तरूणाईची बदलती मानसिकता
घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती....
तिथे असावा प्रेम जिव्हाळा
नकोत नुसती नाती....
ज्या घरात प्रेमळ, जिव्हाळ्याचा संवाद असेल त्या घरातील नातीही घट्ट असतात .
पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये अनेक नाती खेळीमेळीने नांदायची. काही कारणांनी ती विखुरली तरी सणवार, समारंभात नाती एकत्र यायची. आताशा या सर्व गोष्टी वेळेअभावी फार कमी झाल्या आहेत. नात्यातील गोडवा, त्यातून मिळणारा आत्मविश्वास, वादावादी, रुसवे-फुगवे, परत सर्व विसरून एकत्रितरित्या होणारा जल्लोष.....हे सर्व आजची तरुण पिढी अनुभवतच नाही. त्यामुळे ही तरुणाई एककेंद्रित झाली आहे. घेण्यापेक्षा देण्यातील आनंद त्यांना माहितीच नाही. वादातूनही संवाद निर्माण होतो हेच त्यांच्या गावी नसते. त्या निव्वळ टाइमपास गोष्टी वाटतात. 'आपण बरं आपलं जग बरं ' या एकलकोंड्या प्रवासात निखळ नात्यांच्या सहप्रवासाची मजा ही त्यांच्या दृष्टीने नगण्य गोष्ट असते.
तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या ह्या तरुणाईला आपापसातील संवाद नकोच असतो. या वयात आई-वडिलांपेक्षा, मित्र-मैत्रिणी जवळचे असतात. त्यांच्या विचारांचा प्रभाव जास्त असतो. सोशल साईट्स, विविध गेम्स यांच्या मोहजालात ही तारुण्याच्या उंबरठ्यावर वर असलेली पिढी, गुरफटलेली असते. त्यामुळे आई-वडिलांशी निव्वळ कामापुरता संवाद असतो. बाकी त्यांना त्यांच्याशी बोलायला ही वेळ नसतो.
तरुण वयात येणाऱ्या या मुलांशी संवाद साधणे ही एक कठीण तोंडी परीक्षा असते. मला सारं कळतं ! (माहितीचा स्त्रोत *गुगल* भाई सोबत असतो ना) या भ्रमात असल्याने त्यांच्याशी संवाद साधायला गेलं की - एक तर त्यांच्या कलानं बोलावं लागतं, नाहीतर चूप राहून फक्त त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं.
एखादी गोष्ट कर म्हटलं की ती आपल्या मर्जीने करणार. मी, माझं...यापलीकडेही आपलं, सर्वांचं... हे ही शब्द असतात हे त्यांच्या गावीच नसतं. याला जबाबदार......सोशल मीडियाचा प्रभाव, विविध साइट्सचा सुळ्सुळाट. यामुळे आभासी जगातल्या साऱ्याच गोष्टी त्यांना खऱ्या वाटतात आणि वास्तवातील चांगल्या-वाईट गोष्टी, ही तरुणाई जाणीवपूर्वक मनावर घेत नाहीत. किंबहुना आई-वडील याची झळ त्यांच्या पर्यंत पोहोचू देखील देत नाही.
खेळीमेळीचा असा संवाद साधला जातो तो जेवणाच्या वेळी. सर्वांनी एकत्रितरित्या घालविलेला मनसोक्त वेळ ! मात्र हल्ली जेवणाच्या वेळेस टीव्ही बघत जेवण आटपण्याचे वेड लागले आहे(आवडत्या सिरीयल मिस होतात नाहीतर!) अथवा प्रत्येक जण भूक लागली की ताट घेऊन आपले जेवण संपवतो. त्यामुळे कुटुंबातील संवादाची एक चांगली संधी हुकते.
मित्र-मैत्रिणींमधला संवाद हा तेरा- मेरा या प्रकारचा असतो. त्यामधून चढाओढ निर्माण होते. जिवाभावाची मैत्री देखील कधीकधी एकत्र खाणे, भटकणे, गेम्स खेळणे व चर्चा करणे यापुरतीच मर्यादित असते. संवाद हा फारच परिपक्व मैत्रीत होऊ शकतो असे मला तरी वाटते.
त्यामुळे वयात येणाऱ्या मुलांशी एखाद्या समुपदेशकाप्रमाणे संवाद साधणे फार गरजेचे आहे. अत्यंत एककल्ली, हेकेखोर, समाजभान विसरलेली तरुणाई (अपवाद वगळता ) स्वतःला अलिप्त ठेवतात....जाणून-बुजून!
मागचा पुढचा कसलाही विचार न करण्याची वृत्ती सध्या बळावते आहे. आजचा वर्तमान बिनधास्त जगायचा! पुढच्या ची चिंता नाही. या आविर्भावात ही वयात येणारी मुलं परिणामांची चिंता करित नाही. मात्र अशावेळी एखाद्या चांगल्या वाटसरू प्रमाणे त्यांना त्यांच्या मार्गांची, दिशांची ओळख करून देणे आवश्यक ठरते. कोणते वळण कोणत्या दिशेला नेईल, हे मार्गदर्शन पालकांनीच मार्गदर्शक म्हणून करायला हवे.
त्याकरिता अत्यंत संयम, चिकाटी, धीर (आणि काय काय?) पालकांना जाणीवपूर्वक आत्मसात करावे लागते(कारण आमच्या वेळेस नव्हते हे हार्मोन्सबदल अन् असले तरुणाईचे लाड !असा हेका उपयोगाचा नसतो)
तरुणाईची ही स्पर्धा असते स्वतःशीच....त्यांना स्वतःला सिद्ध करायची ओढ लागलेली असते. आपले मी पण त्यांना दाखवायचे असते, त्यासाठी त्यांची ही तरुणपणाची चुरस असते. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे स्वतःची आभासी जगतात, एक प्रतिमा बनवण्याकरता चाललेली चढाओढ, त्याचा आलेला ताण, त्यातून होणारी चिडचिड, या शर्यतीत त्यांना आई-वडिलांचे बोलणे, काळजी हे सगळं नकोसं वाटतं ...
"मी मोठा झालोय आता,बस करा" हे थोड्याफार प्रमाणात प्रत्येक घरातील ओळखीचे, परिचयाचे वाक्य आहे. मात्र मोठा होणे म्हणजे जबाबदारीने वागणे हे त्यांच्या गावी नसतं. फक्त वयाने मोठे होणे(हार्मोन्सचा बदल) आणि जबाबदारीने वागणे यातली पुसटशी रेषा (सूक्ष्म फरक)त्यांना त्यांच्या कलानं समजून सांगण्यासाठी पालकांना स्वतःचा मोठेपणा विसरावा लागतो. कधी प्रेमाने, कधी अनुभवाच्या दाखल्यांनी समजून सांगताना स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवून परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य आत्मसात करणे इथे आवश्यक ठरते.
मित्रांशी एकएक तास न कंटाळता फोनवर, चॅटवर बोलणारी ही मंडळी पालकांशी दहा मिनिटे देखील संवाद साधत नाहीत. यामागची तरुणाईची मानसिकता मानसिक, शारीरिक, भावनिक या तिन्ही पठडीतील असते.
क्षुल्लक कारणांमुळे आत्महत्येची प्रकरणे वाढीस लागली आहेत. स्वतःला संपविणे हा अत्यंत शॉर्टकट मार्ग तरुणाई अवलंबिते. यामागची मानसिकता काय?
प्रत्येक गोष्ट लगेच मिळणे....ईझीली अव्हेलेबल, यशाचं नको तेवढं कौतुक, अवडंबर ! नकार पचवायला न शिकणे, विस्कटलेली कुटुंबे, विखुरलेली नाती, जीवघेणी स्पर्धा आणि संवादाचा अभाव या सर्वांमध्ये अडकलेली ही तरुणाई.... त्याचप्रमाणे जाती, धर्म, लिंग, वर्ण या सर्व बंधनांपासून मुक्त झालेली तरीही त्याचे समाजातील वर्चस्व... त्यातून निर्माण होणारा ताण अन् मग दिशाहीन आयुष्य!
तरुण मुलांना मानसिक समुपदेशनाची गरज भासणे हे आजच्या प्रातिनिधीक समाजाचे दुर्दैव आहे (पूर्वी तरुणपिढी ही एका उच्च आदर्शाला कवटाळून आयुष्य खर्ची करायची)
आपल्या अपयशाला मनात घेऊन जर काही पालक येणाऱ्या पिढीकडून अपेक्षा ठेवत असतील तर त्या तरुणाईला देखील निराशेच्या गर्तेत शिरायला वेळ लागत नाही. कारणमीमांसा केली तर खूप गोष्टी आहेत...मात्र प्रत्येक वेळेस खापर हे पालकांवर फोडले जाते.
तुलनात्मक स्पर्धेच्या विळख्यात अडकत चाललाय हा समाज ! त्यामुळे स्वतःच्या क्षमता न ओळखता, पालकांच्या अट्टाहासापायी निराशेच्या सापळ्यात अडकतात आणि आई-वडिलांचे ऐकेनाशी होतात... त्यामुळे मानसिकता बदलण्याची सुरुवात समाजापासून न होता प्रत्येक कुटुंबातून व्हायला हवी.
त्याला स्वतःला, स्वतःची ओळख होऊ दे तरच त्याची ओळख, त्याला मिळेल ! ही खूणगाठ मनाशी धरायला हवी. कधीकधी अतिकाळजी हे पण एक धोक्याचे वळण असते. त्यातून सेल्फ पॅम्परिंग हा गुण वाढीला लागण्याची शक्यता जास्त असते...स्वतःचं काही चुकलं तरी ते मान्य न करता दुसऱ्याच्या दोषाकडे बोट दाखवून स्वतःला योग्य म्हणवून घेण्याची ही सवय खूप घातक असते. दिवसेंदिवस ती वाढीला लागते.
अशा वेळी शांतपणे (रिऍक्ट न होता) त्यांची चूक त्यांना दाखवून देता आली पाहिजे. पाठिशी घातले की ही मुले अधिकाधिक स्वकेंद्रित होत जातात. त्यामुळे प्रत्येक घरात एकट्यादुसऱ्या मुलांचे पुरविले जाणारे अतिलाड, अतिकाळजी हे कमी व्हायला हवे. यामुळे सशक्त तरुणपिढी निर्माण होण्याऐवजी, स्वकेंद्री आणि स्वार्थी तरुणाईची संख्या बळावते आहे.
परत एका अतिशय गंभीर मुद्द्याकडे वळूया....अपयशाला सामोरे न जाता येणे. मुळातच यशाचं अतिकौतुक हे हल्लीच्या कुटुंबव्यवस्थेचा एक भाग झाला आहे.
मुलाला स्पर्धेत पाठवितांना अथवा कोणत्याही परीक्षेला सामोरे जातांना, आमिषे दाखविली जातात ती जिंकण्याची! आणि यशाची त्यांना चटक लागते. मात्र *अपयश* ही दुसरी बाजू देखील स्वीकाराहार्य असते, या वास्तवदर्शी दृष्टिकोनाची त्यांच्यात रुजवातच नसते. मग अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही की व्यसनांच्या आहारी नाहीतर निराशेच्या गर्तेत!
असं का व्हावं ? याची पायाभरणी प्रत्येक कुटुंबातून, प्रत्येक नात्यातून व्हायला हवी.
मनमोकळा संवाद साधून निकोप स्पर्धा, यशाचं दडपण नसलेलं वातावरण, निर्माण करणं हे जमेल तोवर पालकांच्या हाती असतं( बाकी अवतीभवतीच्या परिस्थितीवर!)
नाही म्हणायला आजूबाजूच्या वातावरणातून स्पर्धेच्या या जगाशी जुळवून घेताना काही गुण-अवगुण ही मुलं स्वतः आत्मसात करीत असतात. मग प्रत्येक वेळी कुटुंबच जबाबदार नसते. अशा वेळी मात्र कुटुंबाशी असलेला *संवादाचा* धागा मात्र तुटायला नको.
प्रत्येक वेळेस समुपदेशकानेच अलिप्त राहून संवाद साधून मनोविकार ओळखणे क्रमप्राप्त नसते. कधी प्रत्येकाने पुढाकार घेऊन संवादाशी फारकत झालेल्या या तरुणाईला त्यांच्या कलाने घेऊन या स्पर्धेच्या युगात स्वतःला टिकून ठेवण्याकरता मोकळा श्वास घेऊ द्यावा....
तरच तरुणाईची मानसिकता, हे पिढी दर पिढी तले अंतर मोडून काढीत स्वतःशी आत्मसंवाद करायला बाध्य होईल .
निरामय आरोग्य, सुजाण वाचनसमृद्धी, सामाजिक भान, वैचारिक परिपक्वता या थोड्याफार गुणांची जोपासना तरुणाईची मानसिकता बदलण्यास भाग पाडेल आणि तेव्हाच सशक्त विचारांची पिढी आपोआप घडेल अशी आशा करूया.
©® वीणा विजय रणदिवे.
