जमिनीची अपॉइंटमेंट
“जमिनीची अपॉइंटमेंट”
“हॅलो... मला अपॉइंटमेंट घ्यायची आहे, उद्या मिळेल का एक वाजता?”
स्वरा फोनवर बोलत होती. तिच्या आवाजात थोडी घाई होती, आणि थोडीशी काळजीसुद्धा.
“मिळेल, मॅडम,” रिसेप्शनिस्ट म्हणाली, “स्किन स्पेशलिस्ट – डॉ. राणे. अपॉइंटमेंट बुक झाली.”
स्वराच्या चेहऱ्यावर हलके काळे डाग पडले होते. कालपासून ती थोडी चिंतेत होती. आरशासमोर उभी राहून ती स्वतःच्या त्वचेच्या दोषांकडे बघत होती. “काय झालं असेल? एलर्जी?” आईने विचारलं. आणि लगेच डॉक्टरकडे जायचं ठरलं.
दुसऱ्या दिवशी स्वरा एक वाजता ‘आभारी अपार्टमेंट’जवळच्या दवाखान्यात पोहोचली.
डॉ. राणे यांनी काळजीपूर्वक तपासलं. काही अॅलर्जन पदार्थांपासून दूर राहायला सांगितलं, आणि म्हणाले –
“त्वचेचं आरोग्य ही फक्त बाह्य गोष्ट नाही, आतून पोषण मिळणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आहार नीट ठेवा, पाणी भरपूर प्या, आणि सॅनिटायझर, भेसळयुक्त सौंदर्यप्रसाधनं यापासून दूर राहा. त्वचा संवेदनशील असते.”
स्वरा थोडीशा चिंतेत, पण समाधानाने बाहेर पडली. तिच्या हातात डॉक्टरने दिलेली औषधांची पिशवी आणि एक रिकामीं पाण्याची. प्लास्टिक बॉटल होती . पावसाळ्याची चाहूल लागलेली. रस्त्याच्या कडेला भिजलेली माती आणि गर्दीत वर्दळ होती.
त्या क्षणी, अगदी नकळत, स्वराने हातातलं रिकामीं प्लास्टिकचची. बॉटल रस्त्यावर फेकून दिली .
तेवढ्यात बाजूला एका झाडाखाली बसलेले एक वयोवृद्ध गृहस्थ उठले. अंगावर साधं पांढरं धोतर, डोक्यावर टोपी, चेहऱ्यावर अनुभवाचा झरा.
“बाळ, त्वचेला डाग आले म्हणून स्किन डॉक्टरकडे गेलीस ना? छान केलंस,” ते शांतपणे म्हणाले.
स्वराने हसत मान हलवली, “हो, जरा एलर्जी झाली होती.”
ते म्हणाले, “मग मी विचार करत होतो – आपल्या जमिनीच्या चेहऱ्यावर आलेल्या डागांचं काय? तिच्यासाठी कोण डॉक्टर?”
स्वरा एक क्षण स्तब्ध झाली.
गृहस्थ पुढे बोलू लागले, “ती पण तापते – उन्हानं, सिमेंटनं, प्लास्टिकनं. तिच्या पोर्सही बंद होतात. तीही कोरडी पडते, फुटते, पण तिच्यासाठी कोणी अपॉइंटमेंट घेत नाही. ती आपल्या प्रत्येकासाठी पाय घालायला, श्वास घ्यायला जागा देते. आपण तिला काहीच देत नाही... किंबहुना ती जे मागते, ते पण प्लास्टिकमध्ये पुरवतो.”
"माती म्हणजे आपली आई. तिच्या अंगावर आपण अक्षता टाकतो, ती फळवते म्हणून नतमस्तक होतो… पण रोजच्या रोज तिच्या कुशीत आपण प्लास्टिक, घाण, रसायनं टाकतो. तिची पूजा करतो एक दिवस, आणि अपमान करतो ३६५ दिवस – हाच का आपल्या श्रद्धेचा अर्थ? आपल्या आईला आपण असं वागवलं असतं का?"
आईची पूजा करणं सोपं आहे... पण तिचं जगणं, तिचं रक्षण करणं – ते खऱ्या भक्तीचं लक्षण आहे!"
स्वराने लाजून जमिनीवर फेकलेलं प्लास्टिक उचललं. ती काहीतरी बोलू पाहत होती, पण शब्द हरवले होते.
गृहस्थ पुढे म्हणाले, “आज पर्यावरण दिवस आहे ना? हे 'पर्यावरण' म्हणजे काय? ‘परि’ म्हणजे चहुबाजूचं आणि ‘आवरण’ म्हणजे संरक्षण. निसर्गाचं संरक्षण करणं म्हणजे पर्यावरणाचं रक्षण. आणि माती? ती तर आपल्या जगण्याचं मूलभूत आधारस्तंभ आहे.”
स्वराचं मन हलकं झालं होतं. पण डोकं विचारांनी भरून गेलं होतं.
गृहस्थ म्हणाले, “तुला डॉक्टरने सांगितलं ना की शरीराला पोषण लागते? अगदी तसंच जमिनीला सुद्धा पोषण लागतं. चांगलं पाणी, खत, सेंद्रिय शेती, झाडं – ही तिची औषधं आहेत. पण आपणच तिला विष दिलं – प्लास्टिक, सिमेंट, धूर.”
ते उठले आणि निघाले.
स्वरा काही क्षण रस्त्यावर उभी राहिली. मग जवळच्या कचरापेटीकडे जाऊन प्लास्टिक तिथे टाकलं. मग खिशातून एक छोटंसं नोटपॅड काढलं. त्या सफरचंदाच्या रंगाच्या स्किनवरील डागांनी तिला शिकवलं होतं की त्वचेला आणि जमिनीला एकत्रच आरोग्य हवं.
त्या संध्याकाळी, स्वराने एक छोटी पोस्ट लिहिली –
“आज मी डॉक्टरकडे गेले, माझ्या त्वचेची काळजी घेतली. पण त्या दवाखान्याबाहेर एक सज्जन गृहस्थ भेटले – त्यांनी मला सांगितलं, ‘माती डॉक्टरकडे जाऊ शकत नाही, म्हणून तिची अपॉइंटमेंट आपणच घ्यावी.’
आज पर्यावरण दिवस आहे. आपण अनेकदा त्वचेवरचा डाग दिसतो म्हणून घाबरतो, पण जमिनीवरचे हजारो प्लास्टिकचे डाग का दिसत नाहीत आपल्याला?
आजपासून एक वचन – जसंच आपण स्वतःचं पोषण करतो, तसंच जमिनीचं पोषण करूया. तिचं आरोग्य जपणं ही आपली जबाबदारी आहे. कारण मातीला डॉक्टर नाही... आपणच तिचे डॉक्टर आहोत!
कधीकधी आपल्याला आरशात बघून आपलं आरोग्य आठवतं, पण आरशाच्या पलीकडची जमीन विसरतो. पर्यावरणाची काळजी घेणं म्हणजे केवळ झाडं लावणं नव्हे, तर जमिनीची काळजी घेणं, तिचं पोषण करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे.
"आपण आपल्या शरीराचं पोषण करतो – व्हिटॅमिन्स, प्रोटिन्स, मिनरल्स यांचा विचार करतो. पण ज्या जमिनीवर आपला श्वास टिकून आहे, तिचं पोषण आपण विसरलो. खतं दिली की झालं असं नाही – तिच्या रचनेला, तिच्या विश्रांतीला, तिच्या नैसर्गिक साखळीत अडथळे आणले तर तिची कसच जाते. ती निस्तेज होते... थकते… आणि मग तिच्या कुशीत काहीच उगवत नाही."
"पर्यावरण दिन आले की आपण झाडं लावतो, फोटो काढतो. पण जमिनीच्या कसासाठी आपण काय करतो? पाण्याचा योग्य वापर, प्लास्टिकमुक्त शेती, नैसर्गिक खतांचा वापर, जंगलांचं रक्षण – हेच खरे उपाय. कारण माती डॉक्टरकडे जाऊ शकत नाही… तिचं उपचारक आपणच व्हायला हवं!"
कारण ती डॉक्टरकडे जाऊ शकत नाही – म्हणून तिची अपॉइंटमेंट आपल्यालाच घ्यावी लागते!
"माती जर जगली, तरच मानवी जीवनाला अर्थ आहे. नाहीतर आपण फक्त टेक्नोलॉजीच्या स्क्रीन्सवर हिरवागार फिल्टर लावून निसर्गाची आठवण काढत बसू!"
सौ तृप्ती देव
भिलाई छत्तीसगड
