पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सखोलतेतील खजिना

*सखोलतेतील खजिना*



    *खरा गुरु तुम्हाला प्रज्ञारुपी घरात प्रवेश करण्याची आज्ञा करत नाही तर तुमच्या स्वतः च्याच मनाच्या उंब-याकडे तो तुम्हाला  घेऊन जातो* 


    खलील जिब्रानच्या या तात्विक जीवनभाष्यातून गुरुचं माहात्म्य लक्षात येईल . चिंतनाच्या सीमारेषांना स्पर्श करून शांत अन् संयत गभीरपणाने परिपक्व करत जातो तो गुरू ....ज्ञानाचा शोध घ्यायचा म्हणजे  आविष्कार अन् साक्षात्कार दोन्ही आवश्यक  ...त्यासाठी चर्चा अन् संवाद हवा...असं निहित ज्ञान बाहेर काढायला मदत करतो तो गुरू.


       मानवाचा प्रवास अनुभवाकडून कलानुभवाकडे जसजसा होत जातो तसतसा गुरुंचा सहवास नवेपणाचा प्रत्यय जाणून घेण्यासाठी निश्चितच हवा....वि.स. च्या शब्दात सांगायचे झाल्यास , *कुतुहल हे डोळ्यात गेलेल्या कणांसारखे असते .ते मनुष्याला काही  केल्या स्वस्थ बसू देत नाही* .  हे कुतूहलच कलाकृतीचे नवनवे उन्मेष उगवते आणि  मनात ते उमलण्यासाठी दृष्टी  देणारे कोण असतात तर ते असतात गुरू. 


    आई, वडील , शिक्षक किंवा इतर कुणी जे जे आपल्या जीवनात नवे सौंदर्यानुभव स्वीकारण्याची वृत्ती आणि  भूक जागी करतात ते ते आपल्यासाठी गुरूच असतात....अनुभवाची मातब्बरी जितकी विशाल तितकी मनुष्यत्वाची जडणघडण भारी . या भारीपणाला कायमची एक जीवनदृष्टी हवी ती गुरुशिवाय कोण बरं देऊ शकेल ?  विविध प्रश्न पडायला हवेत , त्यावर साधकबाधक चर्चा व्हायला हवी मग तिथे निर्मितीप्रक्रियेचा शोध घेता येईल...शिष्यत्वातून नवं उमलणं तिथेच तर सूरु होतं.


      आजच्या काळात गुरू कसा असावा हा प्रश्न  थोडा विचार करायला भाग पाडणारा असू शकतो. शिक्षक संस्था म्हणजे भरपूर दूध देणारी गाय आणि दुराग्रहाचे रेणकोट त्वचेवर डकविलेले शिक्षक  बघितले की एकलव्याची आठवण व्हावी. इतिहास पुसला जातोय आणि राज्यशास्त्र गडप होतय पुस्तकातून ...त्या काळात शिष्यानी चिंतन तरी कोणत्या विषयावर करावं ?  मुळात चिंतनासाठी विषय तरी राहिलेत का ? 


 *मुलाच्या शाळेतील* *प्रवेशासाठी* 

 *आईने सोळा सोमवार केले* 

 *बापाने सोळा शनिवार केले* 

 *चिरंजीवाला  घेऊन दोघे* *शाळेत गेले* 

 *बापाच्या खिशाकडे पाहून* 

 *प्रिन्सिपल हासला* 

 *नोटा देताच पोरगा वर्गात बसला*!


     रामदास फुटाणेंची ही उपहासिका . शिक्षणक्षेत्र किती  बजबजलेलं आहे हे सांगणारी. इथे फक्त शिक्षक उरलेत ..आपण कुणाला तरी शिकवतो या उद्धटपणाच्या भूमिकेत वावरणारे ...ज्ञान दान न करता व्यवहार सांभाळणारे...तात्विक अन् वैचारिक  समर्थता असलेले गुरु आहेत थोडेफार , पण दुर्मिळ होत चाललय गुरुपण....अहमयुक्त अनुभवातून स्फुरण पावलेला विचार पेरणारं पीक जरा जास्त उगवतय. 


       आज *गुरुपौर्णिमा* त्या निमित्ताने काही अपेक्षा आहेत गुरुंकडून... निरागस शिष्य गुरुंच्या सोबतीने उमलावे , या हृदयीचे ज्ञान त्या हृदयी सहजच स्पर्शून जावे ...अनामिक नजरेने बघणारे ते निरागस भाव अगदी अलवारपणे गुरुने टिपावे...त्यांच्या मनातली कुतूहलाची बाग हिरवीकंच करावी ....विचारात जाणलेले शब्दात जाणून घेण्याची इच्छा आजचा शिष्य करत असेल तर गुरुने सखोलतेतील खजिना त्यांच्यासमोर मोबदला न घेता उघडा करावा....गुरुचा वास्तव ध्वनी शिष्याच्या मुखातून प्रतिध्वनी म्हणून  उमटावा ...गुरुशिष्य नातं हा व्यवहार न उरता आत्मोद्धार ठरावा...गुरुंचा सत्कार शिष्याच्या नजरेतून व्हावा...आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्त समस्त गुरुवर्गाकडून ही किमान अपेक्षा ....


     *गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा*????????????



            सौ. वर्षा मेंढे

              अमरावती

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू