पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रेम दिन आवश्यक आहे का?

व्हॅलेन्टाईन्स डे हा प्रेम दिवस म्हणून १४ फेब्रुवारी रोजी जगभर साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात. अनेक देशात हा दिवस साजरा केला जातो. एका दंतकथेनुसार संत व्हॅलेंटाईन यांचा हा बलिदान दिवस आहे. नंतरच्या काळात हा दिवस जगातील अनेक ठिकाणी प्रणय आणि प्रेमाचा एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक उत्सव बनला! भारतात मोठ्या प्रमाणावर हा दिवस प्रेमीयुगुलांकडून साजरा केला जातो.

 

या दिवशी आपल्या सगळ्याच प्रियजनांची आवर्जून आठवण काढावी असा उद्देश आधी त्यामागे होता. हळूहळू तो प्रेमीयुगूलांचाच दिवस झाला. वास्तविक आपल्याकडे आपण प्रियजनांची आठवण रोजच काढतो. आपल्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आई-वडील, मुलगा - सून, नातवंडे असे आपण एकत्र राहतो. पूर्वी एकत्र कुटुंबाची व्यापकता खूप मोठे होती. त्यावेळी चुलत, मावस, आते, मामे भावंडेही एकत्र गुण्यागोविंदाने राहत! त्यामुळे आजही आपल्याला एकमेकांची आठवण काढण्यासाठी वर्षात एक "विशिष्ट" दिवस साजरा करून चालत नाही. कारण "ती आठवण" आपण रोजच काढत असतो. अनेक घरातून रोज सकाळी कामासाठी बाहेर पडताना आई-वडिलांना नमस्कार करून जाण्याची पद्धत होती व काही ठिकाणी अजूनही आहे. आई-वडिलांचे प्रेम व्यक्त करण्यासाठी तिथे शब्दांची गरज भासत नाही! 

 

पाश्चात्य देशांमध्ये अनेक प्रकारचे दिवस साजरे करण्याची पद्धत किंवा प्रथा आहे. कारण पंधरा-सोळाव्या वर्षांपासूनच मुले तिथे घरातून बाहेर पडतात. धडपडतात आणि स्वतःच्या पायावर उभे राहतात. त्यामुळे अगदी लहान वयापासून त्यांना कुटुंबाविषयी अलिप्तता येते. त्यामुळे वेगवेगळे दिवस साजरे करून ते एकमेकांची आठवण काढतात. "फादर्स डे" ला वडिलांना भेटायला जातात. "मदर्स डे" ला आईला भेटायला जातात. वगैरे वगैरे ...

 

भारतात आम्ही एकमेकांवर शब्दांच्या पलीकडे प्रेम करतो. म्हणजे आम्हाला प्रेम शब्दात व्यक्त करावे लागत नाही. प्रेम सहवासाने फुलते अशी आमची धारण आहे. आमचे प्रेम स्पर्शातून डोळ्यातून व्यक्त होते! "आज आमटी फक्कड झाली होती!" असे म्हटले की बायको बद्दलचे प्रेमच व्यक्त होते. त्यासाठी "माझं तुझ्यावर प्रेम आहे" अशी अलंकारिक भाषेत लिहिलेली ग्रीटिंग कार्डस घेऊन बायकोच्या मागे फिरण्याची गरज भासत नाही!

------------*------------*------------*------------

जयंत शंकर कुलकर्णी, पुणे

दूरभाष : ९४२३५३४१५६

--------------------------------

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू