पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं

डॉ. गिरीष गायकवाड

मराठी विभाग

द महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी ऑफ बरोडा

वडोदरा, गुजरात – ३९० ००२

भ्रमणध्वनी: ८३०८३११८५८

इमेल: ggaikwad952@gmail.com

दिनांक: २९/०२/२०२४

 

 

एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं

 

          “नमस्ते सर! तुम्ही अमीर खानच का?” लग्न मंडपाकडे जाता जाता अचानक अमीर खान दिसल्यानं मी विचारलं. अगदी सामान्य माणसासारखे ते एका खाटेवर बसले होते. त्यांच्या बाजूला करीना कपूर बसल्या होत्या. त्यांच्याकडे बघितल्यावर लक्षात आलं की, ते खरोखरच अमीर खान आहेत.

          मी परत आश्चर्यानं विचारलं, “एक गोष्ट विचारू सर?”

          त्यांनी माझ्याकडे बघत म्हटलं. “हो. विचार.”

          “तुम्ही ‘गजनी’सारख्या चित्रपटात तर खूपच हट्टेकट्टे दिसता. आणि आता असे का मरगळल्यासारखे बसला आहात?” मी दोन्ही बाह्या उंचावून, छाती फुगवून, त्यांच्या बॉडीची अॅक्शन करत बोललो. कारण ते अगदीच हडकुळे, अशक्त, मरगळल्यासारखे तोंड वाकडे करून बसले होते. आणि म्हणूनच कदाचित लोकं त्यांच्या आसपासही नव्हते.

          तेवढ्यात मला समोरच्या एका माणसाने हाक मारली. ते गृहस्थ जवळ असूनही मला त्यांचं बोलणं नीट समजलं नाही. हा माझ्या कानाचा दोष असावा म्हणून मी माझ्या उजव्या हाताच्या करंगळीला कानाच्या दिशेने हाकलले. पण काय तर कर्णद्वार चक्क बंद होते. करंगळीला आत जाता येईना. मी घाबरलो. कारण कानात कोळशासारखा काळाकुट्ट पदार्थ घट्ट चिकटून बसला होता आणि तो क्षणाक्षणाला वाढत जात होता. हळूहळू तो आतमध्ये प्रवेश करत होता. मला काहीही सुचलं नाही. क्षणात मी अमीर खान, करीनाला विसरून घरात घुसलो. गळा दाटून आला, डोळ्यांतून अश्रुधारा आपोआपच वाहू लागल्या. मृत्यू काही क्षणात माझ्या अगदी जवळ येऊन ठेपल्याचे दिसत होते. मी सैरावैरा होऊन खोल्यांमागून खोल्या ओलांडत पळत होतो. बायको स्वयंपाक घरात असेल म्हणून तिकडे पळत सुटलो. पण तिथेही ती नव्हती. बायको झोपण्याच्या खोलीत असेल म्हणू तिकडे गेलो. पण तिथेही ती नव्हती. मग नवरीच्या खोलीत साज शृंगार करत असतील म्हणून तिकडे गेलो. पण तिथेही ती नव्हती. शेवटी बैठकीच्या खोलीकडे डोकावून बघितलं, तिथे अनेक बायका होत्या. त्याच खोलीच्या एका कोपऱ्यात माझी बायको दिव्यात वात घालतांना दिसली.

          मी हळूच आवाज दिला, “स्वप्ना!”

          माझ्या आवाजाचा सूर बदललेला होता. तो रडका होता, मदतीचा होता, दुःखाने कळवळणारा होता. एवढ्या गर्दीतही माझ्या बायकोने माझ्या आवाजाची आर्तता ओळखली. ती धावतच माझ्याजवळ आली. माझ्या तोंडून शब्द फुटेना म्हणून मी तिच्या हाताला धरून बाजूच्या खोलीत घेऊन गेलो. एकीकडे रडत होतो. रडता रडता मी तिला माझा कान बघायला लावला. तेवढ्यात आमच्या मागे मागे आईही खोलीत आली. कदाचित तिनेही माझी स्थिती जाणली असावी.

          दोघीही माझा कान बघायला लागल्या. तो काळाकुट्ट पदार्थ आता तेल लावून नरम केल्यासारखा वाटत होता. एखादं जेली चॉकलेट माझ्या कानात ठेचून ठेचून भरवलं आहे असं वाटत होतं. मी माझ्या हाताच्या बोटाने तो पदार्थ, तो जीव थोडा थोडा नखलून बाहेर काढत होतो. तो भयानक जीव खाली पडताच वळवळत होता, जमिनीवर पसरत होता, हातपाय नसलेला लबलबीत आणि भयानक दिसत होता.

          त्या भयानक जीवाला पाहून माझाही जीव घाबरला होता. अशा स्थितीतच मी रात्री अडीच वाजता अंथरुणातून उठून बसलो. झोपेत असतांनाही नकळत माझा हात कानाकडे गेला. पण त्यावेळी माझा कान सुरक्षित होता. कारण तो भयानक काळाकुट्ट जीव माझ्या स्वप्नात आला होता.

          म्हणतात स्वप्न अशीच पडत नाहीत. त्यामागे आपल्या गत आयुष्याचे धागेदोरे जोडलेले असतात. हे धागेदोरे शोधता येतात का? त्यांची उकल करता येते का? तर कदाचित ‘हा’ असं उत्तर आपल्याला देता येईल. अर्थात या स्वप्नांची उकल करणं इतकं सोपं नाही. इतिहासात काही महत्त्वाच्या घटना घडून गेलेल्या असतात. कालांतराने त्यांचा शोध घेण्याची इतिहासकारांना गरज वाटू लागते. पण तीनचारशे वर्षांपूर्वीचा इतिहास किंवा तीनचार हजार वर्षांपूर्वीचा इतिहास जसाच्या तसा शोधनं कठीण असतं तसंच आपल्याला स्वप्नांबद्दलही सांगता येईल.

          स्वप्नात घडलेल्या घटना आपल्या खऱ्या जीवनात कधीना कधी घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतात. काहींच्या मते आपल्या मनातील राग, द्वेष, दुःख, विचार, भावना जे आपण दुसऱ्याला सांगू शकत नाहीत. ते आपण आपल्या मनाच्या एका कप्प्यामध्ये साठवून ठेवत असतो. मग कधीतरी त्यांना स्वप्नांच्या माध्यमातून मोकळे करत असतो.

          मीही प्रस्तुत ठिकाणी मला पडलेल्या वरील भयंकर स्वप्नाचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या स्वप्नातील अमीर खान किंवा करीना महत्त्वाची नाही. माझ्या घरात जे लग्न होतं, ते कोणाचं होतं तेही नीट लक्षात नाही. म्हणून तेही महत्त्वाचं नाही. मुळात माझ्या घरातल्या कोणाच्या लग्नाला अमीर खान किंवा करीना येतील अशी सुतराम आशा नाही. ही सगळी गौण दृश्य होती. माझा जीव ज्या भयंकर काळ्याकभिन्न दिसणाऱ्या आणि हातपाय नसलेल्या, जमिनीवर पसरत जाणाऱ्या जीवाला पाहून घाबरलं ते मुख्य दृश्य होतं. याच बद्दल आपण चर्चा करू.

          कधी कधी आपण आपली चूक नसताना एखाद्याच्या रागाला किंवा द्वेषाला बळी पडतो. खास करून आपण जेथे काम करतो त्या ठिकाणच्या वरिष्ठांकडून आपल्याला नेहमीच असा अनुभव येत असतो. अशा वेळी आपले मित्र, मैत्रिणी, सहकारी किंवा कुटुंबीय आपल्याला नेहमीच एक मंत्र सांगत असतात. ‘जाऊदे ना, एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं.’ माझ्याही बाबतीत काल असाच एक प्रसंग घडला. मलाही एका वरिष्ठाकडून माझी काहीही चूक नसतांना, काही दोष नसतांना ऐकावं लागलं. मी खूप विचार केला की, माझी नेमकी कुठे चूक झाली? कोणती चूक झाली? चूक किती महत्त्वाची होती? कोणत्या स्वरुपाची होती? ही पहिलीच चूक होती की दुसरी? त्याचा परिणाम काय होईल? अशा अनेक दृष्टीकोनातून विचार केला. पण मला माझी कुठेही चूक झाली नसल्याचेच दिसत होते. मग मी स्वतःलाच समजावलं की, जाऊदे झालं ते झालं. ‘एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं.’

          खऱ्या अर्थाने हा मंत्र किंवा विचार मनाला खूप आधार देणारा आहे. सगळ्यांनी अनुसरावा असा हा मंत्र मीही अनुसरला. आणि स्वप्नाच्या माध्यमातून त्या काळ्याकुट्ट दिसणाऱ्या भयानक जीवाला माझ्या दुसऱ्या कानातून काढून टाकलं.

          आपल्या जीवनात असे अनेक काळेकुट्ट, जीवाला घोर लावणारे, कधी दुःखी करणारे, प्रसंगी आपल्यालाही वाईट विचार करायला लावणारे अनुभव येत असतात. त्या सगळ्या दुष्ट विचारांना एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. आपलं मन सदैव चांगल्या, सुष्ट विचारांनी भरून ठेवायचं.

*****

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू