पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अनुभवण्यातील सुंदरता

            ‌           हल्ली व्हाट्सअप उघडलं की स्टेटस आपोआप बघितले जातात. अर्ध्या अधिक स्टेटस मध्ये, अगदी भरभरून एक नाही, दोन नाही, अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत फोटोंचा ओघ सुरू असतो.
                       पर्यटनाला गेले की कधी एकदा कॅमेऱ्यात निसर्ग (तो दाखवण्यापुरताच! सोबत पोझ देऊन सुंदर तयार झालेलो आपण) बंदिस्त करतो आणि तो अपलोड करतो याची घाई झालेली असते.
                        कुठे फिरायला जरी गेले तरी तिथले फोटो, व्हिडिओ काढण्याचीच जास्त हौस असते. कार्यक्रम, समारंभ असेल तर स्वतःला सुरेख भासेल अशा अँगलने उभे राहून विविध पोझ घेऊन ते क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यात सारेच व्यस्त असतात.
                       कधी रिल्स, कधी लांबच लांब व्हिडिओ, स्लोमोशन तर कधी सेल्फी, कधी ग्रुपस्टाईल, असे निरनिराळे फंडे वापरून मोबाईलचा पुरेपूर वापर केला जातो. (Data, डेटाने मान खाली टाकली की नंतर empty, रिकामी जागा करण्यासाठी delete, डिलीट ही केल्या जातात. नाहीतर पीसीवर त्यांची रवानगी होते.)

                       स्मार्टफोन ने 'कॅमेरा' नामक दिलेल्या अदभूत जादुई चिराग मधून मनसोक्त आनंद घेतल्या जातो. त्यामध्ये अंतर्भूत निरनिराळे एडिट ऑप्शनस, ॲप्स, फिल्टर्स यांचा वापर करून फोटोज व्हिडिओज एडिट केली जातात. इथवर न थांबता, आभासी जगाला दाखविण्याच्या तीव्र इच्छेपायी विविध सोशल माध्यम स्टेटस स्टोरी पोस्टकडे त्यांचे स्थानांतरण करण्याचा ओघ सुरू होतो.


                   ‌‌अधिक लाईक्स कमेंट्स फॅनफॉलोवर्स करता विविध साइट्सवर रिल्स बनवून 'रीच' वाढवण्यासाठी, स्टोरी पोस्ट बनवून त्यांना या आभासी विश्वाला दाखवण्याची अतीव घाई झालेली असते.
             ठीक आहे! यातून आनंद मिळतो. मात्र लाईक्स किती? कमेंट्स काय? हे पाहण्याची उत्सुकताही स्वस्थ बसू देत नाही. आणि ही मानसिकता सोशल मीडियावर फोटो टाकण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही. ही साखळी चालूच राहते आणि हा प्रकार दिवसेंदिवस या ना त्याप्रकारे वाढतच राहतो.

            हे कृत्रिम समाधान म्हणजे 'आभासी' जगाने दिलेला आनंदाचा 'आभास' आहे. या आनंदात जसजसे आपण रमतो तसतसे ते अधिकाधिक पुरवून लाईक्सचा आकडा बघण्यात, कमेंट्सवर प्रतिक्रिया देण्यात आपण धन्यता मानतो आणि हे एडिक्शन addiction कधी आपला कब्जा घेतं आणि दिवसाचा वेळ गिळंकृत करतं, हे आपणास कळत सुद्धा नाही.
          मग अगदी एखादा अनुचित प्रसंग, घटना घडली तरी प्रथमतः ती आपणच पोस्ट केली पाहिजे या हव्यासापोटी अक्कलशून्य जमाव मूर्खासारखा गर्दी करून फोटो काढत सुटतो.

        हल्ली तर प्री-वेडिंग शूट, बेबी शॉवर, आता आता तर म्हणे हनिमून शूट(!) या गोष्टी इतक्या वरच्या स्तराला गेलेल्या आहेत की त्या नाजूक तरल हळव्या क्षणांना, प्रसंगांना फोटोग्राफरच्या इशाऱ्याने कॅमेऱ्यात कैद करण्याची लालसा वाढतचं चालली आहे.
        या सुंदर क्षणांना पुरेपूर अनुभवून आपल्या निसर्गदत्त मेमरीत जतन करून तो 'अमूल्य ठेवा' आठवणींना समृद्ध करतो, ही जाणीवच मुळी हल्ली होत नाही. आपल्यासाठी व आपल्या जिवलगांसाठी ते क्षण किती अनमोल असतात ते याप्रकारे घालवणे म्हणजे वेळेचा दुरुपयोग आणि पैशाचा अपव्यय आहे, याचा सोयीस्करपणे विसर पडत चाललाय.

           सध्याच्या भौतिकवादी जीवनात प्रसंगानुरूप आपण किती वरचढ आहोत! हे दाखवण्याची जणू चढाओढच लागली आहे. पैसा हातात आल्याने एका मर्यादेपर्यंत हे ठीक आहे, मात्र याकडे आपण जेव्हा जास्त लक्ष देऊ लागतो तेव्हा निखळ आनंदाला पारखे होतो.


        त्या क्षणांचा आनंद आपल्यासाठी किती खास असतो, तो परत परत अनुभवता येत नाही मात्र तो आनंद आपण दुसऱ्यांच्या नजरेत शोधतो. त्या क्षणाला नैसर्गिक रित्या फुललेले सौंदर्य, कृत्रिमरित्या सजवलेल्या बाह्यआवरणांनी दबून जाते.

            कधी कधी विचार येतो- आपल्या जीवनात काय सुरू आहे? आपण किती मजा घेतो आहे? याची खबरबात लोकांना पुरवून आपण आभासी आनंद मिळवतो. मात्र हा आनंद बघण्यात लोकांना खरंच रस असतो का?? अपवाद सोडले तर काहीअंशी ही मत्सराची बाब बनते. तुलनात्मक दृष्टी तयार होते. खरे सुखाचे, मानण्यापेक्षा दिसण्यावर दाखवण्यावर, पारडे तोडले जाते. सुखाची व्याख्याच बदलते.
        
             दरवेळी फोटो काढायचे आणि टाकायचे याची खरोखर नितांत गरज आहे का? हा प्रश्न काही अंशी पडायला हवा. आपण जेव्हा हे क्षण टिपण्यात व्यग्र होतो तेव्हा त्या 'क्षणांचा आनंद' मोबाईलच्या कॅमेऱ्याच्या दृष्टीनेच घेत असतो. आपले नटणे बाह्य आभूषणांनी सजणे हे अति होऊ लागलंय.
          वेगवेगळ्या अँगलने मोबाईलचा कॅमेरा फिरवून फिरवून आपण तो आनंद मिळवत असतो. त्यामुळे त्या क्षणांचा, त्या प्रसंगांचा 'अनुभव' आपल्याला घेताच येत नाही..भेटण्यातली मजा अनुभवताच येत नाही..गप्पांचा ओघ रिता करण्याकरता वेळच मिळत नाही...बाहेर पडून, मोकळ्या झालेल्या मनाला आपण परत कॅमेऱ्यात बंद करण्यासाठी बाह्यरूपाला सजवून आंतरिक सौंदर्य लपवतो आणि अधिकाधिक मन संकुचित करतो. हल्ली बहुतेक ठिकाणी बहुतांश वेळा हे असंच दृश्य बघायला मिळतं.

              आपण कुटुंबाबरोबर, मित्रपरिवारासोबत, समवयस्क मंडळींबरोबर बाहेर फिरायला जातो; त्यांच्या सोबतीचा आनंद आपण अनुभवतच नाही. जिथे गेलो आहोत त्या ठिकाणचे निसर्गसौंदर्य नजरेने टिपतच नाही. डोळ्यात अद्भुत सौंदर्याची खाण साठवतच नाही. मोबाईलच्या कॅमेऱ्यात बंद करण्याचीच धडपड फक्त चाललेली असते.

          सूर्यास्ताची गरिमा, लाटांचा गूढ आवाज, निसर्गाच्या सानिध्यातील शांतता प्रसन्नता, तुषार अंगावर घेण्याची बालिश मजा, जंगलातील पशु पक्षी प्राणी यांच्या हाकेच्या अंतरावरील सानिध्याची ऊब, नजरेत साठवण्यासारखे हिरवेगार सौंदर्य, पर्वतांचे ध्यानस्थ दर्शन, पक्ष्यांचे रव, प्राण्यांचा अद्भुत देखाव्यांचा सहवास.... असा सारा निसर्गसदृश खजिना आपण पुरेपूर लुटतच नाही

.
          आपण कुठे आहोत, काय करतो आहोत, कसे दिसतो आहोत हे इतरांना दाखवण्याच्या अतीव इच्छेमुळे, आपल्या खूप काही छोट्या छोट्या गोष्टी बघायच्या, अनुभवायच्या राहतात. प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याची आपली धडपड चालली असते. मात्र तो क्षण मुक्तपणे अनुभवावयास हवा ही भावनाच आपल्या मनात येत नाही.
         येणारे सारेच अनुभव वाटून टाकण्यापेक्षा, काही आपल्या समाधानासाठी, मिळवता येणाऱ्या निखळ आनंदासाठी, आपल्यापुरते आपल्या जिवलगांपुरतेच राखून ठेवायचे असतात. आपल्या नजरेतून आनंद टिपायचा असतो. डोळ्यात साठवायचा असतो. मुक्त मनाने अनुभवायचा असतो. काही क्षणांकरता तो आपलासा करायचा असतो‌. 'कल हो ना हो' असे म्हणून आजच्या अनुभवातून मिळणारा आनंद खरा असतो. समृद्ध करणारा असतो. अनुभवण्यातील सुंदरता प्रतिमेहून छायाचित्राहून अप्रतिम असते. अवर्णनीय असते.

            वेळ मिळाला तर जपणूक म्हणून आठवणींचा खजिना म्हणून कॅमेऱ्याच्या डोळ्यांनी तो साठवूनही ठेवावा. मात्र धडाधड निव्वळ फोटो काढणे, ते सोशल मीडियावर टाकणे, त्यावर लाईक प्रतिक्रिया येणे आणि नंतर ते डिलीट होणे (दुसऱ्या फोटोंकरता जागा!) हा केवळ आभासी तात्पुरता आनंद आहे. मोबाईल मध्ये आपण आपले जग साठवायला निघतो मात्र मोबाईल हे आपले प्रत्यक्षातील जग नाही. आपले जगणे नाही. तो कृत्रिम आभास आहे. आभासी कृत्रिम आनंद मिळवण्यापेक्षा अनुभवातून मिळणारा खराखुरा आनंद, हा जगणे समृद्ध करतो. निसर्गतः अनुभवलेला आनंद, त्यातून मिळालेली मनःशांती, प्रसन्नता आयुष्याच्या शिदोरीला क्षण अन् क्षण पुरते.
दुसऱ्याला दाखवण्याच्या नादात, आपण त्यावेळी त्या क्षणांचा खरोखर आनंद घेतला का? ते सुख अनुभवले का? आयुष्याच्या धावपळीतून, रटाळ जगण्यातून काढलेले ते चार घटकेचे आनंदी क्षण-ज्याच्याकरिता इतका अट्टाहास केला...ते हृदयात साठवले का?..ते क्षण आपण त्यावेळी मनोमन जगलो का??  हे प्रश्न स्वतःपुरते तरी स्वतःलाच केले पाहिजेत. हो ना!

©® वीणा विजय रणदिवे 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू