पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पर्यावरण


शब्दांचा दिखावा नको, निसर्गाची काळजी हवी!

आज आपण जिकडे पाहतो तिकडे “Save Nature”, “Go Green”, “Save Earth” असे मोठमोठे शब्द दिसतात. पोस्टर, भाषणं, निबंध, सोशल मीडिया—सगळीकडे पर्यावरणाबद्दल खूप काही बोललं जातं.
पण मनात एक साधा प्रश्न उभा राहतो…
हे सगळं बोलून खरंच निसर्ग वाचतो का?

कधी कधी असं वाटतं की पर्यावरणाला आता आपल्या मोठ्या शब्दांची नाही, तर छोट्या पण प्रामाणिक कृतीची गरज आहे.

तुम्ही पर्यावरणावर मोठमोठी भाषणं देऊ नका, कविता गाऊ नका, निबंध पाठ करून सांगू नका… पण एकच करा—. झाडं नाही लावता आले तरी चालतील. पण झाड तोडू नका.
झाडं म्हणजे फक्त हिरवळ नाहीत, ती आपला श्वास आहेत. ती आपल्याला सावली देतात, पाऊस आणतात, हवा शुद्ध ठेवतात. आपण मात्र गरजेपेक्षा जास्त तोडत गेलो तर उद्या श्वासही विकत घ्यावा लागेल.

तुम्ही पाण्यावर मोठ्या घोषणा करू नका, “Save Water”चे फलक लावू नका… पण एकच करा—पाणी वाया घालवू नका.
नळ चालू ठेवून विसरू नका, गरज नसताना पाणी सांडू देऊ नका. कारण पाणी कमी होत नाही असं वाटत असलं तरी, त्याची किंमत प्रत्येक दिवस वाढत आहे.

तुम्ही प्रदूषणावर चर्चा करू नका, मोठे उपक्रम करू नका… पण एकच करा—हवा खराब होईल असं काहीही करू नका.
अनावश्यक वाहन वापर टाळा, कचरा जाळू नका, प्लास्टिक रस्त्यावर टाकू नका. कारण आपण श्वास घेतो तीच हवा हळूहळू विषारी होत आहे.

तुम्ही प्राण्यांवर प्रेम दाखवण्याचे फोटो काढू नका, सोशल मीडियावर पोस्ट टाकू नका… पण एकच करा—त्या मुक्या जीवांना त्रास देऊ नका.
तेही या पृथ्वीचा भाग आहेत, त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे.

तुम्हाला पर्यावरणासाठी काहीच नाही केलं तरीही चालेल काही करू नका पण पर्यावरण संतुलन बिघडेल असं काही काम करू नका
तुमच्याकडे पर्यावरणासाठी कोणते उपाय नसतील तरी चालतील पण पर्यावरणाला अपाय होतील असे काही कारणा करू नका.

आज खरी गरज कोणत्याही दिखाव्याची नाही, तर जबाबदारीची आहे.
पर्यावरण वाचवण्यासाठी मोठे कार्यक्रम नकोत, मोठे शब्द नकोत…
घरातून सुरू होणारे छोटे बदलच पुरेसे आहेत.

आपण अनेकदा म्हणतो—“पृथ्वी वाचवा!”
पण थोडं थांबून विचार केला तर जाणवतं…
ही पृथ्वीच प्रत्येक क्षणी आपल्याला वाचवत आहे—श्वास देऊन, पाणी देऊन, अन्न देऊन.

शेवटी एवढंच…
पर्यावरणाला आपले शब्द नको आहेत…
त्याला आपली काळजी, आपली जबाबदारी आणि आपली माणुसकी हवी आहे.

कारण बोलणारे खूप आहेत…
पण निसर्ग जपणारे खूप कमी आहेत.

तुम्हाला निसर्गाची पूजा करता आली नाही तरी चालेल,
पण त्याच्या छाताडावर ओरखडे उमटवू नका.
तुम्हाला पृथ्वीला काही देता आलं नाही तरी चालेल,
पण तिच्याकडून घेतानाच सर्व काही हिरावून घेऊ नका.
तुम्हाला पर्यावरण वाचवण्याचा मान मिळाला नाही तरी चालेल,
पण पर्यावरण नष्ट करण्याचं कारण बनू नका.
तुम्हाला पृथ्वीची सेवा करता आली नाही तरी चालेल, पण तिचं शोषण करू नका.
तुम्ही जंगल वाढवू शकलात नाही तरी चालेल, पण जंगल संपवू नका.
तुम्हाला पक्ष्यांसाठी घरटं बांधता आलं नाही तरी चालेल, पण त्यांची घरटी उद्ध्वस्त करू नका.
तुम्ही पाणी साठवू शकलात नाही तरी चालेल, पण पाणी वाया घालवू नका.
तुम्हाला निसर्गासाठी वेळ देता आला नाही तरी चालेल, पण निसर्गाचा जीव घेऊ नका.

"निसर्गासाठी काही केलं नाही तरी चालेल; पण निसर्गामुळे जगतो आहोत, हे विसरून त्याला इजा करू नका." 🌿🍃

सौ तृप्ती देव

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू