पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

एकाकीपण

समुद्रामध्ये एकट्या उभ्या असणार्‍या दीपस्तंभाच्या अढळतेचा हेवा वाटून जातो तर कधी ध्रुवाच्या एकाकीपणाचा मोह पडून जातो.. कारंज्यामध्ये उधळणार्‍या असंख्य, अगणित तुषारांपैकी एखादाच तुषार आपल्याला मोहात पाडून जातो… त्याच्या अस्तित्वाची चुणूक डोळ्यात भरुन जातो… एखादा वेंधळा ढग आकाशाची रंगसंगती बिघडवताना आपल्याला आपला आभास देऊन जातो… केसाच्या असंख्य बटांपैकी डोळ्यावरुन गालावर घरंगळणारी बट आपल्याला जास्त आकर्षक वाटून जाते… बागेमध्ये राजरोसपणे फुलणार्‍या फुलांपेक्षाही कुंपणावर फुलणारे एखादे फूल आपल्याला जास्त जवळचे वाटून जाते… शर्यतीत कधी कधी जिंकलेल्या सार्‍या स्पर्धकांपेक्षाही शेवटी आलेला स्पर्धक आपल्याला जास्त आपल्यासारखा वाटून जातो… प्रत्येकाचे भावविश्व वेगळेच असते.. प्रत्येकाच्या एकाकीपणाला वेगळा सुगंध असतो… कितीतरी जणांना या एकाकीपणामध्ये आयुष्य व्यतीत करावेसे वाटते.. कुठे विजयाचा उन्माद आहे तर कुठे पराभवाची खंत आहे… कुठे स्थितप्रज्ञतेची अत्युच्च अवस्था तर कुठे भरकटलेपणातून आलेला अहंभाव…. कुठे कर्तव्याप्रती असलेली दृढता आहे तर कुठे दुर्लक्षितपणातून आलेली विषण्णता.. कुठे अनुभवातून आलेली प्रखरता आहे तर कुठे नातेसंबधातून डावलल्यामुळे आलेली खिन्नता… एकाकीपणाचे आयाम स्पष्ट करणे शक्य नाही… प्रत्येकाच्या एकाकीपणाचे रंग व त्यातुन साकारणारे स्वयंचित्र शब्दातीत आहे… एकच वाटते की जगताना एकाकीपणाचा उपयोग उन्नतीसाठी व्हावा, आत्मशोधासाठी व्हावा, आपल्यातील गळून गेलेला ‘मी’ शोधण्यासाठी व्हावा, हेच योग्य अन समर्पक!
©अनुपमा

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू