पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

चाळिशीच्या बायकाच्या निमित्ताने

'चाळिशीतल्या बायकां 'च्या निमित्ताने* 


अक्षर २००९ च्या दिवाळी अंकातली 'चाळीशीच्या बायका' ही संजय बोरुडे यांची कविता वाचली. एकाच वेळी काळजात कळ आणि अनावर हसू यामुळे जी काही अवस्था होऊ शकते, ती ओढवली जेव्हा एका पुरुषाने हे चाळीशीच्या बाईचं रेखाटन रेखाटलंय ते बघितलं तेव्हा मन  कुतुहलाने भरून गेले... या बाबाला बाई इतकी कळावीच कशी ? असा तीव्र प्रश्नही पडला ..


तसे तर बाईच्या पराधीनतेवर, तिच्या आंतरिक सामर्थ्यावर सोशिक‌पणावर किती साहित्य लिहिले- वाचले गेले आहे .. त्यातले धागे दोरे  कधी उलगडले कधी अजूनच गुंते लेखिकांच्या कवयित्रींच्या कधी शब्दबंबाळ आत्मकरुणेमधून तर कधी तडफदार अभिनिवेशातून, तर कधी तटस्थ साक्षेपी निवेदनांतून बाईपणाचे पदर विशिष्ट रंगातच भिजत राहिले. काही जणींच्या साहित्याशी आपली नाळ कुठेतरी जुळते; हे ही कळत गेले. लेखकानी विशेषत मराठी  साहित्यातील, सर्वसाधारणपणे बाईच बाईपण देवीपण केलं किंवा तिला गूढ केलं ..तिचं गुतागुंतीच माणूसपण नाकारलं आणि सोपं, एकांगी चित्र साकारलं. ..खरं तर तिचं माणूसपण समजून घेणं म्हणजे तिचं नैसर्गिक रीत्या बरं वाईट असणं, तिची जगण्याच्या लढाईला तोंड देताना होणारी तारां बाळ आणि वाट्याला येणारी अवहेलना, त्यातून स्वरक्षणाचे तिने शोधलेले मार्ग. त्यात मोहाचे क्षण असे अनेक संदर्भ समजून घेणं ! या संदर्भासकटचं तिचं रूप या कवितेत अचानक समोर आलं ..


वयाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक माणूस-स्त्री असो अथवा पुरुष वेगवेगळ्या मनोवस्थेतून जातात किशोरावस्थेत प्रथमन स्त्रीत्वाचे भान येऊ लागते तो असतो अनिवार जैविक आवेगांचा वादळी टप्पा .. त्या भावनिक, शारीरिक वावटळीतून गेल्यानंतर नव्हाळीच्या तारुण्याच्या नवलाई त स्त्री हरखून गेलेली असते समर्पणाच्या धुदीत‌ संसार मांडत ; सजवत नवरा, मुलंबाळं यांचा भोवती भोवती तो टप्पा संपतो आणि चाळिशीचा टप्पा येतो .. तारुण्याने  आवरासावर सुरू केलेली .. धुंदी ओसरायला लागलेली .. केंद्रबिंदू हरवलेल्या वर्तुळातच रिंगण घालून राहावे, तसं या अचानक या टप्प्यावर बाईला वाटू लागतं आणि *'चाळिशीच्या बायका* ' ही कविता साकारत जाते-

.चाळिशीचा टप्पा येईयेईपर्यंत बाई संसाराला सरावलेली  संसाराच्या खस्ता खाऊन ऐन चाळिशीतच पन्नाशीची दिसू लागलेली .. नवऱ्याचं कर्तृत्व मात्र ऐन जोषात .. मूल बाळ सूटवंग झालेली...ज्यांच्यापायी तिने स्वत :ची दैना केली त्यांना कुठली तिची याद ? ज्यांच्या जिवावर हिनं संसार मिरवला त्यांनीच नक्षा उतरवला, तिच्या मनानी कशी स्थिती होत असेल ?


 *चाळिशीच्या बायकांचा* 

*असा उतरला तोरा* ..

*व्यवहाराचा हा कागद* 

*कसा राहिला गं कोरा*.. 


 बिचारीला स्वत:शी स्वतःचा आब राखण्याचा व्यवहार कधी कळलाच नाही ;अशी के‌विलवाणी अवस्था होते तिची. तिचं मन तिच्याशीच आठव आभासाचा असा खेळ मांडते की, तिला सगळ नांदणंच  निरर्थक वाटू लागतं .. मानसिक औदासिन्याच्या घेऱ्यात सापडलेल्या स्त्रीची मानसिक अवस्था, तिला वारवार फुटणारं रडू;  खायला उठणारं घरदार ; रिकाम एकटेपण ; निरर्थक वेळेचा प्रवाह ; सहानुभूतीच्या शब्दासाठी उंबऱ्याबाहेरचं सुद्धा आपलंच वाटणं कवीने किती  साध्या आणि नेमक्या शब्दात मांडलंय बघा - 


 *चाळिशीच्या बायकांना* 

*असा गहिवर येतो....* 

*करकरीत सांजेला* 

*डोळा उंबरा सांडतो..*

अशा अवस्थेतूनही एखाद्या क्षणी स्त्रियांना जाणवतं; 'उभं आयुष्य

अशा ज्या घरासाठी वेचलं त्याचा तुरुंग झाला आहे. त्या तुरुंगाच्या कुलुपाची किल्ली तिच्या स्वतःच्याच मनात असावी? ' मग त्या घराच्या अंधारात आत आत गाडून घेतात जणू एकट्या एकट्या असताना आपल्याच हाताने आपल्यावर ओढून घेतलेल्या आयुष्याचे हसूच येत असेल तिला; उदास, केविलवाणे ! आतापर्यंत सगळे नेमधर्म, रीतिरिवाज पाळले; अपूर्ण इच्छांचे घुमारे कोंबातच जाळले .. या इच्छांचं एक गाव मग त्यांच्या मनात वसू लागतं... त्यांचं त्यांचं फक्त एकटीचं ! संसाराने हताशल्या तरी आतले कोवळे हिरवे अंकुर मात्र रुजू देऊ लागत‌ात; पुन्हा एकदा. कुठे न बोलता, जे त्यांना सांगायचंय ते अंतरंगातच जपून ठेवतात...

चाळिशीच्या बायका 

काही नेम पाळतात.. 

जे सांगायच ते कसं 

नेमकंच टाळतात. -


आणि भरल्या घरात अशा एकट्या, अबोल होतात ..आपलं चांदणन्हाण अदृश्य ठेवत ! किती अचूक डोळ्यासमोर येतं ना, बाईच एकटं, एकटं होत जाणं आणि मग स्वत:त रमणं ..

   चाळिशी जवळ येते ; तारुण्य ओसरु लागते, प्रौढत्व पसरू लागते .. गच्च भरलेलं झाड आता बहर सांडू लागते आणि लख्ख जाणीव होते, हा जीव जळला खरा पण आयुष्य भोगलंच नाही ..आताशा सवड मिळाली पण वयाची मुदत संपत आली. वयाला साजेसे मार्ग निवडायला हवेत पण ही नव्याने  उसळलेली असोशी शांत राहू देत नाही ..तग‌मग, तडफड विझताना मोठ्या होणाऱ्या दिव्याच्या वाती सारखं संपत चाललेलं ..स्त्रीत्व उजळून टाकायची निकराची धडपड !! आणि अशा पेटून उठलेल्या बाईच्या नादी कुणी वादीच जणू लागावं.... तिची चिवट, जिवट आणि कडवट पकड तिची .. - चामड्याची वादीच जणू


चाळीशीच्या बायकांच्या 

कुणी लागू नये नादी ..

उभे आयुष्य पिसून

उरे चामड्याची वादी ..


असे सगळे करताना अगदी सोज्वळ रूपांतही असंगाशी संग धरला जातो गुंतागुंतीच्या या मनोवस्थेत विखारी विचार चहूबाजूंनी नशीबाच्या गारुड्याचा आधार घेत बाई खेळवत राहते .. चाळीशीच्या टप्प्यावर !


रजोनिवृनीची चाहूल लागण्याच्या काळातला बाईच्या बाईपणाच्या तिच्या मानसिक, शारीरिक घडामोडींचा, भावनिक हेलकाव्यांचा, तिच्या हताशपणाचा आणि त्यावर तिनंच शोधलेल्या उपायांचा हा किती सुंदर लेखाजोखा !


'अनेक दिवसानंतर अशी कविता वाचून बायकांवरती एखाद्या पुरुषाने इतके सुरेख भाष्य कराने, इत‌के शास्त्रीय तरीही इतके ललित, इतके गुंतागुंतीचे तरीही इतके सहज मांडलेले की; मन अगदी हरखून गेले..


- डॉ. राजश्री देशपांडे । सातारा

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू