पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

चिऊताई थांबना गं..

लेख - चिऊताई थांबना गं..


 जागतिक चिमणी दिनाची एक पोस्ट समाज माध्यमातून पाहिली अन् ह्या महत्वाच्या विषयावर आपणही काही लिहायला हवे असा विचार मनात डोकावून गेला. तेवढ्यात शब्दांच्या असंख्य चिमण्या लेखणीच्या फांदीवर येऊन बसल्या आणि कोऱ्या कागदावर अक्षरशः चिवचिवाट सुरू झाला..


लहानपणी कावळा चिमणीची गोष्ट ऐकली नसेल अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. त्यातील ती चिऊताई..तिचे घर मेणाचे असते. आजची परिस्थिती पाहता या सिमेंटच्या जंगलातील तापलेल्या वातावरणात तिचे ते गोष्टीतील मेणाचे घर कधीच वितळून गेलंय.. त्या गोष्टीतल्या कावळ्याला घरात जागा देऊन आधार देणारी आमची चिऊ ताईच आता स्वतःकरता हक्काचे घर शोधतेय असे म्हणावे लागेल.


जस जसे आधुनिकीकरण होत जातेय तस तसा पर्यावरणाचा ऱ्हास होतोय हे कटू सत्य मानवाला पचवायला कठीण जात आहे. मग त्यात इतर प्राणी पक्षीही आलेच. आज प्रत्येकाच्या हातात भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल आहे. त्या मोबाईल करता नेटवर्क हवे त्यामुळे त्याचे यांत्रिकी टाॅवर उभारले गेले. ही नेटवर्क सेवा पुरविणाऱ्या अनेक कंपन्या बाजारात उतरल्या अन् त्यांच्या वाढत्या संख्येमुळे चिमणी सारख्या नाजूक पक्षांची संख्या मात्र झपाट्याने कमी केली. नुकतेच माझ्या वाचनात अशी बातमी आली की, 

 "वाढलेल्या मोबाईल टॉवर्स विशेषतः ४ जी आणि ५ जी तंत्रज्ञानामुळे जागोजागी उच्च वारंवारिता टॉवर्स आणि त्यातून उत्सर्जित होणाऱ्या विद्युत चुंबकीय उत्सर्जनाचा छोट्या पक्ष्यांवर विशेषतः चिमणीवर विपरीत परिणाम होतोय.."  यावर इतकेच म्हणेन,

आपली 'मज्जा आणि या बिचाऱ्या निरपराध पक्षांची मात्र सजा..! '

त्यांची काहीही चूक नसताना हे मूक पक्षी

औद्योगिकरणाच्या फासात अडकत चालले आहेत. काळाच्या गरजेनुसार  मोबाईल तंत्रज्ञान वापरणे जरी बंद करू शकत नसलो तरी त्याच्या वापरावर आपण नियंत्रण नक्कीच आणू शकतो. कमीत कमी मोबाईल टाॅवर्स उभारून शक्य तितकी पर्यावरणाची मदत आपण करू शकतो.


कुठल्याही साहित्यात पहाटेचे सुरेख वर्णन करताना पहिले वाक्य असते..'पक्षांचा किलबिलाट सुरू होता..' या वाक्यातील किलबिलाटा मध्ये सर्वात जास्त सहभाग असतो तो चिऊताईचा.. तिच्या कर्णमधुर चिवचिवाटाचा.‌. तोच हरवत चालला आहे याची खंत वाटते. शहरातील उंच उंच इमारतींचा डोलारा उभारताना अमर्याद वृक्षतोड केली गेलीय. त्यांना घरटी बांधण्यासाठी जास्त झाडे शिल्लक राहिली नाहीत. त्यातूनही या इमारतींच्या जाळ्यात एखाद्या कोपरा पकडून घरटे विणलेच तर ते शहरातील उच्चभ्रू सोसायटीत शोभत नसल्याने त्याचा टिकाव फार काळ होऊन दिला जात नाही. शेवटी मानवा पुढे हा इवलासा पक्षी हतबल होतो. त्याचबरोबर ग्रामीण भागातही चिमण्यांचे घटणारे प्रमाण चिंताजनक आहे.


आता हळूहळू वातावरणातील गारवा कमी होऊन त्याची जागा उष्म्याने घ्यायला सुरुवात केली आहे. उन्हाळ्याचे दिवस येऊ घातले आहेत. या दिवसात कित्येक पक्षांना अन्न पाण्याकरता वणवण करावी लागते. त्यांना छोटीशी मदत म्हणून आपण जर खिडकीत अथवा बैठ घर असल्यास दरवाज्या बाहेर एका वाटीत पाणी अन् एका वाटीत मुठभर धान्य ठेवायला सुरुवात केली तर..त्या पक्षांना रखरखत्या उन्हाचा दाह सोसण्यास बळ येईल. 

माझ्या माहेरी अशीच सोय माझ्या वडिलांनी केली आहे.. तिथे काही चिऊताई दिवसातून तीन चार वेळा सहज डोकावून जातात.. थोड पाणी पिऊन,चोचीत दाणे वेचून आनंदाने  आकाशी मुक्त भरारी घेतात. 


आपल्या समाजात काही संस्था आहेत ज्या पक्षी संवर्धनाचे काम करतात. चिमणी व तत्सम पक्षांचे घटणारे प्रमाण माणसाला किती धोकादायक आहे हे पटवून देत त्या संदर्भात जनजागृती करतात. मला मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये,

"नेचर फॉरएव्हर सोसायटी आणि अन्य निसर्ग संवर्धन संस्था अग्रेसर आहेत. जागतिक स्तरावर चिमणीकडे लक्ष वेधण्यास या संस्था यशस्वी ठरल्या आहेत. २०१० पासून २० मार्च रोजी जागतिक स्तरावर ४५ पेक्षा अधिक देशांमध्ये 'जागतिक चिमणी दिवस' साजरा करण्यात येतो."

त्यांचे हे कार्य मोलाचे आहेच परंतु जर प्रत्येक मानवाने स्वतःच एक संस्था बनायचे ठरवले तर निसर्गाची जपणूक आपोआपच होईल. 


येणाऱ्या काळात चिमणी व अन्य पशू पक्ष्यांच्या प्रजातींच्या पिढ्या वृद्धिंगत होण्यास आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करायला हवेत. कारण ही निसर्ग साखळी टिकली तरच तुम्ही आम्ही टिकून राहू. हे गरजेचे आहे. पर्यावरणाचा समतोल जर असाच बिघडत राहिला तर इथली जीवसृष्टी नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. असे झाल्यास त्याला सर्वात जास्त मनुष्य प्राणीच जबाबदार असेल. 


चला तर , चिऊताईला प्रेमाने साद घालूया.. आणि हे लोकप्रिय बडबडगीत गुणगुणू या..

"इथे इथे बैस गं चिऊताई, बाळाचा खाऊ खाई..खाऊ खा.. पाणी पी.. बाळाच्या डोक्यावरूं भुर्रकन उडून जा..." 

मग प्रत्येक घरातील बाळ म्हणेल, " चिऊताई चिऊताई थांबना गं.."


© कस्तुरी देवरुखकर (मुंबई)

संपर्क - ८२९११४९९९२.


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू