पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मराठाची बोलु कौतुके

"माझा मराठाची बोलू कौतुके"

 

 

"मॉम, अवर टिचर हॅस गिव्हन वन प्रोजेक्ट अबाऊट सम मराठी भाषा दिन.. कॅन यू हेल्प मी प्लीज?" पाच वर्षाची टिना आपल्या आईला, त्रिशाला  विचारत होती.. 

" शुअर डार्लिंग.. वॉट हेल्प यु वॉंट?"

" मॉम,  आय वॉन्ट सम बालगीत.. वॉट्स दि मिनिंग ऑफ इट?"

( खरे तर यांचे सगळे संवाद इंग्रजीमधूनच चालले आहेत.. पण आपल्या सोयीसाठी आपण अधून मधून इंग्रजी वापरू..)

" बाळा,  बालगीत.. बालगीत म्हणजे.. अं अं... तू ना आजीला विचार मी पटकन एक इंपोर्टन्ट कॉल करून आले.." 

" मॉम,  नॉट फेअर.. आजी मगाशीच बाहेर गेली आहे.. आणि तू मला प्रॉमीस केले आहेस मदत करायचे.. "

" ओके.. बालगीत म्हणजे लहान मुलांची गाणे..लाईक युवर नर्सरी राईम्स.. पण प्लीज मला विचारू नकोस.. मला आठवत नाहीत.."

" आय कॅन अन्डरसटॅन्ड मॉम.. बट टेल मी ते मातृभाषा म्हणजे काय?"

" बेबी.. म्हणजे मदर टंग.. आपण जी लँग्वेज घरी बोलतो ती.. "

" पण आपण तर घरी इंग्लिश बोलतो ना सगळे.. मग टिचरने मराठी का सांगितले आहे?"

आता या प्रश्नाचे उत्तर काय द्यायचे हा प्रश्न त्रिशाला पडला होता.. कारण दोन तीन  'लँग्वेज' मुलांना लहानपणी शिकवल्यावर ते कन्फ्यूज होतात या मताची ती होती.. त्यामुळे  टिनाशी बोलताना,तिच्या आसपास वावरताना सर्वांनी  इंग्लिश मध्येच बोलावे यावर तिचा कटाक्ष असायचा.. त्यामुळे आता आपली मदर टंग मराठी का आहे हे तिला समजावता येत नव्हते..

" बेबी, यू डू वन थिंग,  नाऊ यू जस्ट गो ॲन्ड प्ले.. आय हॅव टू प्रिपेर माय स्पीच विच आय हॅव टू डिलिव्हर इन क्लब.."

" ग्रेट मॉम.. तू काय बोलणार आहेस?"

" हाऊ टू सेव्ह लोकल लँग्वेजेस.."

 

 

अगदी सगळ्याच नाही पण बर्‍याचशा घरांमध्ये हे असे संवाद बर्‍याच वेळा दिसतात..  मुलांना बाकीच्या भाषा आल्या पाहिजेत हे आपल्या डोक्यात एवढे ठासून भरले आहे कि त्या भाषा शिकताना आपल्या भाषेकडे होणारे दुर्लक्ष आपल्याला उमगतच नाही..  त्यातून सुरू होते मुलांची दैन्यावस्था..

एका बाजूला घरी मराठीत बोलायचे आणि शाळेत इंग्लिश इज कम्पल्सरी.  अशा परिस्थितीतून जाणारे तरून जातात पण काही असेही असतात ज्यांची अवस्था दोन्ही घरचा पाहुणा उपाशी अशी होते.. दुसरे उदाहरण म्हणजे बर्‍याच घरांमध्ये त्या लहान मुलांना गाणी ऐकवली जातात ती बरीचशी इंग्लिश असतात.. पण कोणालाच त्यांना मराठी गाणी ऐकवताना  पाहिले नाही.. खरेतर त्या मराठी गाण्यातले सोपे शब्द, त्याचे नादमाधुर्य यामुळे ती गाणी जवळची वाटतात, पटकन समजतात.. टोपीवाल्याची, माकडांची गोष्ट, बुडबुड घागरी बुड ग अशा गोष्टी आजकालच्या  मुलांना माहित आहेत का?  शंकाच आहे.. पालक इथूनच त्यांची मातृभाषेशी असलेली नाळ तोडतात.  मग तिथून सुरू होते मराठीची अधोगती.. मराठी प्रेम उरते ते फक्त शिवजयंती, महाराष्ट्र दिन आणि मराठी भाषा दिनापुरते.. त्यातही खूप जणांना २७ फेब्रुवारीला का साजरा करतात ते माहीत नसते.. मराठी फलके लावा, दुकानाच्या पाट्या मराठीत लावा हे करून फायदाच काय जर तिथे येणारी माणसेच मराठीत बोलत नसतील.. स्वानुभव.. जर तुम्ही बाहेर एखाद्या व्यक्तीशी बोलत असाल तर तो इंग्लिशमध्येच बोलणार किंवा हिंदीमध्ये.. हव्यात कशाला मग त्या पाट्या मराठीत?  बिस्किटचे पुडे, शॅम्पूचे बाह्य आवरण या कंपन्या जरी महाराष्ट्रात असल्या तरिही त्यावरील माहिती मात्र इंग्लिश किंवा इतर भाषेत.. मराठी सोडून.. मध्यंतरी एका इंटरनॅशनल शाळेत असलेल्या शिक्षकांच्या भरतीविषयी एक संदेश आला होता.. भारतभरात भरती चालू होती.. त्यांची शैक्षणिक अर्हता होती.. इंग्लिश गरजेचेच..

तामिळनाडूमध्ये तामिळ येणे गरजेचे,

गुजरातमध्ये गुजराती आणि असेच काही.. पण महाराष्ट्रात हिंदी.. त्या व्यक्तीला महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे हिंदी नाही याची आठवण करून दिल्यानंतरही त्याचे उत्तर होते.. whatever is given its right.. कुठून येतो त्यांना हा एवढा विश्वास? कि महाराष्ट्रात फक्त मुंबईत नव्हे मराठीत नाही बोलले तरी चालेल.. कोण आहे याला जबाबदार? प्रत्येक वेळेस त्या दिवसापुरते मराठीचे गोडवे गायचे नंतर अडगळीत फेकून द्यायचे..

 

मी इथे कुठेही दुसर्‍या भाषांच्या विरोधात नाही.. जगात फिरताना त्या भाषांची मदत नक्कीच होते, पण त्यासाठी आपल्या भाषेची नाळ तोडणे गरजेचे आहे का, याचा विचार आपणच केला पाहिजे ना? दुसर्‍या माध्यमात शिकतानासुद्धा आपल्या मुलांना मराठी लिहिता, वाचता आणि बोलता आले पाहिजे हि जर काळजी प्रत्येकानेच घेतली तर चिंध्या नेसून उभी असलेली आपली हि मराठी भाषा नक्कीच पैठणी नेसून मिरवेल.. आणि त्यासाठी कोणाच्याही मदतीची गरज नाही.. शिवाजीमहाराजांचे एक बहुमोल पण तेवढे प्रकाशात न आलेले एक कार्य आहे.. त्यांच्या काळात बोलीभाषेत,  राज्यभाषेत उर्दू,  फारसी या शब्दांचा भरणा झाला होता मुस्लिम राज्यकर्त्यांमुळे.. तो काढून टाकण्यासाठी त्यांनी एक राज्यभाषाकोश बनवायला सांगितले.. आणि ते शब्द रोजच्या व्यवहारात वापरायला सुरुवात केली.. आज ज्यांची पुण्यतिथी आहे, त्या सावरकरांनीतर अनेक इंग्रजी शब्दांना मराठी शब्द शोधून काढले.. अशा महापुरुषांना श्रद्धांजली म्हणून किंवा आदरात्मक असे त्यांचे फोटो स्टेटसला ठेवाच.. पण त्याच बरोबर त्यांनी आखून दिलेल्या रस्त्यावर जर चाललो तर तीच त्यांना खरी आदरांजली असेल काय वाटते? 

 

 

लेख कसा वाटला ते नक्की सांगा....

 

सारिका कंदलगांवकर

 दादर मुंबई

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू