पुस्तक परीक्षण
मानवी संवेदना जागवणारा कथासंग्रह - आगळ्या वेगळ्या कथा
- गुलाब बिसेन
आपल्या सशक्त लेखनीने बालसाहित्य समृद्ध करणारे तसेच लिहित्या हातांना सर्जनाचे पंख देणारे प्रसिदध साहित्यिक बबन शिंदे यांचा 'आगळ्या वेगळ्या कथा' हा कुमारकथांचा वाचनीय असा कुमारकथासंग्रह आहे. कथा - कवितांसोबत शाळकरी हातांमध्ये लेखनाचे बळ पेरणारे बबन शिंदे यांच्या कथा म्हणजे वाचकांसाठी एक पर्वणीच असते. दिलीपराज प्रकाशनने प्रकाशित केलेला हा कथासंग्रह कथांची मांडणी, पुस्तकाची रचना आणि समर्पक चित्रांसह आकर्षक मुखपृष्ठामुळे अधिक वाचकप्रिय झाला आहे. या कुमारकथासंग्रहामध्ये दहा कथांचा समावेश आहे. शब्द हे शस्त्र, चूक माझीच, जीवाचे सार्थक, श्रद्धा असावी पण.., खरचं मी अपंग नाही, प्रामाणिक गोपाळ, मोठ्या मनाची माणसं, वाचवा रे वाचवा, प्रसंगावधानता, कृष्णा या कथांचा संग्रहामध्ये समावेश आहे.
चित्रकलेची वही चोरीला गेल्याच्या संशयावरून आपल्या जिवलग मित्राला नको ते वाईट बोलणाऱ्या राजूला आई शब्द हे शस्राप्रमाणे असतात, याची जाणीव करून देते. कथा वाचताना शब्दांचे महत्व वाचकाला कळते. शाळेचा गणवेश आणि गृहपाठ नसल्याने शिक्षकांचा ओरडा खावा लागल्यामुळे रागाच्या भरात घर सोडून गेलेला केशव 'चूक माझीच' या केथेत भेटतो. विना तिकीट असल्यामुळे टिसीच्या चौकशीत सापडलेल्या केशवला टिसी समंजसपणे त्याच्याकडून सर्व माहिती मिळवून, घरच्यांच्या स्वाधीन करेपर्यंतचा रेल्वेतील प्रवास वाचताना वाचक अंतर्मुख होऊन जातो. सोबत विद्यार्थ्यांना घरून सर्व सोयीसुविधा मिळत असताना त्यांनी अभ्यासाप्रती कसे प्रामाणिक राहीले पाहीजे याचा वस्तुपाठ ही कथा घालून देते.
'आगळ्या वेगळ्या कथा' या कथासंग्रहातील कथा वाचताना वाचकाला क्षणोक्षणी स्वतःमध्ये डोकावून बघायला भाग पाडतात. कथांची वाचकांशी नाळ जोडताना लेखकाने कथासंग्रहामध्ये कुठेही कृत्रिमता येवू न देता, त्या प्रवाही ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. कथा पुढे सरकत जाताना वाचकाची उत्कंठा वाढवत जातात. कुमारांचे भावविश्व, त्यांच्या वयातील समस्या, त्यांची योग्य पद्धतीने होणारी उकल हे या कथासंग्रहाची जमेची बाजू म्हणावी लागेल. वाढते तापमान, कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ ही संकटे वरवर नैसर्गिक वाटत असली तरी या संकटांच्या मुळाशी माणूस आहे. निसर्गात माणसांचा वाढलेला हस्तक्षेप निसर्गाचे संतुलन बिघडवत आहे. हे 'जीवाचे सार्थक' या कथेतून लेखकाने सुरेश, त्याची बहिण मोनिका आणि आई या पात्रांच्य माध्यमातून समस्या आणि त्यावरील कृतीशील उपाय मांडले आहेत. आपल्या छोट्या कृतीतून मोनिकाने पर्यावरण रक्षणाचा दिलेला संदेश मोलाचा आहे.
समाजामध्ये अवती-भवती, सभोवती भोंदूबाबांनी श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रदधेचा मांडलेला खेळ अनेक प्रसंगांतून आपल्या नजरेस पडत असतो. मुक्या प्राण्यांच्या शारीरिक व्यंग्याचा उपयोग करून लोकांना फसवणारी मंडळी आणि त्यांना अजय, अभय, अक्षय या सजग मुलांनी दाखवलेल्या हजरजबाबीपणामुळे अंधश्रद्धा कशी पळवून लावली जाते, याची ही कथा. 'श्रद्धा असावी पण..' ही कथा वाचताना वाचकाला श्रदधा आणि अंधश्रद्धा यांच्यातील अंतर स्पष्ट होते. लेखक बबन शिंदे यांनी या कथासंग्रहामधून कुमारवाचकांनी आपल्या सभोवती घडणार्या घटना, मानवी व्यवहार यांकडे डोळसपणे बघण्याचा नवा दृष्टीकोन दिला आहे.
पायाने अपंग असूनही आपल्या मित्राच्या भावाला लांडग्यापासून वाचवणारा नामदेव आपसूकच अभिनंदनास पात्र होतो. आपल्या मर्यादांवर मात करत लांडग्याला पकडून किसनाला वाचवण्याचा थरार 'खरंच मी अपंग नाही' या कथेत वाचायला मिळतो. आजीला लग्नाला घेऊन निघालेल्या गोपाळच्या गाडीला अज्ञात वाहनाची धडक बसून अपघात होतो. यात आजी रक्तबंबाळ होते. पुढे बसने आजीला दवाखान्यात सोडले जाते. परंतु पोलिसकेस होताना बसने धडक दिल्याची खोटा बयान दिल्याने बसचालक विमाकारण कोर्टकचेरीत अडकतो. अशा प्रसंगात गोपाळ आपल्या प्रामाणिकपणामुळे बसचालकाला शिक्षेपासून वाचवतो. 'प्रामाणिक गोपाळ' या कथेतून गोपाळ प्रामाणिकपणाची शिकवण देऊन जातो.
'मोठ्या मनाची माणसं' या कधेत भेटणारा प्रभाकर आणि दाजीबा पाटील या व्यक्तिरेखा माणसातील माणूनसकीचे दर्शन घडवतात. 'वाचवा रे वाचवा' या कथेतील कोंडामाय ही अडाणी आजी आपल्या कृतीतून शहाण्यांना ही खुजं ठरवते. कोंडामायवर शेतात भूकेला कोल्हा जिवघेणा हल्ला करतो. तो हल्ला ती धिराने तर परतवतेच परंतू त्या कोल्ह्याला पकडून त्याच्यावर पशुवैद्यकिय दवाखान्यात उपचार करायला भाग पाडते. आपला काळ बनून आलेल्या कोल्ह्याला वाचवण्यामागील कोंडामायची
भूमिका ही कथा वाचताना वाचकाला अंतर्मूख करून जाते.
विज्ञानयुगातही अंधश्रद्धेला खतपाणी घालून गुप्तधनासारख्या काल्पनिक धनाच्या मागे लागणाऱ्यांना नागेश आणि त्याच्या आईच्या धाडसामुळे आणि प्रसंगावधानामुळे मुन्ना नावाच्या मुलाचा नरबळी जाण्यापासून वाचवले जाते. 'प्रसांगवधानता' ही कथा वाचताना वाचकाच्या अंगावर रोमांच उभे करते. 'कृष्णा' या कथेमध्ये मूकबधिर असलेला कृष्णा भेटतो. आपल्या प्रतिभेचा पुरेपुर वापर करत मटकी विकण्याचा छोटासा व्यवसाय करत आपल्या अपंगत्वावर मात करत कष्टाची चव चाखतो. सोबतच आपल्या पश्चात आपल्या मूकबधिर मुलाचे कसे होईल या विवंचुनेतून आईवडिलांची मूक्तता करतो. त्याचा कथेतील हा संघर्ष वाचकाला रडत बसण्यापेक्षा नविन मार्ग शोधण्याचा कानमंत्र देतो. या संग्रहातील कथांमधून लेखक सकारात्मकता पेरण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे हा कथासंग्रह कुमार वाचकांना प्रेरीत करतो.
पुस्तकाचे नाव - आगळ्या वेगळ्या कथा
लेखकाचे नाव - बबन शिंदे
प्रकाशक - दिलीपराज प्रकाशन
किंमत - १५० रू.
समीक्षक - गुलाब बिसेन, ब्रम्हपुरी (जि.चंद्रपूर)
मो.नं. 940423 5191
