आई
आई
"देश सांभाळायला मोदी पंतप्रधान आणि घर सांभाळायला आई – म्हणूनच भारत जगात आणि घरातही जगतो!"
मोदी देशाचं नेतृत्व करतात – हे जगाला माहीत आहे. पण प्रत्येक घरात, प्रत्येक दिवस सांभाळणारी एक "आई" असते – जिला न डोकावता, न झळकता, घर चालवायचं असतं. तिचा आवाज कधी संसदेत पोहोचत नाही, पण तिचं अस्तित्व प्रत्येक घरातलं संविधान असतं.
ती आई – जी सकाळी उठते, घर सावरते, मुलांची भूक ओळखते, नवऱ्याचं निघायचं वेळ लक्षात ठेवते, सासऱ्याच्या औषधांच्या वेळा विसरत नाही आणि सासूबाईंच्या गोष्टी ऐकत चहा तयार करत राहते.
मोदीजी देशासाठी मोठमोठी योजनांचं भाषण करतात, आणि ही आई आपल्या छोट्याशा किचनमध्ये मोठमोठी मने जिंकते. तिला कुठलाच मंत्रीपद नाही, पण ती अर्थमंत्रीही आहे, शिक्षणमंत्रीही आहे, आणि आरोग्यमंत्रीही!
देशाचं कर्ज मोदी फेडतात, पण घराचा खर्च आई नजरेत मापते. तिच्या आकडेमोडीत नुसता हिशोब नसतो – तिथं प्रेम असतं, समजूत असते आणि त्याग असतो.
ती जगातल्या कोणत्याही बँकेतून पैसे काढत नाही, पण आपल्या पदरातून वेळ, माया, माफीनामा आणि समजूत यांचं अमाप कर्ज वाटत राहते.
मोदी देशासाठी ‘मन की बात’ करतात, पण आई रोज आपल्या घरातल्या सगळ्यांच्या मनाशी ‘मन की ऐकणं’ करत असते.
ती रडतेही शांतपणे, हसतेही मनापासून, आणि प्रत्येक वेळी घरात काहीतरी "होतंय" याची तिला सगळी खबर असते. तिचं नेटवर्क मोबाइल नेटवर्कपेक्षा मोठं आहे – कारण ते मनाशी जोडलेलं असतं.
आई म्हणजे घराचा "प्रधान सेवक"!
तिचं नाव पत्रिकेत येत नाही, पण तिच्या शिवाय कोणतीही दिवाळी, कोणतंही लग्न, कोणताही उत्सव पूर्णच होत नाही.
म्हणूनच या Mother's Day निमित्त एक गोष्ट स्पष्ट सांगावीशी वाटते –
"देश सांभाळायला मोदी लागतात, पण घर टिकवायला आई लागते – आणि ती दोघंही आपल्या जागी जबाबदार असले की, भारतही खऱ्या अर्थानं ‘सोने की चिडीया’ होतो!"
तृप्ती देव
Copy right
