पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

जोडूया धागा पर्यावरणाशी

          वड, पिंपळ, कडूनिंब, आंबा अशी अनेक उपयुक्त झाडे पर्यावरणाचे संतुलन अबाधित ठेवतात. कडुनिंबाच्या झाडाखाली थंडावा मिळतो. वडाच्या झाडाचे तर अगणित फायदे आहेत. वड अक्षय्य आहे. एका छोट्या बीजापासून निर्माण होणारे हे झाड अतोनात वाढतं.
           समाधिस्थ साधूच्या आश्रयाखाली प्राप्त होणारी शांतता, या झाडाच्या छायेखाली जाणवते. वडाच्या पारंब्या जमिनीला टेकून, जमिनीत स्वतःला रुजवून घेत, नवीन झाड तयार होतं. सृजनाचं हे अचंबित करणारं रूप म्हणजे हा वटवृक्ष! या झाडाच्या पानांनी आद्रता शोषून घेऊन ओलावा टिकून राहतो. कित्येक हजार पटीने हवेतील धूळ-धूर शोषून घेऊन प्राणवायू निर्माण करण्याची प्रक्रिया हा वृक्ष करतो. हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड शोषून घेऊन हवेत प्राणवायू सोडण्याची त्याची क्षमता कैक पटीने जास्त आहे.

           आजूबाजूचा कित्येक मैल परिसर एका वडाच्या झाडामुळे प्रदूषणमुक्त राहू शकतो. त्याचे गुण अगणित आहेत. तो औषधीयुक्त आहे. कित्येक आजारांवर तो गुणकारी आहे. असा हा व्रतस्थ उभा असलेला वटवृक्ष-वड आपली स्वतःची दंतकथा लेवून उभा आहे.
           सत्यवान-सावित्रीची दंतकथा! त्या कथेच्या अनुषंगाने समाजात रूढार्थाने त्याला प्राप्त झालेला पूजेचा मान! स्त्रियांच्या भावजीवनात स्थान प्राप्त असणारी वटपौर्णिमा! त्यानिमित्ताने केली जाणारी वडाची पूजा...

          पूजेचा अक्षय मान वडाला मिळावा असाच हा वटवृक्ष आहे. मात्र पूजा करताना त्याच्या फांद्या, खोड, मुळे, पाने, पारंब्या यांना धक्का लागू नये याचा विचार आज कालौघात करायला हवा.

         सावित्री ही मुळातच एक बुद्धिमान, प्रचंड बुद्धिमत्ता असलेली स्त्री होती. स्वतंत्र बाण्याची, स्वतंत्र निर्णयक्षमता असलेली, स्वतःच्या विचारांवर ठाम असलेली, अतिशय कर्तुत्ववान स्त्री होती. सेवकांबरोबर स्वतःचा वर शोधण्याकरिता, वडिलांनी जेव्हा या राजकन्येला राजवाड्याबाहेर धाडले तेव्हा तिने स्वतःचे राज्य गमावून बसलेल्या अंध आई-वडिलांबरोबर जंगलात राहून त्यांची सेवा करणाऱ्या, पराक्रमी राजकुमार सत्यवानाची निवड केली. याचे कारण तिचा तिच्या कर्तुत्वावर ठाम विश्वास होता. स्वतःच्या विचारांवर अढळ श्रद्धा होती. सुखासीन आयुष्य निवडण्यापेक्षा, जीव जडलेल्या राजकुमाराच्या शौर्याचा, पराक्रमाचा तिने आदर केला. अल्पायुषी असणाऱ्या राजकुमाराचा स्वीकार करून स्वतःची निर्णयक्षमता सार्थ करून दाखवली. गेलेले सारे ऐश्वर्य, राज्य मिळवले. पतीचे प्राण वाचवले.
           अशा सावित्रीची आज समाजाला आत्यंतिक गरज आहे. स्वतंत्र बाण्याची, कणखर व्यक्तिमत्वाची, स्वकर्तृत्वावर सारेकाही मिळवणारी, स्वतःच्या निर्णयावर ठाम राहून परिस्थितीला आव्हान देणारी सावित्री घराघरात तयार व्हायला हवी. सशक्त समाजाची ती गरज आहे. समोर आलेल्या आव्हानाला शरण न जाता त्याचा सामना करणारी सावित्री आज हवी आहे. रूढार्थाने काळाबरोबर रूढी-परंपरा या, दंतकथेशी घुटमळत न ठेवता, लवचिक राहून त्यात बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य आजच्या सावित्रीत हवे.

         पर्यावरणाशी नाते जोडून त्याचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने त्यांचे जतन करावयास हवे. वडाच्या झाडाला दोरा गुंडाळण्याऐवजी पर्यावरण आणि आपण या दोहोंतील धागा मजबूत करायला हवा. फांद्यांची कत्तल न करता वडाच्या झाडाचे एक तरी रोप लावायला हवे. खऱ्या अर्थाने त्या वटवृक्षाच्या उपयुक्ततेला केलेले ते नमन होईल.

         ऐच्छिक सण म्हणून त्याचा मान जरूर राखावा. मात्र रूढी-परंपरांना, चाली-रितींना कवटाळत न बसता त्यांच्यात बदल घडवून आणण्याचे सामर्थ्यही आपल्या मनगटात असू द्यावे. चाली-रितींना घेऊन चालतांना काळाची गरज जरूर ओळखावी. प्राणवायू प्रदान करणाऱ्या वडाच्या झाडाचे महत्व ओळखून त्या वटवृक्षाचे रक्षण करणे, रोपे लावून संवर्धन करणे, आणि पर्यावरणाचे संतुलन राखून, काळाबरोबर हा वसा पुढच्या पिढीकडे सुपूर्द करणे हे प्रत्येक सावित्रीचे कर्तव्य आहे.


       रूढार्थ बदलता येतो. तो बदलणे हीच तर काळाची गरज असते. _
©वीणा विजय रणदिवे ✍️

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू