक्षेचा शेवटचा पेपर झाला की सगळ्यात आधी कंदील बनवायचा. त्याचे रंग मोहक वाटायचे. नवीन कल्पना लढवून हे कंदील सजवायचे. मातीचा किल्ला करायचा. त्यावरचे मावळे आणि शिवाजी ठेवताना भान हरपून जायचं. सगळीकडे फराळाची धूम सुरू झाली असायची. आमच्या घरी अगदी बाबा , आजोबा सुद्धा तळायला मदत करायचे. लाडू , चिवडा, चकल्या, शंकरपाळे, चिरोटे, अनारसे हे लिहितानाही आईच्या हातची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे असं वाटलं. मी घरात सगळ्यात लहान म्हणजे लिंबूटिंबू. माझ्या पर्यंत तितपतच कामं यायची. फराळानी डब्बे भरलेले असायचे. फटाके, पणत्या, रांगोळ्या ह्यांची मनसोक्त खरेदी करायची. आईच्या सोसायटीत कॉमन गॅलरी आहे. त्यामुळे आम्ही मुली घोळक्याने रांगोळी काढत फिरायचो. संध्याकाळी सगळी कंदील आणि पणत्या लागल्या की सगळं प्रकाश मय होऊन जायचं. मला आवाजाचे फटाके कधी आवडले नाहीत मी आपली अनार, भुईचक्रातच खुश असायची. पहाटे अभ्यंग स्नान करायचं. देव दर्शन झालं की फराळावर आडवा हात मारायचा. फराळ सुद्धा सह कुटुंब सहपरिवार एकत्र करायचा.धम्माल असायची नुसती. मित्र मंडळ, नातेवाईक ह्यांनी घर भरलेलं असायचं.
आता दिवाळी साजरी करण्याच्या संकल्पना बदलल्या आहेत पण उत्साह मात्र तोच जाणवतो. पूर्वी दिवाळी म्हणजे नवीन कपडे आता त्या बाबतीत बारा महिने दिवाळी चालूच असते. दहावी नंतर शाळेतून बाहेर पडलेला प्रत्येक विद्यार्थी जसं म्हणतो ना "आमच्या वेळची शाळा आता राहिली नाही " माझही अगदी तसच झालय मन म्हणतय "आमच्या वेळची दिवाळी काही औरच होती बुवा ती मजा आता राहिली नाही."
ह्या दिपोत्सवासाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा ????????
दिपावली तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला सुखसमृद्धीची ,भरभराटीची , आनंदाची जावो हिच शुभ कामना ????????
©️अश्विनी परांजपे - रानडे
