पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

हसून जगा आनंदाने जगा.

प्रस्तावना -


"हसू" म्हटलं की तुमच्या मनात काय येतं?


माझ्या मते, हसू म्हणजे आपल्या मनातील आनंदाची सुंदर अभिव्यक्ती. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला मनापासून आनंद देते, तेव्हा आपल्या चेहऱ्यावर आपोआप हसू उमटतं. हसणं ही केवळ एक कृती नाही, तर ती आपल्या मनाच्या समाधानाची आणि आनंदाची भाषा आहे.


मला तर असं वाटतं की माणूस जन्मण्याआधीपासूनच आनंद अनुभवत असतो. आपल्या संस्कृतीत असं म्हटलं जातं की आई आनंदी असेल, तर तिच्या पोटातील बाळावरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे आनंद आणि हसू यांचं नातं अगदी जन्मापासूनच जुळलेलं असतं.


हसणं म्हणजे फक्त ओठांवरचं स्मित नव्हे, तर त्यामागे दडलेली आनंदाची भावना अधिक महत्त्वाची असते. आपण मनापासून हसतो, तेव्हा काही क्षणांसाठी चिंता, तणाव आणि नकारात्मक विचार दूर होतात. मन हलकं होतं, ताजंतवानं वाटतं आणि पुन्हा नव्या उमेदीने काम करण्याची प्रेरणा मिळते.


वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही हसण्याचे अनेक फायदे सांगितले गेले आहेत. मन आनंदी राहिलं की तणाव कमी होतो, शरीराला ऊर्जा मिळते आणि आरोग्यावरही त्याचा चांगला परिणाम होतो. म्हणूनच आनंदी राहणं आणि मनापासून हसणं हे प्रत्येकासाठी आवश्यक आहे.


मात्र, हसणं योग्य वेळी आणि योग्य कारणासाठी असणं तितकंच महत्त्वाचं आहे. विनोद झाला, आनंदाचा प्रसंग आला किंवा कोणाचं मन जिंकायचं असेल, तेव्हा हसणं सुंदर वाटतं. पण विनाकारण हसणं किंवा आनंदाच्या क्षणीही हसू न येणं, या दोन्ही गोष्टींमध्ये मोठा फरक आहे. त्यामुळे योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि मनापासून हसणं हेच खरं हसू.


आता प्रश्न असा पडतो की, हसायचंच का?


याचं उत्तर आपल्याला लहान मुलांकडे पाहिलं की सहज मिळतं. लहान मुलं अगदी छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधतात. त्यांना उद्याची चिंता नसते, भूतकाळाचं ओझं नसतं. ते मनमोकळेपणाने हसतात, खेळतात आणि प्रत्येक क्षण जगतात. त्यांचं हे निरागस हास्य आपल्यालाही आनंद देऊन जातं.


मग आपण मोठे झाल्यावर असं का जगत नाही? आयुष्यात जबाबदाऱ्या असतात, अडचणीही असतात. पण त्याचबरोबर छोट्या-छोट्या आनंदाच्या क्षणांना जपणंही तितकंच गरजेचं आहे. मनापासून हसणं, मनमोकळं बोलणं आणि प्रत्येक दिवसात आनंद शोधणं हीच आनंदी आयुष्याची खरी गुरुकिल्ली आहे.



Chapter - 1.  हसण्याची ताकद.


हसणं म्हणजे फक्त दोन ओठांवर उमटणारं स्मित नव्हे, तर त्यामागे दडलेली निरागसता, आनंद आणि भावनांचा सुंदर संगम आहे. खरं हसू हे मनातून येतं. जेव्हा मन आनंदी असतं, तेव्हाच चेहऱ्यावरचं हास्यही खरं आणि मनापासून असतं.


आपल्या आयुष्यात कितीही अडचणी, तणाव किंवा संकटं आली तरी त्यावर मात करून त्या परिस्थितीतही आनंद शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण तणाव कायमचा नसतो आणि आनंदाचा तो क्षणही पुन्हा परत येत नाही. त्यामुळे प्रत्येक क्षण मनापासून जगा. वेळ कोणासाठीही थांबत नाही आणि आयुष्य खूप मौल्यवान आहे. ते कसं जगायचं, हे मात्र आपल्या हातात आहे.


यासाठी मला एक सुंदर उदाहरण आठवतं – फुलपाखरू.


फुलपाखराचं आयुष्य खूप छोटं असतं. तरीही ते आपल्या प्रत्येक क्षणात रंग भरत जगतं. जेव्हा एखादं रंगीबेरंगी फुलपाखरू आपल्या समोर उडताना दिसतं, तेव्हा नकळत आपल्या चेहऱ्यावर हसू उमटतं. त्याला पाहून मन प्रसन्न होतं. त्याचं आयुष्य लहान असलं तरी ते प्रत्येक क्षण आनंदाने जगतं.


मग आपण का नाही?


देवाने आपल्याला त्यापेक्षा कितीतरी मोठं आयुष्य दिलं आहे. मग आपण प्रत्येक दिवस आनंदाने का जगू नये? परिस्थिती कोणतीही असो – श्रीमंतीची किंवा गरिबीची – जगण्याचा अधिकार आणि आनंद घेण्याची संधी प्रत्येकाला सारखीच मिळते.


खरं सुख पैशात नसतं, तर मनात असतं. ज्या माणसाच्या मनात द्वेष नसतो, अहंकार नसतो, कोणाबद्दल वाईट भावना नसतात, तोच खऱ्या अर्थाने आनंदी असतो. पण जो माणूस अहंकार, मत्सर आणि राग यांच्यात अडकतो, तो स्वतःचं सुंदर आयुष्य नकळत दुःखात घालवतो.


म्हणून मनाने श्रीमंत बना. परिस्थिती काहीही असो, प्रत्येक दिवसाचं स्वागत हसून करा. कारण आनंद हा पैशाने विकत मिळत नाही; तो आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या स्वभावात असतो.


मला एक सुंदर विचार ऐकायला मिळाला होता—


मनूष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमावतो आणि आरोग्य परत मिळविण्यासाठी तो पैसा खर्च करतो, तो भविष्याच्या चिंतेत भूतकाळातही जगत नाही आणि वर्तमानात ही नाही. तो जगतो तर असा जगतो कि कधी मरणारच नाही आणि मरतो तर असा मरतो कि कधी जगलाचं नाही.


हा विचार आपल्याला एकच गोष्ट शिकवतो—आयुष्यभर फक्त जगू नका, तर प्रत्येक क्षण भरभरून जगा. हसा, आनंदी राहा आणि इतरांच्या चेहऱ्यावरही हसू फुलवा. कारण आयुष्य सुंदर आहे, आणि ते हसत-हसत जगण्यातच त्याची खरी मजा आहे.


Chapter - 2  छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा.


आयुष्य खूप छोटं आहे. त्यामुळे प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिकणं गरजेचं आहे. अनेकदा आपण मोठ्या आनंदाची वाट पाहत राहतो. "हे झालं की आनंदी होईन", "ते मिळालं की आनंदी होईन" असं म्हणता म्हणता अनेक सुंदर क्षण नकळत निघून जातात.

पण खरं पाहिलं तर आनंद मोठ्या गोष्टींमध्ये नसतो, तर तो आपल्या रोजच्या छोट्या-छोट्या क्षणांमध्ये लपलेला असतो.


रोज सकाळी उठणं, नवीन दिवसाची सुरुवात करणं, आपल्या माणसांशी बोलणं, चहाचा पहिला घोट, पावसाचा सुगंध, एखादं सुंदर फूल, पक्ष्यांचा किलबिलाट, मनापासून केलेलं काम, कोणाच्या चेहऱ्यावर उमटलेलं हसू – या सगळ्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यात आनंद घेऊन येत असतात. फक्त त्या अनुभवण्यासाठी आपल्याकडे वेळ आणि मन असणं गरजेचं आहे.


प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही तणाव असतो. अडचणीही असतात. पण त्याचबरोबर जर आपण रोज काही क्षण स्वतःसाठी काढले, मनापासून हसलो आणि छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधला, तर मन हलकं होतं. इतकंच नाही, तर समस्यांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनही बदलतो.


दररोज स्वतःला एक गोष्ट नक्की सांगा—


"ही वेळ कायमची नाही. आजचा दिवस पुन्हा कधीच परत येणार नाही. त्यामुळे तो आनंदाने जगायचा."

जीवन हे फक्त दिवस काढण्यासाठी नाही, तर प्रत्येक दिवस मनापासून अनुभवण्यासाठी आहे. हसा, खेळा, आपल्या माणसांसोबत वेळ घालवा, निसर्गाचा आनंद घ्या आणि प्रत्येक क्षण भरभरून जगा.


कारण आनंद शोधायचा नसतो, तो जगायचा असतो. आणि जो माणूस छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिकतो, त्याला आयुष्यातील प्रत्येक दिवस सुंदर वाटू लागतो.


Chapter - 3  नाती आणि एक हसू 


आपल्या आयुष्यात अनेक नाती असतात—आई-वडील, भाऊ-बहिण, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी आणि आपल्यावर प्रेम करणारी अनेक माणसं. कधी कधी या नात्यांमध्ये गैरसमज होतात, राग येतो, वाद होतात आणि नकळत आपण एकमेकांना दुखावूनही जातो. माझ्याही आयुष्यात असे प्रसंग आले आहेत. कदाचित तुमच्याही आयुष्यात आले असतील.

पण एक गोष्ट आपण विसरतो—हीच माणसं आपल्या सुख-दुःखात आपल्या पाठीशी उभी असतात. आपण कितीही रागावलो किंवा चिडलो, तरी ती आपल्याला समजून घेतात. मग आपणही त्यांना समजून घ्यायला हवं, नाही का?


माझ्या मते, नातं टिकवण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते. एक प्रेमळ हसू आणि आपुलकीने बोललेले काही शब्दही नात्यांना अधिक सुंदर बनवतात.

मला माझा एक अनुभव सांगावासा वाटतो.

माझा स्वभाव लहानपणापासूनच शांत आहे. मी फार कमी बोलते आणि फक्त गरजेपुरतंच बोलणं मला आवडतं. एकदा आमच्या घरी काही पाहुणे आले होते. ते मला सतत प्रश्न विचारत होते. मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत होते, पण मला एवढं बोलायची सवय नव्हती. त्यामुळे मी थोडी अस्वस्थ झाले.


घरी नंतर सगळे मला म्हणाले, "थोडंसं हसत-खेळत बोल. माणसांमध्ये मिसळ." सुरुवातीला मला त्यांचा राग यायचा. मला वाटायचं, "माझा स्वभावच असा आहे, मग मी जबरदस्तीने का बदलू?"


पण नंतर शांतपणे विचार केला. घरच्यांचं म्हणणं चुकीचं नव्हतं. त्यांनी मला माझा स्वभाव बदलायला सांगितला नव्हता; तर लोकांशी प्रेमाने आणि हसतमुखाने वागायला सांगितलं होतं.


मग मी हळूहळू प्रयत्न करायला सुरुवात केली. जसं मी माझ्या मैत्रिणींशी मनमोकळेपणाने बोलत होते, तसंच इतरांशीही हसून बोलण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनी मला स्वतःमध्ये एक सकारात्मक बदल जाणवला.


आजही मी माझा मूळ स्वभाव बदललेला नाही. मी अजूनही गरजेपुरतंच बोलते. पण योग्य ठिकाणी, योग्य माणसांशी आणि हसतमुखाने संवाद साधण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे नात्यांमध्ये एक वेगळीच ऊब निर्माण होते.


मला आजही काही नवीन लोकांशी बोलताना थोडी भीती वाटते. "काही चुकीचं बोलले तर?" असा विचार मनात येतो. पण आता मी त्या भीतीवर हसत मात करण्याचा प्रयत्न करते.


या अनुभवातून मला एक गोष्ट समजली—

चेहऱ्यावरचं एक छोटंसं स्मित अनेकदा मोठ्या शब्दांपेक्षाही जास्त प्रभावी असतं.

म्हणून आपल्या घरच्यांसाठी, आपल्या माणसांसाठी आणि स्वतःसाठीही एक छोटंसं हसू कायम जपा. कारण आपण आनंदी असलो, तर आपल्या चेहऱ्यावरचं ते हास्य आपल्या माणसांनाही आनंद देतं.

हसू हे फक्त चेहऱ्याचं सौंदर्य नाही, तर नात्यांमधील विश्वास, प्रेम आणि आपुलकी जपण्याचा सर्वात सुंदर मार्ग आहे.


Chapter - 4   संकटांवर हसत मात करा.


आयुष्य म्हटलं की सुख-दुःख, यश-अपयश, अडचणी आणि संकटं ही येणारच. कोणाचंही आयुष्य पूर्णपणे संकटमुक्त नसतं. फरक एवढाच असतो की काही लोक संकटांना घाबरतात, तर काही लोक त्यांच्यासमोर ठामपणे उभे राहतात.

संकट आलं की आपण अनेकदा खचून जातो, निराश होतो आणि "हे माझ्याच बाबतीत का घडलं?" असा विचार करतो. पण प्रत्येक संकट आपल्याला काहीतरी शिकवून जातं. ते आपल्याला अधिक मजबूत, संयमी आणि अनुभवसंपन्न बनवतं.

अशा वेळी चेहऱ्यावरचं एक छोटंसं हसूही आपल्याला पुढे जाण्याची ताकद देतं. हसण्याने समस्या लगेच संपत नाहीत, पण त्या समस्यांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन नक्की बदलतो. मन शांत राहतं आणि उपाय शोधण्याची शक्ती मिळते.

झाडावर वादळ आलं तरी ते पुन्हा ताठ उभं राहतं. नदीच्या वाटेत कितीही दगड आले तरी ती आपला मार्ग शोधत पुढे वाहत राहते. त्याचप्रमाणे आपणही संकटांना घाबरून न जाता त्यांच्यावर हसत मात करायला शिकायला हवं.

लक्षात ठेवा, प्रत्येक कठीण काळ तात्पुरता असतो. आजची अडचण उद्या अनुभव बनते आणि आजचे अश्रू उद्याच्या यशाची कहाणी बनू शकतात.

म्हणून संकटं आली तरी स्वतःवर विश्वास ठेवा, धैर्याने उभे रहा आणि चेहऱ्यावरचं हसू कायम ठेवा. कारण संकटं कायमची नसतात, पण त्यांच्याशी लढण्याची तुमची हिंमत कायम तुमच्यासोबत राहते.

हसा, प्रयत्न करा आणि पुढे चालत राहा. आयुष्य खूप सुंदर आहे आणि प्रत्येक नव्या दिवसासोबत नवी आशा घेऊन येतं. 


Chapter - 5  कृतज्ञतेतून मिळणारा आनंद.


आतापर्यंत आपण हसण्याचं महत्त्व, छोट्या गोष्टींमध्ये आनंद कसा शोधायचा आणि नात्यांमध्ये हसण्याची ताकद काय असते, हे पाहिलं. आता आपण आनंदाकडे एका वेगळ्या नजरेने पाहूया.

आनंद म्हणजे नेमकं काय?


प्रत्येक माणसासाठी आनंदाची व्याख्या वेगळी असते. कोणाला यश मिळालं की आनंद होतो, कोणाला आपल्या माणसांसोबत वेळ घालवताना आनंद मिळतो, तर कोणाला स्वतःची स्वप्नं पूर्ण झाल्यावर.

माझ्यासाठी आनंद म्हणजे माझी स्वप्नं. मी देवाकडे मनापासून मागितलेल्या काही इच्छा आहेत. त्या एक दिवस पूर्ण होतील, असा मला विश्वास आहे. त्या क्षणाचा विचार जरी केला, तरी माझ्या चेहऱ्यावर हसू येतं. पण त्याचबरोबर मला एक गोष्ट समजली आहे—फक्त स्वप्नं पाहून चालत नाही, ती पूर्ण करण्यासाठी मेहनतही घ्यावी लागते.म्हणूनच आपण भविष्याची स्वप्नं पाहूया, पण वर्तमानातील आनंद कधीच गमावू नका. कारण आजचा दिवस पुन्हा कधीच परत येणार नाही.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नका.


आपल्याकडे जे आहे, ते कदाचित दुसऱ्याकडे नसेल. आणि दुसऱ्याकडे जे आहे, ते आपल्याकडे नसेल. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. त्यामुळे तुलना करण्यापेक्षा आपल्याला मिळालेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ राहणं अधिक महत्त्वाचं आहे.


मला माझा एक अनुभव सांगायचा आहे.

कॉलेजमध्ये असताना आम्हाला एका अनाथाश्रमाला भेट देण्याची संधी मिळाली. तिथे लहान-लहान मुलं होती, ज्यांना आई-वडिलांचं प्रेम कधीच मिळालं नव्हतं. तिथे काही आजी-आजोबाही होते, ज्यांना त्यांच्या स्वतःच्या मुलांनी घराबाहेर काढलं होतं.


त्यांच्याशी संवाद साधताना माझे डोळे पाणावले. त्यांच्या आयुष्यात किती वेदना होत्या, हे त्यांच्या शब्दांतून जाणवत होतं. एका लहान मुलाबद्दल आम्हाला सांगितलं की त्याला जंगलात सोडून दिलं होतं. ते ऐकून मन सुन्न झालं.


तेव्हा आमचे सर आम्हाला म्हणाले,


"तुमच्या नावापुढे तुमच्या वडिलांचं नाव आणि आडनाव असतं. पण या मुलांकडे तेही नाही."

हे वाक्य माझ्या मनात कायमचं कोरलं गेलं.

त्या दिवशी मी स्वतःशी एक निर्णय घेतला—आयुष्यात मोठं झाल्यावर अशा लोकांसाठी काहीतरी चांगलं करायचं.


या अनुभवातून मला एक गोष्ट शिकायला मिळाली—

आपल्याकडे जे आहे, त्याची किंमत आपण अनेकदा ते गमावल्याशिवाय ओळखत नाही.

म्हणून आपल्या आई-वडिलांवर प्रेम करा. त्यांचा आदर करा. त्यांच्यासोबत वेळ घाला. कारण त्यांच्यासारखं निस्वार्थ प्रेम जगात फार कमी ठिकाणी मिळतं.

आपल्याकडे जे आहे, त्याबद्दल देवाचे आणि आपल्या माणसांचे मनापासून आभार माना. कारण कृतज्ञ मनातच खरा आनंद वसतो.


स्वतःला नशीबवान समजा. जे आहे त्यात समाधान मानायला शिका, पण स्वप्नं पाहणं आणि त्यासाठी मेहनत करणं कधीही सोडू नका.


आयुष्य खूप सुंदर आहे. त्यामुळे भरभरून जगा, हसत राहा, खेळत राहा आणि शक्य असेल तिथे इतरांच्याही चेहऱ्यावर हसू फुलवा.


निष्कर्ष -


आयुष्य हे खूप सुंदर आहे, पण अनेक वेळा आपण त्यातील सौंदर्य पाहायलाच विसरतो. आपण भविष्याची चिंता आणि भूतकाळाच्या आठवणी यामध्ये इतके अडकून जातो की आजचा क्षण जगणंच राहून जातं. पण खरं पाहिलं तर आयुष्याची खरी मजा ही वर्तमानात जगण्यात आहे.


या पुस्तकातून माझा एक छोटासा प्रयत्न होता—आपल्या आयुष्यातील हसू, आनंद आणि सकारात्मकता पुन्हा जागी करण्याचा. हसणं म्हणजे फक्त चेहऱ्यावरचं स्मित नाही, तर ते मनाची अवस्था आहे. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं, आपल्या माणसांवर प्रेम करणं, त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहणं आणि प्रत्येक दिवस नव्या आशेने जगणं हेच खऱ्या आनंदाचं रहस्य आहे.

आयुष्यात अडचणी येतील, संकटं येतील, काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडणार नाहीत. पण त्यामुळं हसणं आणि जगणं थांबवू नका. कारण प्रत्येक रात्रीनंतर नवी सकाळ येते आणि प्रत्येक अडचणीनंतर नवीन संधीही येते.


आपल्याकडे जे आहे त्याची किंमत करा, आपल्या माणसांना जपा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक दिवस मनापासून जगा.


शेवटी एवढंच म्हणेन—


हसा, आनंदी रहा, इतरांनाही आनंद द्या आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला मनापासून स्वीकारा. कारण आयुष्य पुन्हा मिळत नाही, पण ते सुंदरपणे जगण्याची संधी मात्र प्रत्येक दिवस आपल्याला मिळत असते.

माझा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल आणि या पुस्तकातून तुमच्या चेहऱ्यावर एक छोटंसं हास्य उमटलं असेल, तर माझं लेखन सार्थकी लागलं असं मला वाटेल.


हसत रहा, आनंदाने जगा आणि इतरांच्याही आयुष्यात आनंदाची फुले फुलवत रहा. 


                                                   लेखिका - साक्षी.



पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू