पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

रे श्रावणा ...तुझ्या कैफात आम्ही

*रे श्रावणा...तुझ्या कैफात आम्ही* ????????????☔☔????????




 *हिरवी लावण्यवेल बहरून* 

 *भाववृत्तीशी एकरुप झाली* 

 *हिरवेच काहूर अजूनही मनात* 

 *श्रावणा..कशी ही जाणीव न्हाली* 



       तू येतो आकाशसीमेच्या सप्तरंगी काळजातून....म्हणून  तर इथल्या प्रत्येक  इद्रधनू काळजात शिरणं तुला सहज जमतं....आकाशातल्या ढगांचे विभ्रम मनामनात तरंगत ठेवायला बरं जमतं तुला....जुन्याच रुपकाचा खेळ नव्या सरींतून खेळत कसा मनाचा वणवा जाळत जातो तू ....आमचं ओलेतं मन सावळ्या आकाशात चिंब  स्वप्नांची  सोनकिरणं शोधत फिरतं तेव्हा  तू आमच्या मनातलं हिरवं काहूर जाणलेलं असतं बहुधा....आमचीच स्पंदनं रेखाटणारी एक इंद्रधनू रेष तू हृदयाच्या सीमारेषेवर कधी उमटवून जातो कळतच नाही ....भावनांची तरलता अन् कातरता दोन्ही जाऊन क्षणात हृदयाचा वणवा शांत होतो...विलक्षण सौंदर्याने हरखून गेलेले मन  अन् आपल्याच  कल्पनाचित्रांनी स्पंदनात उतरवलेले ते रंग जीवनाला अर्थ द्यायला लागतात...निसर्गाचे इतके रेखीव रुप अनुभवात उतरवतांना जीवनही देखणं होऊन जातं....श्रावणा केवळ तुझ्यामुळे...


      ऋतूपरिवर्तनातलं रेखीव असं हे सृष्टीरुप स्वप्नभेटीसारखंच...स्वप्नभूमीच्या निळ्या कोषात प्रीती उभाळून यावी तसं काहीसं होतं तुझ्या प्रेमात पडतांना....एखाद्या गंधयुक्त तळ्यात स्वतःला डोकवावं अन् आपलंच प्रतिबिंब तिथे लखलखावं असा काहीसा भावानुभव आमच्याच मनाच्या कक्षा ओलांडून जातो...ख-या अर्थाने निसर्ग न्याहाळू लागणे अन् ते करतांना स्वतःच्या भावविश्वात आपल्या हिरव्या जीवननिष्ठा निसर्गाशी एकरुप करणे हे फक्त तुझ्यामुळे शक्य होतं....निसर्गाचे संगीत ऐकतांना आत्मपरतेची एकात्म वीण जगण्यालाच जणू साद घालत जाते की काय हा नवाच अनुभव प्रत्ययाला येतो तो तुझ्यामुळे...निसर्गाला स्फूर्तिकेंद्राच्या मरुभूमीवर उतरू द्यावं अन् त्या जाणीवेतून जीवनाला नवा नाद अन् आकार येऊ द्यावा असंही मनोमन वाटतं...या अशा आकांक्षा फुलण्यासाठी , सुखजाणीवांनी रुपवान झालेला  रेखीव अनुभव अनुभवण्यासाठी तूच हवा....तू आला की मनातले भावही बघ किती बोलके होतात ते...तुझ्यातल्या मनस्वीपणाच्या रंगात आम्ही रंगून जातो अन् त्या रंगलेल्या मनाने जीवनावर तसच हिरवं प्रेम करू लागतो....


       हिरवे रान अन्  सोनकिरणांच्या अभिषेकानी फुललेली सोनेरी पालवी,  तुझं हे मखमली तारुण्य ...या तारुण्यात आमच्या हृदयाचा अंतरअग्नी क्षणभर तरी फुलवावा असं वाटणं गैर नसेल ना ?....सृष्टीतलं सगळं वातावरण एका भावगंधाने भारलेलं असतांना त्या गंधात सुखद आनंद भेटत असेल तर मनाचा पोत तसाच तलम, पारदर्शी केला तर  हरकत तरी काय ? ....तृप्त मेघ अन् अतृप्त मनाची प्रणयपत्रिका जूळवून बघण्यात गैर ते काय ?....निसर्ग सौदर्याची लयलुट करत असतांना मनाच्या तरल छटा त्यात मिसळल्या तर आपल्याच रसिकतेचा सोनसडा हृदयात पडेल....संवेदनशील कवीमनावर  कल्पनांचे गुलाबपाणी शिंपडल्या जाईल अन् या परिणामातून कल्पकतेची उत्तुंग झेपही घेतल्या जाईल....ही जाणीवही तुझ्या कडे सौदर्याचे दान मागणारी...


       श्रावणा,...तुझ्या  मखमली पर्णावर आमच्याच भावनांचे फूल उमलावे अन् त्या फुलाच्या गंधाने जीवनात  एक वेगळाच कैफ निर्माण व्हावा असं काहीसं घडत जातं इथे ...आपले बाहुपाश पसरून जीवनाला वेढा घालावा अशा स्वप्नांची सुकुमारता तुझ्या प्रेमामुळेच....इथे प्रतिक्षेतील अधीरेपणही आहे अन् तारुण्यातील चंचलताही आहे... कुणाच्या तरी आठवणीने फुलणारा शहारा तुझ्या सरीतून अपुऱ्या प्रीतीची कहाणी सांगतो...नाजूक भावनांचे हे अधिरेपण व्याकुळ करणारं असलं तरी हृदयात असंख्य स्वप्नांचा दाट मांडव घालणारं सुद्धा आहे,.,.सौंदर्य आणि  

सुगंध याचा अद्वितीय मिलाप  अंतर्मनात धुक्यासारखा पसरत जातो  व्याकुळता दूर करायला ....ही व्याकुळताही प्रेमात चैतन्यता आणणारी... 


     अशा या सौदर्यदृष्टीचा वाटसरू  आपल्याच अस्तित्वावर सुखाची वेलबुट्टी काढत असंख्य  स्मितांचा शिलालेख कोरत जातो...तुझ्यातून थेंब थेंब ओघळतात  अन् मग मनावरचं आकाशपण काही केल्या दूर होत नाही ...पहाटपक्ष्यांचं कूजन आपल्याच अंतरंगातला आवाज गात असल्याचा तो भास ...अन् हर्षोल्हासाने नाचणारे झ-यातले पाणी जीवनाचा अन्वयार्थ लावणारे...निसर्गालाही स्पंदनं असतात का ?.... असावेत खरंतर ...तुझ्या कैफात जाणवतात ती...दशदिशा उधळणा-या रंगात चमकतात ती....प्रफुल्लित ,गंधीत पुष्पांमध्ये गंधाळतात ती...थेंबाथेंबातून ओघळतात ती...सोनसरीतून प्रकाशतात ती.....


       रे श्रावणा....तू भेटतो तेव्हा सारेच वातावरण भावगंधाने भरलेलं असतं ....आणि  एका सुखद आनंदाचे आम्ही धनी होतो...पारिजातकाच्या फुलांचा कोमल वर्षाव व्हावा तसा काहिसा नाजूक भाव मनामनातून ओसंडतो...जेथे जेथे दृष्टी स्थिरावते तेथे तेथे जपलेले सोनेरी क्षण पिंगा घालतात....तू म्हणजे  जीवनेच्छा....तू म्हणजे  श्रद्धा...तू म्हणजे आनंदाचं प्रतिबिंब आकाशातून धरेवरच्या मनामनात पडलेलं....तू म्हणजे कैंफ मनाच्या अनंत आंदोलनात जीवनचिंतन पेरणारा....



            सौ. वर्षा मेंढे

             अमरावती

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू