पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मेडिटेशन

मेडिटेशन ( ध्यान )

बऱ्याच लोकांचे मेडिटेशन ( ध्यान) बद्दल अनेक गैरसमज आहेत. बहुतेक लोक ध्यान ही प्रक्रिया समजून घेण्याच्या आधीच तिला जटिल समजतात.
आपल्याला जर सुखी आणि आनंदी आयुष्य जगायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीत आपलं शरीर निरोगी आणि सुदृढ असणं आवश्यक आहे, शरीर निरोगी असेल तर आपण सगळ्या गोष्टींचा आनंद घेऊ शकतो, परंतु आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत परंतु शरीर निरोगी नसेल , शरीर साथ देत नसेल तर आपल्याकडे असलेल्या सुख, सुविधा आणि पैसा याचा काहीही उपयोग नाही.
परंतु फक्त आपले शरीर निरोगी ठेवून चालणार नाही, तर आपल्या शरीरात असलेल्या मनाचाही आपल्याला विचार करावा लागेल.
ज्याप्रमाणे आपल्याला आनंदी जीवनासाठी शरीराची काळजी घ्यावी लागते, अगदी तशीच काळजी आपल्या मनाची सुद्धा घ्यावी लागते.
शरीराची काळजी म्हणजे योग्य आणि संतुलित आहार, शारीरिक व्यायाम आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे झोप.
मग मनाची काळजी घ्यायची असेल तर काय....?
याचे उत्तर आहे ध्यान !!

शरीराची विश्रांती म्हणजे झोप, तर मनाची विश्रांती म्हणजे ध्यान.

बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की ध्यान म्हणजे एकाग्रता.
परंतु ध्यान म्हणजे एकाग्रता नाही.

ध्यान म्हणजे काय...?

ध्यान म्हणजे मनाची अशी अवस्था ज्या ठिकाणी मनामध्ये विचारांची संख्या शून्य असते. मन स्थिर असते.
ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला आपल्या मनाला शून्य अवस्थेपर्यंत आणायचे असते, या अवस्थेपासून पुढे ध्यान हे आपोआप सुरू होते.
एका छोट्याशा उदाहरणाने समजून घेऊया.
आपण रस्त्यावरून चालत नदीच्या काठी आलात, नदीच्या काठी येऊन जेव्हा तुम्ही होडी मध्ये बसता तेव्हा तुम्हाला चालाव लागत नाही, तुमचा प्रवास आपोआप सुरू होतो, अगदी तसंच तुम्ही जेव्हा तुमच्या मनाला विचारांच्या शून्य स्थितीमध्ये आणून सोडता, तेव्हा आपोआप ध्यानाला सुरुवात होते.

मनाची प्रारंभिक अवस्था आणि बाह्य परिस्थिती :

प्रत्येकाच्या मनाची अवस्था ती व्यक्ती करत असलेल्या विचारांवर अवलंबून असते. जितकी विचारांची संख्या जास्त त्या प्रमाणात मनाची चंचलता वाढते. मनाची वाढलेली हीच चंचलता,अस्थिरता तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करते.
तुमच्या मनामध्ये कशा प्रकारचे विचार चालू आहेत यावर तुमच्या शरीराचे आरोग्य ठरते.
विचारांची संख्या जितकी कमी, मनाची अस्थिरता जितकी कमी तितक्या जास्त प्रमाणात तुमचं शरीर निरोगी राहू शकत.

ध्यानाला बसताना अडचणी का येतात....?
जन्मापासून आपल्या मनावर असलेले संस्कार आपल्या मनाची अस्थिरता वाढवत. आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये आपल्या मनाला स्थिर करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे असं कधीही कुणी सांगितलं नाही. अगदी समजायला लागल्यापासून आपल्या मनाला प्रत्येक वेळेस मिळत गेलेली ध्येय प्राप्त करण्यासाठी सतत ओढाताण करावी लागते, आणि याचाच परिणाम म्हणून मन कधीही शांत राहत नाही. ते नेहमी कुठल्यातरी घटनेबरोबर, कुठल्यातरी प्रसंगा बरोबर, कोणत्यातरी चर्चेमध्ये किंवा कोणत्यातरी निर्णयांमध्ये गुंतलेले असते.
आपल्या मनाला लागलेली ही सवय त्याला शांत बसू देत नाही आणि म्हणून ते प्रत्येक वेळेस वरील गोष्टींचा सहारा घेते आणि त्या ठिकाणी जाऊन थांबते.
याचच कारण आहे मन नेहमी भूतकाळात आणि भविष्य काळामध्ये रमलेले दिसते.
कारण वर्तमान काळात( या क्षणाला) मनासोबत काहीच नाहीये, परंतु भविष्यामध्ये चिंता, अपेक्षा, काळजी यांच्यासोबत राहायला मनाला आवडते, त्याचप्रमाणे भूतकाळात घडून गेलेल्या घटना, दुःख, वाईट अनुभव यांच्यासोबत राहून त्याला बरे वाटते.

ध्यानाने मनातील विचार कमी कसे करावे, शून्य अवस्थेपर्यंत कसे पोहचावे...?
ध्यान म्हणजे जादूची कांडी नाही.
ध्यान म्हणजे निरंतर करावयाचा अभ्यास आहे. ध्यान म्हणजे सराव आहे.
तुम्हाला ध्यानाचा सराव करावा लागेल.
तुम्ही आज जर ध्यान सुरू केले, तर आपण किती निष्ठेने ध्यान करत आहात यावर आपल्याला ध्यानाचे परिणाम दिसून येतील.
ध्यानाचा अभ्यास करायचा असेल तर त्यात सातत्य असणे आवश्यक आहे.
ज्यांना ध्यान ही प्रक्रिया खरोखर आत्मसात करायची आहे त्या सर्वांना ध्यानाचा सराव हा करावाच लागेल.
हा एक अभ्यास आहे, आपण शाळेत निरंतर अभ्यास करतो तेव्हा आपल्याला अक्षर ओळख होते, अगदी तसंच ध्यानाचे सुद्धा आहे. निरंतर अभ्यासाने ध्यानाचे परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतात.

आपण जर नियमित पाच ते सहा महिने अभ्यास केला, तर प्रत्येकाचे 30 ते 45 मिनिटे ध्यान लागू शकते.

ध्यान करण्याची सोपी पद्धत :

शक्यतो ध्यानाची वेळ ही सकाळची किंवा पहाटेची निवडा. ह्या वेळेला बाहेरील वातावरणात गोंगाट कमी असतो. मनामध्ये विचारांची संख्या कमी असते.

ध्यानाला बसण्यापूर्वी 30 ते 45 मिनिटे आधी योगासन,प्राणायाम करावेत, त्यामुळे मनातील विचार स्थिर होण्यास मदत होते.

ध्यानाची जागा ही अतिशय स्वच्छ असावी. ध्यानासाठी स्वच्छ कपडा किंवा चादर बसण्यासाठी वापरावी.
ज्या खोलीमध्ये आपण ध्यान करत आहोत त्या खोलीमध्ये सूर्यप्रकाश आणि हवा योग्य प्रमाणात असावी.
कोंदट, अस्वच्छ खोली, भरपूर पसारा असलेल्या खोलीमध्ये ध्यान करू नये.

योगासने आणि प्राणायाम केल्यानंतर ध्यान लागण्यास खूप मदत होते.

ध्यानाची प्रक्रिया :

1. 30 ते 45 मिनिटे योगासन आणि प्राणायाम करा.
2. योगा मॅट किंवा चादर यावर विश्राम अवस्थेत बसा.
3. पाठीचा कणा सरळ ठेवा.
4. डोळे बंद करा.
5. आपलं लक्ष आत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या श्वासावर केंद्रित करा.
6. प्रत्येक आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास आपल्या मनाने अनुभव करा, म्हणजे आपलं मन प्रत्येक येणाऱ्या श्वासावर आणि जाणाऱ्या श्वासावर ठेवा.

आपलं मन हे आपण दिलेल्या सूचनांचे पालन करत असतं. आपल्या मनाला विचारांच्या शून्य अवस्थेपर्यंत नेण्यासाठी काही सूचनांची गरज असते.
आपल्या मनामध्ये विचारांची संख्या वाढवणाऱ्या, मनाला विचलित करणारी चार प्रमुख कारणे आहेत.
1. व्यक्ती
2. शब्द
3. परिस्थिती,घटना,प्रसंग
4. वातावरण( ऊन, वारा, पाऊस )

आपलं लक्ष येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या श्वासावर केंद्रित झालं की आपल्या मनाला सांगा,
1. तुला कोणतीही व्यक्ती डिस्टर्ब करू शकत नाही. तू एक शांत स्वरूप आत्मा आहे, तू हे शरीर नाहीस तर या शरीरातला त्या व्यक्ती कडे पाहणारा साक्षी आहेस.

2. तुला कोणताही शब्द, कोणाचाही शब्द डिस्टर्ब करू शकत नाही, तू एक शांत स्वरूप आत्मा आहेस, तू हे शरीर नाहीस तर या शरीरातला ह्या शब्दांकडे बघणारा साक्षी आहेस.

3. तुला बाहेरची कोणतीही परिस्थिती, घटना, प्रसंग जो या क्षणाला घडत आहे, मागे घडून गेलेला असेल किंवा भविष्यात घडणार असेल तुला डिस्टर्ब करू शकत नाही, तू एक शांत स्वरूप आत्मा आहेस. तू हे शरीर नाहीस, परिस्थिती, प्रसंग आणि घटना यांच्याकडे बघणारा साक्षी आहेस.

4. कोणतेही वातावरण तुला डिस्टर्ब करू शकत नाही. तू एक शांत स्वरूप आत्मा आहेस, तू हे शरीर नाहीस, बाहेरील बदलणाऱ्या वातावरणाकडे बघणारा तू साक्षी आहेस.

मनाला या सूचना दिल्याने काय होते?
तुमचे भटकणारे मन या सूचनांचे पालन करते, आणि तुमच्या मनामध्ये येणाऱ्या विचारांची संख्या कमी व्हायला सुरुवात होते, तुमच्या मनाला एक योग्य दिशा मिळते, तुमच्या मनाचे नियंत्रण सूचनांद्वारे तुमच्या हातामध्ये येते.

आणि तुमच्या लक्षात येईल की मनामध्ये विचारांची संख्या कमी व्हायला सुरुवात झालेली आहे.

डोळे बंदच ठेवा.

ही प्रक्रिया संपल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल, मन आता फक्त तीन गोष्टी चित्र स्वरूपात बघत आहे.

1.प्रसंग
2. चर्चा
3. निर्णय.

आता आपण ध्यान लागण्याच्या प्रक्रियेच्या अगदी जवळ आलेलो आहोत.
यावेळी मन फक्त तीन गोष्टी करत असत.
ते एखादा प्रसंग बघत असतं किंवा कोणाबरोबर तरी चर्चा करत असतं, किंवा काहीतरी निर्णय घेत असतं.
या सर्व गोष्टी आपल्याला चित्र स्वरूपात दिसत असतात.

अशावेळी आपल्या मनाला आपण सूचना द्यायच्या आहेत.
1. प्रसंग बघू नको.
2. चर्चा करू नको.
3. निर्णय देऊ नको.

तुमच्या असं लक्षात येईल, जेव्हा तुम्ही या सूचना मनाला देताल, मनात येणारे सर्व विचार बंद झालेले असतील.
आणि जेव्हा सर्व विचार बंद होतील तेव्हा आपलं लक्ष दोन्ही डोळ्यांच्या मध्यभागी केंद्रित करा.
या ठिकाणी तुमच्या ध्यानाला आपोआप सुरुवात होईल.
तुमचं लक्ष दोन्ही डोळ्याच्या मध्यभागापासून आतल्या बाजूला जात जाईल त्याच ठिकाणी आपल्याला आपल्या केंद्र बिंदूचा विस्तार झाल्यासारखा वाटेल.
याच ठिकाणापासून आपल्याला ध्यानाची सुरुवात होईल. इथून पुढचा प्रवास आपल्याला काहीही करावं लागत नाही. आपल्या मनाची शून्य अवस्था या ठिकाणी झालेली असते.
परंतु ह्या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी निरंतर अभ्यासाची खूप गरज आहे.

©® प्रकाश फासाटे.

मोरोक्को ( नॉर्थ आफ्रिका )

212661913052























पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू