पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मनमर्जी

         "कोण काय म्हणेल?" याचा विचार न करता वागायचं ! सध्या या वाक्याचं खूप फॅड आलंय! 
होय,फॅडच म्हणू या ! आधुनिक युगातील परवलीचा शब्द !
 सध्या या वाक्यावरील चर्चेला उधाण येत आहे. म्हणजे चर्चा करणार्‍यांना असं म्हणायचंय की -- "लोक काय म्हणतील" याचा विचार करू नका...आपल्या मनाला वाटेल तसे वागा.... अगदी बिनधास्त !
 अरे हो कळतंय. आयुष्य खूप छोटं आहे आणि आपल्या मनाप्रमाणे ते जगावं . मान्य आहे , पण कधीकधी याचा अर्थ.‌. बरेच जण 'मनाप्रमाणे वागायचं' म्हणजे इतर कोण दुखावले गेलेत तरी चालेल ! पण मी , आपल्या मनाप्रमाणे, माझ्या मनाला वाटेल तसेच वागेल , वाटेल तसेच बोलेल ! असा घेतात . 'मी माझी स्वतंत्र आहे' हवं तसं वागायला, बोलायला! कुणाला वाईट वाटत असेल तर तो माझा दोष नाही !.....असा उद्धट सुर लावून या वाक्याचा तर्क काढायचा.. आणि मनाला येईल तसे वागायचे...
 हो वागा ! आपल्या मनाप्रमाणे वागा पण लोकांच्या निदान आपल्या आजूबाजूच्या, जिवाभावाच्या , आपल्या माणसांचा तरी विचार करा .त्यांच्या विचारांचा आदर करा, त्यांचे मन जपा , माणसे दुरावू नका , मन दुखवू नका.

 अहो! माणूस समाजात का म्हणून राहतो ?समाजात राहतो तर समाजभान, सामाजिक बांधिलकी, समाज मूल्ये जपणे... हे ओघाने आलेच .

 चारचौघात मला आवडते म्हणून अंगप्रदर्शन करणे योग्य आहे का? 'लोक काय म्हणतील?' याचा जरी विचार केला नाही , तरी आपण या समाजाचा भाग आहे... ज्या भारतीय समाजात आपण वावरतोय त्याप्रती आपलेही काही कर्तव्य आहे... जबाबदारी आहे....याचे भान ठेवून वागणे गरजेचे आहे. गरिबांच्या अंगावरील फाटक्या चिंधी कडे दुर्लक्ष करून , स्वतःच्या मस्तीत मशगुल होत, फॅशनच्या नावाखाली महागडे , चिंधी टाईप कपडे परिधान करायचे , उघड्या अंगाचा तोरा मिरवायचा , आपल्याच नादात फोटो काढीत उन्मुक्त भटकायचे... याला काय म्हणायचे? हीच आधुनिक समाजाची, स्वतंत्र विचारांची व्याख्या ??

 आपली सामाजिक मर्यादा सांभाळून वागणाऱ्यांना हीच लोकं, पारंपारिक मागासलेल्या विचारांची म्हणून लेबल लावतात... आपले प्रगल्भ विचार व्यक्त करतांना जी व्यक्ती सामाजिक भान ठेवते ती व्यक्ती , त्यांच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र , आधुनिक विचारांची नसून , विचारांचे मागासलेपण जपणारी ठरते.

 "आम्ही फटकळ आहोत , जे मनात येईल तेच बोलू , कुणाचा विचार कशाला करायचा ? "असे म्हणणारे लोक, दुसऱ्यांच्या मनाला दुखावून, स्वतःचं मोठेपण सिद्ध करीत नाही.
 जी व्यक्ती स्वतःपुरतं न बघता, आपल्या अवतीभवतीच्या, थोरामोठ्यांच्या , भावभावनांचा विचार करून वागते...बोलते... ती व्यक्ती समाजात चांगली विचार मूल्ये पेरते. आपल्या वागण्या बोलण्याने सार्‍यांची मने जिंकते . पुढच्या पिढीवर आपल्या आचरणाने आदर्श संस्कारांचे ठसे उमटविते. आणि हा नासलेला समाज...घसरत चाललेली नैतिकमूल्ये... चांगल्या विचार-गुणांची पायमल्ली... यामुळे बरबटलेल्या नैराश्यजनक वातावरणात , आपल्या वागणुकीने आशेची उमेद ठरते आणि अशी समाजभान असणारी व्यक्ती आजही सशक्त समाजाची पायाभरणी करते . 
कुटुंबाला बांधून ठेवते...स्वतःसोबत इतरांवरही प्रेम करायला शिकवते... स्वतःसोबत दुसऱ्यांच्या मतांचा आदर करते... स्वतःसोबत सभोवतालच्या, आपल्या माणसांच्या, मनाचा विचार करते... आपल्या आचरणाने तोडणे नव्हे तर माणसे जोडणे शिकवते....

 स्वतःच्या मनमर्जीप्रमाणे वागतांना, कुणी आपल्यामुळे दुखावल्या जाऊ नये हा विचार अवश्य करा. इतरांच्या मतांचा विचार, भावनांचा आदर करायचाच नाही!... स्वतःपुरतेच जगायचे!... या आणि अशा वागण्या बोलण्याने आपुलकीची , माणुसकीची भावना नकळत लोप पावते आहे . समाजव्यवस्था मोडकळीस येते आहे .
 'मी'पणा (माझे , मी ,मला)जपून , स्वतंत्र मुक्त जगण्याचे हे वेड !माणसाला माणसापासून दूर करते आहे . या अलिप्तपणाच्या कक्षा अधिकाधिक रुंदावत आहेत . प्रत्येकजण स्वतंत्र मताच्या नावाखाली आपलीच संस्कार मूल्य धुळीस मिळवतोय .

 जगा मनसोक्त जगा.... पण आपल्या निखळ आनंदात माणसांची गरज असू द्या . मग बघा , हीच लोकं दुःखातही तुम्हांस एकटे पडू देणार नाही ‌‌. 
लोकांचा विचार न करता वागलात तरी चालेल पण कुणाला न दुखावता, वागण्याचा बोलण्याचा प्रयत्न करा . त्याकरिता तुमच्या स्वतःपुरत्या स्वतंत्र विचारांना थोडीशी मुरड घातली तर काहीही बिघडणार नाही ‌. मात्र त्यामुळे नाती बळकट होतील ‌. माणूसकीची पेरण होईल . माणूस माणसाला दुरावणार नाही . 

 आपलं मानून , जगून तर बघा... मग हे आयुष्य उत्कटतेने जगतांना स्वतःपुरते जगण्याचा विचारही मनात येणार नाही . इतरांच्या नजरेत तुम्हाला सुख शोधता येईल . आणि जगण्याचा खरा अर्थ उलगडण्यास मदत होईल .
झिजूनी स्वतः चंदनाने 
दुसऱ्या मधुगंध द्यावा 
हे जाणता जीवनाचा 
प्रारंभ हा ओळखावा...

©® वीणा विजय रणदिवे ✍️


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू