ऐ मेरे वतन के लोगो
ये देश हमारा है, हमको अति प्यारा है
इस धरती को हमने माॅं कहके पुकारा है
अशा या भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी, पिढ्यानपिढ्या कारणी पडल्या. गुलामगिरीच्या विळख्यातून बाहेर पडायला दीडशे वर्षे वाट पहावी लागली. दीडशे वर्षे परकीयांनी वेठीस ठरलेल्या आपल्या मातृभूमीला सहजासहजी स्वातंत्र्य मिळाले नाही.
अनेक क्रांतिकारकांनी, शूरवीरांनी, सामान्यातल्या सामान्य देशभक्तांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेतला....
स्वातंत्र्यलढ्याच्या यज्ञकुंडात फुल ना फुलाची पाकळी रुपी समिधा अनेकांनी अर्पण केली.
कुणी त्या धगधगत्या यज्ञकुंडात प्राणांची आहुती दिली...कुणाची जाज्वल्य राष्ट्रभक्ती त्या स्वातंत्र्य लढ्याचे स्वरूप अधिकाधिक तीव्र करण्यात कामी आली.
आपल्या भारतभूमीच्या स्वातंत्र्याच्या अग्निकुंडातून प्रगट झालेल्या उन्मेषातून देशभर प्रखर झंझावात निर्माण झाला आणि या झंजावातानंतरच आपल्याला प्राप्त झाले___आपल्या भारतमातेचे हे स्वातंत्र्य, आपले स्वातंत्र्य, सुखद स्वप्नील असे!
उड जा उड जा प्यारे तिरंगे
उडता चल तू आसमामें
भारत माॅं की शान तूही है
ऊॅंचे रहो जहाँ में
१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले. या स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी आपल्या भारताची स्वतःची राज्यघटना अस्तित्वात आली.
२६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक राष्ट्र घोषित करण्यात आले.
'हिंदी' ही राष्ट्रभाषा आणि 'जन गन मन' हे राष्ट्रगीत निर्माण झाले.
आज जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश असणाऱ्या भारताने महासत्ता होण्याचे स्वप्न बाळगले आहे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या प्रगतीने अन् चांद्रमोहिमेने विकसित राष्ट्रांत मानाचे स्थान मिळवल आहे.
स्वातंत्र्याचा मिळालेला हा वारसा जपतांना भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास इतक्या वर्षानंतरही अगदी जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहतो! हेच! हेच या भारतभूमीचे सामर्थ्य आहे.
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आ चंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे
आपल्या भारतभूमीला आपण "मायभू" संबोधतो. जगाच्या नकाशात आपल्या देशाला "भारतमाता" संबोधित वंदन करतो. "भारत माता की जय" हा जयघोष दुमदुमतो तेव्हा आईच्या नजरेने ती आपल्या देशातील प्रत्येक लेकराकडे पाहते; हा उदात्त दृष्टिकोन निर्माण होतो.
आपला देश महान होता, महान आहे आणि महान राहील.
ही देवांची पुण्यभूमी, संतांची कर्मभूमी आहे. वेदपुराणांची बीजे या मातीत रुजली आहेत. महान क्रांतिकारक, थोर महापुरुष, देशभक्त, वीर सैनिक यांच्या महान कार्याने ही पावन भूमी उजळून निघाली आहे .त्यांच्या कर्तुत्वाने या देशाला महान बनवलंय.
सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्ता हमारा
हम बुलबुलें हैं इसकी, ये गुलसिताँ हमारा
स्वातंत्र्या सारखी मौल्यवान गोष्ट नाही. राष्ट्राचे स्वातंत्र्य अबाधित राहणे हा सर्वोच्च बहु्मूल्य ठेवा आहे...सार्थ अभिमान आहे...राष्ट्राची सुरक्षितता म्हणजेच प्रत्येक नागरिकाची, प्रत्येक व्यक्तीची सुरक्षितता.
राष्ट्र सर्वोच्च आहे. राष्ट्रधर्म सर्वोच्च आहे. देशाच्या सीमा सुरक्षित राहतील, तेव्हाच व्यक्तीचं जीवन सुरक्षित राहील.
राष्ट्रसेवा, राष्ट्रभक्ती म्हणजे विशिष्ट पक्षाची तत्वे अंगीकारणे, त्या पक्षाची सेवा करणे, विशिष्ट पक्षाशी संलग्नित राहणे नव्हे.
देशातील गोरगरीब, सर्वसामान्य लोक, प्रत्येक तळागाळातील देशाचा नागरिक, हा राष्ट्राचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच जात, पंथ, प्रांत हा भेद विसरून, अंतर्गत कलह न माजवता, आपल्या राष्ट्राचे ऐक्य राखणे ही प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे.
भारत कोई भूमि का टुकडा नहीं
एक जीताजागता राष्ट्रपुरुष है
यह वंदन की भूमि है, यह अभिनंदन की भूमि है
यह तर्पण की भूमि है, यह अर्पण की भूमि है
इसका कंकर कंकर हमारे लिए शंकर है
हम जिएंगे तो भारत के लिए
और मरेंगे तो भारत के लिए...
_अटलबिहारी वाजपेयी_ यांची ही कविता; आपल्या या भारतभूमीबद्दल असलेला सार्थ अभिमान आहे.
या देशाच्या धरतीवर कोणी आक्रमण केलेलं आम्ही मुळीच खपवून घेणार नाही. कारण ही आमची माता आहे आणि आईचे तुकडे कोणीही होऊ देणार नाही. या धरतीचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे, नव्हे ते आमचे कर्तव्यच आहे. ही धारणा मनात जागृत ठेवून, आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक अनाम वीर शहीद झाले.
आजही देशाप्रती हीच भावना प्रत्येक भारतीयांची असायला हवी आणि मी तर म्हणेल...आहेच.
देशावर संकट कोसळले असताना जेव्हा सारा देश एकजुटीने उभा राहतो तेव्हाच प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विजय मिळविण्याचं एक भारावलेलं वातावरण देशात तयार होते.
प्रत्येक वेळेस या सुवर्णमयी भारताकडे परकीयांचा डोळा घारी सारखा टिपलेला असतो...वेळोवेळी जीवाची बाजी लावून आपल्या देशभक्तांनी त्यांचे मनसुबे उधळून लावले आहे मग ते___
देशासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात स्वतःला झोकून देणारे शहीद असो अथवा
आपल्या भूमीसाठी प्राणपणाने लढणारे वीर जवान असो___
घुसखोरांची मजल केवळ दहशतवादी कारवायांपुरती मर्यादित न राहता, ठराविक भूप्रदेश काबीज करण्यापर्यंत गेलेली असल्याने प्रत्येक वेळी या बंडखोरीला भारतीय लष्कराने वेळोवेळी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
सीमेपासून हजारो मैल दूर असूनही या जवानांच्या पाठीशी उभे राहून आपणही देशाप्रतीचे आपले कर्तव्य पार पाडायला हवे.
जवान कोणत्या विपरीत परिस्थितीत लढतो, हे सोशल मीडियामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला कळतं आणि जाणवतंही....आपल्या देशातील या शूर सैनिकांमुळे आपण आपल्या भूमीवर सुरक्षित आहोत.
आज जाणवतं की-- सरकार, समाज आणि सैन्य यांचे मजबूत संघटन हवे....नागरिकांची सुरक्षितता आणि सैनिकांची कार्यक्षमता यांना प्राधान्य मिळायलाच हवं...त्याकरिता सत्तेचे राजकारण होता कामा नये....देशाचे रक्षण करण्यासाठी लढणार्या जवानाला तेवढ्याच तन्मयतेने देशातील जनता साथ देत आहे का...आपल्या राष्ट्रीय भावना जिवंत आहेत का....याचे उत्तर प्रत्येक नागरिकाने स्वतःलाच विचारायला हवे!
भारतीय नागरिक एक मुखाने आपल्या पाठीशी उभे आहेत ही भावना सीमेवरील जवानांचे नीतिधैर्य कायम राखून, शत्रूंशी मुकाबला करण्यास त्यांना बळ देऊ शकते.
देशाचे जवान लढत असतात तेव्हा ती लढाई त्यांच्यापुरती नसते. त्या लढाईच्या मागे सगळा देश एकवटतो.
प्रत्यक्ष सीमेवर न लढणारे; पण लढाईला मदत करणारे अनेक हजारो हात, देशासाठी काम करीत असतात.
सीमेवर लढणारे जवान...... त्यांच्यासाठी राबणारा संरक्षण कर्मचारी...... आणि या जवानांचे मनोधैर्य वाढावं म्हणून एकजुटीने उभा राहणारा देश.... असे सगळे एकत्र येतात ना तेव्हा......विजय मिळविण्याचे एक भारावलेलं वातावरण देशात तयार होतं!
प्रतिकूल हवामान, भौगोलिक अडथळे आणि अखंड पहारा....यातूनही भारतीय सैनिक मार्ग काढतो.
ए मेरे वतन के लोगो, जरा याद करो कुर्बानी....
सरहद पर लढनेवाला, हर वीर है हिंदुस्तानी....
रणांगणावर स्वतःच्या रक्ताने वीरगाथा लिहून मरण पत्करणार्या भारतीय जवानांच्या बलिदानास शतशः नमन. भारतीय अनाम वीरांच्या, शहीद क्रांतिकारकांच्या, अनेक स्वातंत्र्यवीरांच्या अतुलनीय बलिदानाला शतशः प्रणाम.
जिस शान से कोई समशान गया,वो शान सलामत रहती है
जान तो आनी-जानी है, इस जान की कोई बात नही
_ वीणा विजय रणदिवे
