पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

इडली

*इडली*

आज ३० मार्च आंतरराष्ट्रीय इडली दिवस. दक्षिण भारतातील सर्वात प्रसिद्ध पचायला हलका असा आहार. विशेषतः सकाळच्या न्याहरी साठी उपयुक्त ठरेल आणि तो म्हणजे इडली सांबार. अजून पर्यंत कुठल्याही डॉक्टरांनी आजारपणात इडली वर्ज्य केली आहे असं निदर्शनास आलेले नाही. एका इडली मध्ये साधारण ३०/३२ कॅलरीज असतात म्हणून वजनदार माणसं आपलं वजन गमवण्यासाठी इडली वर विश्वास ठेवतात.

तांदूळ व उडीद डाळ यांचें आंबवलेले मिश्रण साच्यात घालून वाफेवर शिजवून तयार गोल आकाराची इडली म्हटली की पोटात भूक लागली म्हणून समजा. इडली खाण्याची खरी मजा केळीच्या पानावर गरमागरम एक वाटी सांबार आणि नारळाची चटणी बरोबर येते. 

इडलीची उत्पत्ती विकिपीडिया अनुसार थेट ९ व्या शतकात आढळून येते विशेषतः कन्नड भाषेतील शिवकोटी आचार्य यांच्या लेखनात आढळते. तर काहींच्या मते केडली ह्या इंडोनेशियन पदार्थात आहे. सुरवातीला फक्त उडीद डाळ पिठ ताक मिसळून आंबवून केली जायची पण नंतर १७ व्या शतकात तांदळाने यांत उडी घेतली व आजची पांढरीशुभ्र गोल मऊ अवतरली. संस्कृत भाषेतही इदारिका म्हणून उल्लेख आढळतो.

 हो सांबार मात्र आपला महाराष्ट्रीयन. असं म्हणतात पेशवाई काळातील कुणी सरदार मोहिमेवर कर्नाटकात गेलेत आणि तेथे त्यांना आमटी खाण्याची इच्छा होती पण आमटी साठी कोकम उपलब्ध नसल्याने आचाऱ्याने चिंच टाकून तयार करून वाढले अन् तेच सांबार म्हणून नावारूपाला आले. आणि इडली परिवारात घरजावई म्हणून सामील झाले. 


मॅगीच्या जन्म होण्याआधी इडली हा सर्वात लवकर होणारा पदार्थ होता. ८/९ मिनिटांत सहज तयार होते. डोसा आणि उत्तप्पा हे इडलीचे बंधु द्वय. डोसा म्हणजे तव्याच्या डोक्यावर सारवून केलेला म्हणून डोसा हे नाव पडले असावे. उत्तप्पा मात्र कटप्पाचा भाऊ वाटतोय. डोसा उडपी येथे जन्मला म्हणण्यापेक्षा तेथून मुंबईकरांच्या सेवेत उडपी हाॅटेल मध्ये आला व जगप्रसिद्ध झाला. डोसा चा एक डोस पोट भरुन काढतो. इडली मात्र हमखास जास्त घ्यावी लागते.

जागतिकीकरणाच्या काळात इडली व तिच्या परिवारातील डोसा, उत्तप्पा व बाॅय फ्रेंड मेदू वडा जगभरात उपलब्ध आहेत. कदाचित मंगळावर माणसाच्या आधी हे इडली कुटुंब पोहोचले असावे. 

इडलीचा एक बाॅय फ्रेंड मेदू वडा. बरेच प्रेमीयुगुलांचे इडली वडा जोडी नाश्त्याला घेऊन आपल्या जोडीदाराची आठवण करतात. माझ्या एका मित्राचे तर इडली मेदु वडा खाऊ घालून प्रेम जुळलेलं. त्याला इडली सारखी मऊ धवल तर तिला मेंदू मध्ये छिद्र असलेला साथी मिळाला. मेदु वड्याला मध्ये असलेलं छिद्र हे मेंदुला पडलेल्या छिद्रासारखं आहे. कारण समजत नाही. 

आजकाल इडलीचे अनेक प्रकार व तऱ्हा उदयास आलेल्या आहेत. तळलेली फ्राईड इडली, पोहा इडली, ओट्स इडली, रवा इडली अशी विविध रुपे घेऊन कॅट वाॅक करायला लागली आहे.

*इडली साठी काही ओळी 

असूनी तु द्रविड सुंदरी
शुभ्र धवल ती कांती
गरमागरम ताटलीत येता 
मिळते उदरास शांती

मऊ उबदार जिभेवर
वाटे मज नव अनुपमा
नाजूक आणि चवदार
भासे जणू मनोरमा


गरीबांची भरुनी खळगी
बनते तु सर्वांची अम्मा
भेदाभेद न करता तु
होते सामान्यांची हेमा


 तर अशा ह्या इडली दिवसाच्या आरोग्यदायी शुभेच्छा. 


*®© ओमप्रकाश शर्मा*

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू