श्रावणमासी हर्ष मानसी
महाराष्ट्रीयन लोकांचा श्रावण महिना सुरू होतोय. उत्तर भारतीयांचा पंधरा दिवस आधीच सुरू झालाय.
आषाढातून श्रावणात पदार्पण झालेय…
आषाढ अमावस्या साजरी झाली. दीप अमावस्या, जिवती, दीपपूजा म्हणून या नावांनी आषाढ अमावस्येला संबोधले जाते.
घरातील सर्व दिवे, निरांजन, समया स्वच्छ करून संध्याकाळी या सगळ्या दिव्यांचे पूजन केल्या जाते.
महाराष्ट्रातील ही परंपरागत पुढे आलेली रीत होय. दिव्यांची अमावस्या म्हणजेच ही आषाढ महिन्यातील दीप अमावस्या.
या दिवशी कणकेचे गुळ घालून उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेले दिंडे (करंज्या) आवर्जून तयार केले जाते.
दिवे हे मांगल्याचे समृद्धीचे प्रतीक आहे. अंध:कारातून प्रकाशाच्या वाटेला नेणारे!
त्यांचे पूजन म्हणजे अंधःकार दूर सारून प्रकाशाच्या मार्गास अनुसरणे. जुन्या काळच्या पणती, कंदील यांनी केलेली उजेडाची सोबत; त्या प्रती कृतज्ञेचा भाव म्हणून करण्यात येणारे हे दीपपूजन.
आजही ही परंपरा भारतीय संस्कृतीत कायम आहे.
घरातील दिवे तर उजळले जातातच. सोबतच मनावरची काजळी दूर होऊन, चैतन्यप्रकाश मनोमन संचारून श्रावणाचे स्वागत करायला सारी सृष्टी ही सज्ज होते.
अनेक जण श्रावण महिन्यात मांसाहार, मद्यपान यांचे सेवनही वर्ज्य करतात. या महिन्यात तामसिक आहारापेक्षा सात्विक आहाराला प्राधान्य देण्यात येते. वातावरणातील बदलाला अनुसरून, या महिन्यात हलके अन्न खाणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असते.
श्रावण मासाचा हा प्रभावच जणू! श्रावणातील मराठमोळ्या परंपरा, सण म्हणजे जणू मराठी घराघरांत दरवळणारा उत्साहाचा सुवास.
निसर्गाला अनुसरून त्या त्यावेळेस मुक्तहस्ते उधळलेले दान झेलत प्रत्येकजण आपआपल्या रीतीप्रमाणे श्रावणाचा मधुमास साजरा करतो. आनंद सोहळा साजरा होतो.
पावसामुळे घरात कोंडलेली मने त्यामुळे सुगंधित होतात. मनातील चैतन्यलहरी उत्साहाने भरभरून वाहू लागतात. मन ओलेचिंब होऊन प्रसन्न न्हाऊन निघते.
ओलेत्या हळव्या क्षणांची किनार लाभते त्याला. त्या क्षणांच्या उंबरठ्यावर जरावेळ रेंगाळतं ते! विसर पडतो, साऱ्या अलीकडच्या विवंचनांचा. वास्तवातील व्यथा वेदनांचा. ही ताकदच मुळी निसर्गचक्राच्या या बदलत्या ऋतूंची.
हिरवाईने नटलेली वसुंधरा जणू श्रावणातील राणी! या राणीचा भरजरी हिरवा शेला कवेत घ्यायला मेघराजा कधी ओथंबून कोसळतो तर कधी इंद्रधनूषी तोरण सजवून तिच्यावर रंगांची उधळण करतो.
आनंदाने भरून पावलेली ही धरणी आपल्या अंगाखांद्यावर बागडणार्या, डोलणाऱ्या लेकरांना न्याहाळत तृप्ततेने भरून पावते. प्रसन्नतेचे अद्भुत तेज तिच्या चेहऱ्यावर दिसते. सारी सृष्टी मोहरून उठते. राणीच ती! प्रत्येकाच्या मनात चैतन्याचे बीज रोवते. मुक्तहस्ते आपल्या कृपेचा वर्षाव करते. श्रावणातील हा आनंद मनामनात तेवता ठेवते.
ऊनपावसाचा खेळ खेळत निसर्गराणी सांगू पाहते...आशा-निराशा, सुख-दुःख यांचे गुपित!
हळूच वाऱ्याशी लगट करून निरोपही देते...जगून घ्या आजचा क्षण!
आनंदाचा चैतन्याचा आलाय क्षण...
गूज कानी सांगतोय मनभावन श्रावण!
_ वीणा विजय रणदिवे ✍️
