ऋतू बदलतांना
लालगर्द सूर्य निळ्याशार आकाशात बघतांना सकाळी सकाळी अतिशय प्रसन्नता जाणवली. लाल कुंकवाचा टिळा नभांगणी शोभून दिसत होता.
हिवाळ्याची बोचरी थंडी संपून हलकी ऊब जाणवते आहे. वसंत ऋतूचे आगमन होणार. हिवाळा आणि उन्हाळा या दोन ऋतुचक्रांमधील ही वसंत ऋतूची मांदियाळी!
बोचरी थंडी आणि उन्हाची काहिली, या दोघांमध्ये मेळ साधणारा...हवीहवीशी ऊब घेऊन येणारा हा वसंत ऋतू.
शिशिर ऋतूतील पानगळ संपून नव्या पालवीचे रोपण वृक्षवेलींच्या अंगाखांद्यावर होणार असते. हे वसंत ऋतुच्या आगमनाचे संकेत!
नव्या नवलाईने नवी पालवी धारण करून, निसर्ग वसंत ऋतूच्या प्रवेशाने बहरणार असतो.
हेच तर आहे निसर्गचक्र! ऋतू बदलतांना होणाऱ्या कडू गोड बदलांचा स्वीकार निसर्ग मनापासून स्विकारत असतो. वसंत ऋतूचे वारे वाहू लागतात. वाऱ्याच्या झुळूकीने झाडावरची पिकलेली पाने गिरक्या घेत खाली येतात. झाडांच्या बुंध्याशी पिकलेल्या पानांचा सडा पडलेला दिसतो. पर्णगळीत झाडे मात्र तटस्थ उभी असतात. कारण याच पानगळीनंतर नवी पालवी फुटणार असते. हा निसर्गनियम झाडांनी, वृक्षवेलींनी स्विकारलेला असतो. 'जुन्याची कात टाकून नव्याचा स्वीकार करणे'....हे सांकेतिक अध्यात्म, ऋतू बदलतांना हा निसर्गगुरु आपल्याला शिकवत असतो.
या ऋतूबदलाचे स्वागत देखील निसर्ग स्वतःला फुलवून साजरे करत असतो. नवनिर्मितीची उधळण करीत सर्व सृष्टी शृंगारलेली, पानाफुलांनी बहरलेली दिसते. इथून खऱ्या अर्थाने सुरू होतो वसंतोत्सव!
सुखाचा वसंत करणारी जादू या वसंत ऋतूत असते. पळस फुलवून निसर्ग वसंत ऋतूचे स्वागत करतो. बहाव्याचे पिवळेधम्म बहारदार झुपके वसंत ऋतुच्या स्वागतास सज्ज होतात. पलाश आपल्या अंगाखांद्यावर लालकेशरी फुलांचे कोंदण लेवून रंगांची उधळण करतो. गुलमोहर उन्हाळ्याच्या तीव्र झळा वाटसरूंना लागू नये याकरिता रक्तवर्णी साज चढवून सज्ज होतो आणि फुलांच्या पायघड्या जमिनीवर अंथरून नखशिखांत लाल केशरी रूपात बहरतो. मोगऱ्याच्या कळ्या वेलीवर डोकावू लागतात. तऱ्हेतऱ्हेची रंग, रूप, गंध ल्यालेली विविध फुले डोळ्यांना सुखावू लागतात. गळलेल्या पानांच्या जागी आता कोवळी, लुसलुशीत, हिरवी पालवी सळसळतांना दिसते. आंब्याला मोहर येतो. त्याच्या सुवासाने चित्तवृत्ती फुलून येतात. रंग, गंध, रूप, रस...निसर्ग अंगाखांद्यावर लपेटून घेतो. आसमंतात उत्साह जाणवतो. वसंताचे आगमन सृष्टीला नवतारून्य प्रदान करते. हा आनंदसोहळा वसंतोत्सव म्हणून साजरा केला जातो.
सृष्टी सृजनाचा शेला पांघरते. ऋतू बदलतानाचे, असे हे बदल स्वीकारीत, फुलत जाणे, बहरत जाणे, तटस्थ राहून अवघ्या आसमंताशी जुळवून घेणे हे निसर्गालाच जमते.
पानगळ झाली तरी दुःख न करता शिशिराचा आदर करून, येणाऱ्या नव्या पालवीचे स्वागत करित वसंताचे येणे तो अंगोपांगी मिरवतो. वैशाखातील चटक्यांचा दाह ही तेवढ्याच अलिप्ततेने स्वीकारतो. हा ऋतुचक्रांचा सोहळा अखंड मिरवत हे कालचक्र सुरू राहते.
निरंतर, अव्याहत चालू राहणारा हा काळाचा प्रवास आहे. कडू-गोड अनुभव घेत बहरत जाणे हे निसर्गाला जमते तर मग मनुष्याला का नाही?, हा प्रश्न इथे आपसूक पडतो.
जगात विविध संस्कृती असलेले लोक, वेगवेगळे ऋतू मानतात. आपले सहाही ऋतू आपल्या कालक्रमानुसार येतात. प्रत्येक ऋतूचा आब वेगळा, लहर वेगळी, रंग रूप छटा वेगळी... मात्र प्रत्येक ऋतू बदलतांना, निसर्ग या बदलांना सामावून घेतो. ऋतुच्या आगमनाची ग्वाही देतो.
त्यातही वसंतऋतू हा ऋतुराज! तो येताच सृष्टी चैतन्याने न्हाऊन निघते, रंगांची उधळण होते, नवपालवी आरुढ होते. निसर्गात नवा उन्मेष जागृत होतो. रूक्ष मनाला धुंद करतो. वसंतात सृष्टीची काया फुलून येते. ओसाड रानात वसंताची चाहूल लागते. तशी निराशेची मलूल चादर झटकून आशेची चैत्रपालवी, आपल्यालाही सुखावते.
तसे पाहिले तर सहाही ऋतूत निसर्ग, ऋतुचक्रांचे चांगले-वाईट बदल पचवतो. हिंदू पंचांगाप्रमाणे १२ मराठी महिन्यांना अनुसरून, वसंत (वसंत), ग्रीष्म (उन्हाळा), वर्षा (पावसाळा), शरद (शरद ऋतू), हेमंत (हिवाळापूर्व) आणि शिशिर (हिवाळा) असा ढोबळ मानाने भारतात, ऋतूंचा अंदाज घेतल्या जातो.
ग्रीष्माचा दाह तो उमेदीने स्विकारतो. वर्षा ऋतूतील कोसळणारा पाऊस मनापासून झेलत, तप्त धरा आनंदाने न्हाऊन निघते. आषाढातील नवे धुमारे, श्रावणातील सौंदर्य, शरदाचे चांदणे, हेमंतातील थंडीची शुष्कता आणि शिशिरातील पानगळ...या साऱ्या ऋतुचक्रातील बदलांना निसर्ग सामोरे जातो. स्वतःला तयार करतो. बदलांना सामावून घेतो आणि आपले अस्तित्व अबाधित ठेवतो.
ऋतुचक्राच्या अदलाबदलीचे मनोहर रूप डोळ्यात साठवून निसर्गाला जपणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. अन्य कोणत्याही कृत्रिम उपायांनी स्वतःला सुरक्षित ठेवण्याच्या भोगवादी प्रवृत्तीमुळे, ऋतुचक्रातील या बदलांना नैसर्गिक रित्या सामोरे जाऊन अनुभवण्याची क्रिया माणूस विसरत चालला आहे. यामुळे पर्यावरणाचा आब न राखता निसर्गाचे संतुलन बिघडवण्यास मनुष्यच कारणीभूत ठरतो आहे.
हे असे होऊ नये याकरता ऋतूचक्रांचे हे बदल, आनंदसोहळा म्हणून स्वीकारू या. मग बघा निसर्ग मुक्तहस्ताने सुखसंपदेची उधळण करतो.
ऋतू बदलणारच. बदल हा निसर्गाचा नियमच आहे. कालचक्र सुरू राहणारच. मात्र मनापासून कडू-गोड बदलांना स्वीकारून हा सुख-दुःखाचा जीवनप्रवास अविरतपणे सुरू ठेवणे, हेच आपल्याला ऋतू बदलांना अनुसरून साजरे होणारे हे निसर्गसोहळे शिकवतात. नाही का?.....
© वीणा विजय रणदिवे
