पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

निरोप २०२३


#निरोप२०२३चा

वर्ष येतात जातात. नविन अनुभव देवुन जातात.२०२३ हे वर्ष मला संमिश्र गेले. खुप काही शिकवून गेले. कर्म करणे आपले कर्तव्य आहे पण फळाची अपेक्षा करु नये. कुठल्याही गोष्टीचा गर्व करु नये किंवा अपयशाने खचूनही जाऊ नये.कारण कुठलेही यश किंवा अपयश कायम स्वरुपी नसते. आज आपण कुठल्या गोष्टीत पहिल्या क्रमांकावर असलो तर उद्या दुसरा तिथे जाईल. स्वतःची तुलना स्वतः शीच करावी. काल पेक्षा आज किती समृद्ध झालो हेच बघावे. परिवर्तन हाच जगाचा नियम आहे. या सर्व गोष्टी जाणारे वर्ष आपल्याला शिकवतात.

यावर्षी पहिल्यांदा ३० जानेवारीला लास्ट संडे ऑफ मंथ च्या marathon मध्ये १० किमी पळाले. म्हणजे च चालले. "आरोग्यं धनसंपदा त्यामुळे पहिले आरोग्य नंतर बाकी गोष्टी."तसेच जानेवारी महिन्यात योग शिक्षकांसाठी  आयोजित केलेले "बाल संस्कार टीचर ट्रेनिंग" योग विद्याधाम ,नाशिक व्दारे घेण्यात आलेले पूर्ण केले.

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पहिल्यांदा  लग्नाच्या एकोनवीस वर्षानंतर मैत्रिणीसोबत शिर्डीला गेले. साईबाबांचे दर्शन घेवून धन्य झाले.

मार्च महिन्यात पहिल्यांदा थायलंडला आंतरराष्ट्रीय ट्रीप केली. खुप छान अनुभव आला. बँकॉक, पटाया येथील प्रेक्षणीय स्थळे बघितली. पटाया येथे सी वॉक म्हणजेच समुद्राच्या आत सहकुटुंब चालण्याचे धाडस केले. डर के आगे जीत है याची प्रचिती आली. तसेच या महिन्यांत शॉपिझन द्वारे मी माझा पहीला कविता संग्रह "आयुष्य हे न उलगडणारे कोडे" प्रकाशित केला. याच महीन्यात स्टोरी मिरर च्या सांज तरंग या कविता संग्रहात माझी कविता मैत्रीचे झाड प्रकाशित झाली.

एप्रिल महिन्यात पाच वर्षांनी भाऊ अमेरिकेहून आला. त्यानिमित्ताने गावी गेट टुगेदर झाले. माहेरचे दैवत अमरावती जिल्ह्यात लखमाजी बुवा आहे. तिथे विदर्भ स्पेशल रोडगे पार्टी झाली.

मे महिन्यात एका महिलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली. मे महिन्यात या स्पर्धेचे मुंबईला फिनाले होते पण काही वैयक्तिक कारणामुळे जाऊ शकले नाही.

जून महिन्यात माझ्यातली मी हा फेसबुक गवसला. त्यावर तसेच अजुन अनेक फेसबुक ग्रुप वर लिखाण करु लागले. तसे मी लिखाण २०१४ पासुन करते. पण माझ्यातली मी मुळे लिखाणाला सातत्य आले. किमान आठवड्यातून एकदा तरी लिहिते. तसेच एका  ऍप साठी पेड लिखाणाला सुरवात केली. तसेच जुन महिन्यात वारीचे दर्शन घेतले.२२ जुनला मी आणि माझी मुलगी गावी लग्नाला गेलो. तेव्हा मुलाची दहावी असल्यामुळें त्याला घरी त्याच्या बाबांजवळ ठेवले. तेव्हा आम्ही गावाजवळ म्हणजेच पुण्याहून अकोल्याला जात असताना मुलाचा सायकलने शाळेतून परत येताना अपघात झाला. त्यात त्याचा उजवा हात फ्रॅक्चर झाला. दैवयोगाने त्याचे बाबा घरी असल्यामुळें लगेच दवाखान्यात नेवून सर्जरी केली . हातात सपोर्ट ला रॉड टाकले. पण देवाने खुप मोठ्या संकटातून वाचवले. त्याचे बाबा आणि तो दोघेच दवाखान्यात होते. मी दोन दिवसानी लग्नाला जावून परत आले. दोन दिवस त्याला एकट्याला कसे सोडले माझे मला माहीत. त्याला १ महिना प्लास्टर होते. त्याची पहिली युनिट टेस्ट होती. ती त्याला राईटर घेवून द्यावी लागली. एक महिन्यांनी प्लास्टर निघाले. तसेच जुन महिन्यात शॉपिंझन द्वारे माझा पहीला कथा संग्रह "अंतरंग मनातील कप्पा"प्रकाशित केला.

जुलै महिन्यांत अधिक महिण्यानिमित्त १००८ जोडप्याचा सामूहिक दत्तयाग होता.त्यात आम्ही दोघे सहभागी झालो. खुप छान अनुभव होता.

ऑगस्ट महिन्यात एक मंगळागौरीच्या ग्रुप जॉईन केला.पण आयुष्यात कधी डान्स केला नसल्यामुळे ते खेळ मला जमले नाहीत त्यामुळे त्या ग्रुप मधुन महिनाभर सराव करून निघाले.निघाले म्हटल्यापेक्षा काढून टाकले.ऑगस्ट महिन्यात परत त्याच्या बाबांनी त्याला स्कुटी चालवायला लावली तेव्हा त्याचा अपघात झाला आणि डाव्या हाताला प्लास्टर लागले. यावेळी हेअर क्रॅक होते. परत तीन आठवड्यांनी प्लास्टर काढले.

सप्टेंबर महिन्यात महालक्ष्मी साठी अकोल्याला गेले. माहेरी मोठा महालक्ष्मीचा कार्यक्रम असतो पण मुलांच्या शाळेमुळे खुप कमी वेळा जायला मिळते. यावर्षी परीक्षा झाल्यामुळे जाणे शक्य झाले. अकोल्याला जातांना शनी शिंगणापूर चे दर्शन घेतले.

ऑक्टोबर महिन्यात गोवा ट्रीप केली. तिथे मुलीने पहिल्यांदा पारासेलिंग केले. मंगेशीचे ,शांतादुर्गा चे दर्शन घेतले. नोव्हेंबर महिन्यात मागच्या वर्षी अहोचा हात फ्रॅक्चर झाला होता त्यांच्या हातातही रॉड होता. तो रॉड काढण्याची सर्जरी झाली.

डिसेंबर महिन्यात मी फिटीस्तान चे १७ तारखेला marathon होते त्यात दहा किमी पळाले. पळाले म्हटल्यापेक्षा चालले.वर्षाची सुरवात आणि शेवट दोन्ही marathon नी झाला.२४ डिसेंबर ला गीता जयंती च्या दिवशी मुलाचे हातात जे रॉड टाकले होते ते काढण्याची सर्जरी झाली. त्या दिवशी मी पहिल्यांदा गीतेचे पारायण केले. यावर्षी ज्ञानेश्वरीही लिहायला सुरवात केली पण दहाच अध्याय लिहिले. आयुष्यात संकट येतात पण अध्यात्म केलें की त्यातुन मार्ग निघतो. तसेच देवच त्या संकटातून निघण्याची शक्ती देतो याची यावर्षी प्रचिती आली. देवाची मी आभारी आहे त्यानेच मला संकटातून वाचवले.

©️ स्वाती वक्ते

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू