मामा एक हक्काचं नातं.
प्रस्तावना -
"मामा" म्हटलं की तुमच्या डोळ्यांसमोर काय येतं?
माझ्या डोळ्यांसमोर मात्र प्रेम, माया, आधार आणि आपुलकीने भरलेलं एक हक्काचं नातं उभं राहतं. माझ्यासाठी मामा म्हणजे माझा जीव की प्राण.
मी माझ्या आयुष्यातील एक छोटीशी गोष्ट सांगते. लहानपणापासून मी माझ्या मामाकडे वाढले आहे आणि आजही माझं शिक्षण मामाच्या घरातूनच सुरू आहे. उन्हाळ्याच्या किंवा दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की मी माझ्या आईकडे येते आणि माझ्या मैत्रिणी मात्र मामाच्या गावाला जातात. ही गोष्ट मला नेहमीच गमतीशीर वाटते आणि तेव्हा मी स्वतःला खूप नशीबवान समजते. कारण ज्या मामाकडे जाण्यासाठी अनेकजण वाट पाहतात, त्या मामांच्या सहवासात मला लहानपणापासून राहायला मिळालं.
मामा म्हणजे नेमकं काय, हे कदाचित शब्दांत सांगणं कठीण आहे. पण एक गोष्ट नक्की सांगता येईल की आई-वडिलांनंतर जर कोणीतरी तितक्याच प्रेमाने आणि आपुलकीने जपणारं नातं असेल, तर ते म्हणजे मामा.
मामा आणि भाचीचं नातं खूप खास असतं. या नात्यात प्रेम असतं, काळजी असते, आधार असतो आणि एक हक्काची सोबतही असते.
आणि ज्यांना मामा नाहीत, त्यांनी निराश होऊ नये. कारण लहानपणी आपण सगळ्यांनी एक गोष्ट ऐकली आहे — "चांदोमामा." आपल्या प्रत्येकाचा एक मामा आहे, तो म्हणजे चंद्र. त्यामुळे ज्यांना प्रत्यक्षात मामा नाहीत, त्यांनी चांदोमामामध्ये त्या नात्याची ऊब आणि आनंद अनुभवावा.
लहानपणीचं ते गाणं तुम्हाला आठवतं का?
"छूक छूक आगीन गाडी , धूरांच्या रेषा हवेत गाडी , पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया......"
हे गाणं आजही कानावर पडलं की मन आनंदाने भरून जातं आणि बालपणाच्या अनेक आठवणी पुन्हा जाग्या होतात.
मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला इतके प्रेम करणारे आणि साथ देणारे मामा मिळाले. या पुस्तकातून मी त्या सुंदर नात्याच्या आठवणी, अनुभव आणि भावना तुमच्यासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे.
कारण मामा म्हणजे फक्त एक नातं नाही, तर आयुष्यभर सोबत राहणारा विश्वास, आधार आणि मायेची सावली आहे.
Chapter - 1 लहानपणीच्या आठवणी.
मामाच्या घरातील माझ्या लहानपणीच्या आठवणी सांगायच्या झाल्या, तर त्या खूप खास आणि जिव्हाळ्याच्या आहेत.
मला माझ्या आयुष्याची सुरुवात तिथूनच झाल्यासारखं वाटतं. मी दीड वर्षांची असताना माझ्या आईने मला मामाकडे ठेवले. त्यामागचं खरं कारण मला आजही पूर्णपणे माहीत नाही, पण घरातील काही परिस्थिती आणि अडचणींमुळे तसं झालं असावं. पण एक गोष्ट मी मनापासून सांगू शकते—माझ्या मामांनी आणि आजोबांनी मला कधीच काही कमी पडू दिलं नाही. मला जे हवं होतं, ते त्यांनी शक्य तितक्या प्रेमाने आणि काळजीने दिलं. त्यांनी मला कधी परकं समजलं नाही, तर स्वतःच्या मुलीसारखंच जपलं.
मात्र, माझ्या आयुष्यात एक दुःख कायम राहिलं, ते म्हणजे माझे आजोबा काही वर्षांनी आम्हाला सोडून गेले.
आजही त्यांची आठवण आली की मन भरून येतं. त्यांच्या प्रेमाची आणि मायेची जागा कोणीच घेऊ शकत नाही.
आजोबांनंतर घरातील अनेक जबाबदाऱ्या मामांवर आल्या. परिस्थिती सोपी नव्हती. अनेक अडचणी होत्या, पण मी माझ्या मामांचा संघर्ष जवळून पाहिला आहे. त्यांनी प्रत्येक परिस्थितीला धैर्याने सामोरं जात घर आणि कुटुंब सांभाळलं.
माझे मामा लहानपणापासूनच खूप मेहनती होते. ते दिवसभर कपड्यांच्या दुकानात काम करायचे आणि संध्याकाळी रात्रीच्या शाळेत जाऊन शिक्षण पूर्ण करायचे. अशा प्रकारे त्यांनी दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. आज त्यांचा तो संघर्ष आठवला की त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढतो.
माझ्या बालपणीच्या आठवणींमध्ये आणखी एक सुंदर गोष्ट म्हणजे माझ्या मावश्यांची मुलं. ती मामाच्या घरी आली की घरात एक वेगळीच गडबड आणि आनंद निर्माण व्हायचा. आम्ही सगळे एकत्र खेळायचो, भांडायचो, पुन्हा एकत्र यायचो आणि खूप मजा करायचो.
माझ्या आईला तीन बहिणी आणि एक भाऊ म्हणजे माझे मामा आहेत. त्यामुळे आमचं कुटुंब मोठं आणि प्रेमळ आहे.
माझ्या मामांचा स्वभाव थोडा कडक होता, पण त्याचबरोबर ते खूप खोडकर आणि प्रेमळही होते. ते मला मुद्दाम चिडवायचे. माझं नाव साक्षी असलं तरी लहानपणी ते मला "सोनाबाई" म्हणून हाक मारायचे. त्यामागे आमच्या कुटुंबातील एक गमतीशीर आठवण होती. सुरुवातीला मला त्याचा अर्थही समजत नव्हता, पण आज ती आठवण आली की हसू येतं.
माझ्या मामांचं नाव अनूप आहे. पण मी त्यांना कधीच फक्त "मामा" म्हणाले नाही. लहानपणी मी त्यांना प्रेमाने "अनू मामा" असंच म्हणायचे. त्या नावातही एक वेगळीच आपुलकी होती.
आज त्या सगळ्या आठवणी आठवल्या की मन आनंदाने भरून येतं. कारण त्या फक्त आठवणी नाहीत, तर माझ्या आयुष्याचा एक सुंदर भाग आहेत.
Chapter - 2 मामा आणि माझं नातं.
मामा आणि माझं नातं सांगायचं झालं, तर ते इतर मामा आणि भाचीच्या नात्यासारखंच आहे, पण त्यात एक वेगळेपणही आहे.
मी अनेक मामा आणि भाचीचं नातं पाहिलं आहे. त्यांच्यात खूप मजा, मस्ती आणि खेळकरपणा असतो. आमचं नातंही तसंच आहे, पण थोडंसं मर्यादेतलं. मी लहान असताना माझे मामा माझ्या खोड्या काढायचे, मला चिडवायचे आणि माझ्यासोबत खूप मजा करायचे. पण जसजशी मी मोठी होत गेले, तसं आमच्या नात्यात एक वेगळीच समजूतदारपणा आणि आपुलकी आली.
आमच्यातली सर्वात खास गोष्ट म्हणजे आम्हाला नेहमी शब्दांची गरज पडत नाही. अनेक वेळा न बोलताही आम्ही एकमेकांना समजून घेतो.
एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहूनही मनातलं ओळखता येतं. आणि विशेष म्हणजे ते बहुतेक वेळा खरंही ठरतं. हा अनुभव मी अनेक वेळा घेतला आहे.
माझ्या मामांचा स्वभाव थोडासा कडक आहे, हे मी आधीही सांगितलं आहे. त्यामुळे आजही मला त्यांच्याशी बोलताना थोडी भीती वाटते. पण त्या भीतीतही आदर आहे. ते जे काही सांगतात, ते माझ्या भल्यासाठीच असतं, हे मला माहीत आहे. म्हणूनच आजही माझ्या मनात त्यांच्याबद्दल खूप आदर आहे.
माझं नशीब खरंच चांगलं आहे की मला असे मामा मिळाले. ते माझे वडील नाहीत, पण माझ्यासाठी ते वडिलांपेक्षा कमीही नाहीत. मला काय हवं, काय नको, माझी काळजी, माझं शिक्षण, माझ्या गरजा—या सगळ्यांची त्यांनी नेहमीच काळजी घेतली आहे.
आमच्या नात्यातील एक गोड आठवण म्हणजे मी वरच्या खोलीत अभ्यास करत असेन, तर मामा आधी आईला किंवा मामीला विचारतात,
"दिदी कुठे आहे?"
हे त्यांचं वाक्य आजही माझ्या कानात घुमतं. परीक्षा सुरू असतील, तर ते विचारतात,
"पेपर कसे चालू आहेत?"
या छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांचं प्रेम आणि काळजी दिसून येते.
कधी सायकलमध्ये हवा कमी असेल, तर हवा भरून देणं, कधी कॉलेजला सोडणं किंवा आणणं, हे सगळं आमच्यासाठी नेहमीचं असतं. पण माझ्यासाठी मात्र ते खास क्षण असतात. आणि हो, गाडीवरून जाण्याचा आनंद तर काही वेगळाच असतो. परत येताना वडापाव, पाणीपुरी असं काही ना काही खाणं आमचं ठरलेलंच असतं. घरी आल्यावर मी दरवाज्यातूनच म्हणते,
"मामी, वडापाव!"
आणि लगेच मामीच्या चेहऱ्यावर एक छोटंसं हसू उमटतं. तो क्षण मला खूप आवडतो.
या कदाचित खूप छोट्या आठवणी असतील, पण माझ्यासाठी त्या खूप मोठ्या आणि मौल्यवान आहेत.
सध्या मामांवर खूप जबाबदाऱ्या आणि ताण आहे. त्यामुळे कधी कधी घरात मतभेद किंवा वादही होतात. माझ्या आजींचा स्वभावही वयानुसार थोडा चिडचिडा झाला आहे. त्यामुळे काही वेळा घरात वातावरण तणावाचं होतं.
पण मला एक गोष्ट माहीत आहे—ही परिस्थिती कायमची राहणार नाही. घरात भांडणं होतात, मतभेद होतात, पण शेवटी तीच माणसं पुन्हा एकमेकांशी बोलायला लागतात आणि एकत्र येतात. कारण नाती ही रागापेक्षा आणि वादांपेक्षा मोठी असतात.
आज या सगळ्या आठवणींकडे मागे वळून पाहताना मनात एकच भावना येते—कृतज्ञतेची.
कारण माझ्यासाठी मामा हे फक्त एक नातं नाही, तर माझ्या आयुष्यातील एक आधार, एक विश्वास आणि एक हक्काची सावली आहेत.
Chapter -3 मामाच्या घरातील सण, मजा आणि आठवणी.
मामाच्या घरातील सण आणि त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी सांगायच्या झाल्या, तर मन आनंदाने भरून येतं. सण म्हणजे फक्त पूजा, फराळ किंवा नवीन कपडे नव्हते, तर ते आमच्या घरातील आनंद, एकत्र येणारी माणसं आणि जपून ठेवण्यासारखे क्षण होते.
दसरा
आमच्या घरी दसरा मोठ्या उत्साहात साजरा व्हायचा. घरासमोर सुंदर सडा आणि रांगोळी काढली जायची. दाराला आंब्याच्या पानांचं तोरण बांधलं जायचं. नवरात्र संपल्यानंतर दहाव्या दिवशी घटाची पूजा करून आंबाडीची भाजी आणि बाजरीची भाकरी नैवेद्य म्हणून दाखवली जायची. काही वेळा पुरणपोळीचा स्वयंपाकही असायचा.
सकाळी सायकल, गाड्या आणि घरातील साधनं स्वच्छ धुऊन त्यांची पूजा केली जायची. संध्याकाळी माझ्या दप्तरातील वह्या, हिशोबाच्या वह्या आणि पुस्तकांची पूजा केली जायची. पाटीवर किंवा वहीवर सरस्वतीचं चित्र काढून तिची पूजा व्हायची.
त्यानंतर आम्ही मोठ्यांच्या घरी जाऊन आपट्याची पानं म्हणजेच "सोने" देत असू आणि त्यांचे आशीर्वाद घेत असू. हा सण आमच्यासाठी खूप खास असायचा.
दिवाळी
दिवाळी हा आमच्या घरातील सर्वात मोठा आणि आवडीचा सण होता. दिवाळी जवळ आली की घरात वेगळीच लगबग सुरू व्हायची. फराळ आधीच तयार व्हायचा आणि मग सगळ्यांसाठी नवीन कपडे घेण्यासाठी गावात जाणं हा आमच्या आनंदाचा भाग असायचा.
आमचं घर कौलारू आणि पत्र्याचं होतं. दिवाळीत मामा गावातून छोट्या छोट्या चांदण्या आणि एक मोठा आकाशकंदील आणायचे. पत्र्याच्या छोट्या छिद्रांमधून दोरे टाकून त्या चांदण्या लावल्या जायच्या. रात्री ते दृश्य इतकं सुंदर दिसायचं की आजही ते डोळ्यांसमोर उभं राहतं.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य, फराळ, फुलांनी सजवलेली पूजा आणि आनंदाचं वातावरण असायचं. माझी आजी आणि लहान मावशी या सगळ्या तयारीत पुढे असायच्या.
माझ्या मनात मात्र एकच उत्सुकता असायची — "लक्ष्मीपूजन कधी होईल आणि मी फटाके कधी फोडेन?"
त्या दिवसांचा उत्साहच काही वेगळा होता.
भाऊबीज
भाऊबीज आली की सगळ्या मावश्या, त्यांची मुलं आणि नातेवाईक एकत्र जमायचे. घरात गडबड, हशा आणि आनंदाचं वातावरण असायचं. मावश्या मामांना ओवाळायच्या आणि आम्ही भावंडंही एकमेकांना भेटायचो.
घरात इतकी किलबिल असायची की सगळे परत गेल्यानंतर घर अगदी शांत वाटायचं आणि मनाला करमत नसायचं.
रामनवमी
आमच्या श्रीरामपूर शहराच्या नावातच "श्रीराम" असल्यामुळे आमच्या भागात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी होते.
त्या काळात गावात वेगळीच चैतन्याची हवा असायची. मावश्या आणि नातेवाईक घरी यायचे. आम्ही सगळे मिळून जुन्या राम मंदिरात दर्शनासाठी जायचो. त्यानंतर जत्रा, बाजार, खरेदी, खेळणी आणि फिरणं असायचं.
घरी परत आल्यावर सगळ्यांनी घेतलेल्या वस्तू एकमेकांना दाखवण्याची मजाच काही वेगळी होती.
गणपती
गणपतीच्या दिवसांत तर आमच्या घरात आणखीच उत्साह असायचा. आदल्या दिवशीच सजावट पूर्ण करून ठेवली जायची. दुसऱ्या दिवशी फक्त गणपती बाप्पांना घरी आणायचं बाकी असायचं.
माझ्या चुलत मामांचं घर शेजारीच असल्यामुळे आम्ही सगळे एकमेकांच्या आरतीला जायचो आणि त्यांनाही आमच्या घरी बोलवायचो. त्या दिवसांत घरात आणि परिसरात एक वेगळीच ऊर्जा असायची.
आजही मनात जिवंत असलेल्या आठवणी
आज त्या दिवसांकडे पाहिलं की जाणवतं की त्या वेळी घरं लहान होती, पण मनं खूप मोठी होती. आज घरं मोठी झाली, पण माणसं आपापल्या आयुष्यात व्यस्त झाली आहेत. आम्ही सगळी भावंडं मोठी झालो, प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या वाढल्या आणि भेटीगाठी कमी झाल्या.
कधी कधी वाटतं, खरंच ते दिवस किती सुंदर होते!
आजोबांची आठवण आली की मन भरून येतं. पण एक गोष्ट आजही तशीच आहे — सुख असो किंवा दुःख, सगळे एकमेकांसाठी धावून येतात. आणि त्यामुळेच मला खात्री आहे की एक दिवस सगळं पुन्हा छान होईल.
त्या आठवणी कायम माझ्यासोबत राहतील आणि आजचे दिवसही एक दिवस आठवणी बनतील.
म्हणूनच मी एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छिते —
प्रत्येक दिवस खास असतो. तो मनापासून जगा, जपा आणि आठवणींमध्ये साठवून ठेवा.
कारण आयुष्य पुढे जात राहतं, पण आठवणी कायम आपल्या सोबत राहतात.
Chapter -4 मामांकडून शिकलेल्या गोष्टी .
मामांकडून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संघर्ष करत राहण्याची आणि परिस्थितीसमोर न खचण्याची ताकद.
मी लहानपणापासून माझ्या मामांना मेहनत करताना आणि संघर्ष करताना पाहिलं आहे. परिस्थिती कधीच कायम सारखी नसते, पण परिस्थितीसमोर हार मानायची नसते हे मी त्यांच्याकडून शिकले. कितीही अडचणी आल्या तरी पुन्हा उभं राहायचं आणि पुढे चालत राहायचं, ही शिकवण मला त्यांच्याकडून मिळाली.
माझ्या दहावीच्या परीक्षेच्या वेळी मामांनी मला एक गोष्ट सांगितली होती. त्यांनी म्हटलं होतं,
"एक वेळ मार्क कमी पडले तरी चालतील, पण ते स्वतःच्या मेहनतीचे असायला हवेत."
ही गोष्ट माझ्या मनात कायमची घर करून राहिली. मी त्या शब्दांचा विचार करून दहावीचा अभ्यास मनापासून केला आणि चांगले गुण मिळवले. त्या अनुभवातून मला एक गोष्ट समजली—स्वतःशी आणि इतरांशी नेहमी प्रामाणिक राहायला हवं.
लोकांना समजून घेणं, त्यांच्या भावना जाणून घेणं आणि प्रत्येकाशी आदराने आणि प्रेमाने बोलणं, या गोष्टीही मी माझ्या मामांकडून शिकले आहे.
खरं सांगायचं झालं तर त्यांच्या संस्कारांचा माझ्यावर खूप मोठा प्रभाव आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. अनेक वेळा इतरांना पाहिल्यावर मला जाणवतं की माझ्यावर झालेले संस्कार मला योग्य मार्ग दाखवत आहेत.
माझी एक इच्छा आहे की भविष्यात मी असं काहीतरी करावं की ज्यामुळे माझ्या मामांना माझा अभिमान वाटेल.
अर्थात, प्रत्येक नात्यात कधी ना कधी मतभेद होतातच. कधी माझ्याकडून चूक होते, तर कधी मामांकडून रागाच्या भरात काही बोललं जातं. पण त्या गोष्टी आम्ही मनात ठेवत नाही. थोड्या वेळाने आम्ही पुन्हा पूर्वीसारखे बोलायला लागतो.
आजकाल माझा अभ्यास आणि मामांचं काम यामुळे आम्हाला फार वेळ एकत्र घालवता येत नाही. पण आमच्यातील आपुलकी आणि आदर आजही तसाच आहे.
मामांचा माझ्यावर असलेला धाक मला कधीच ओझं वाटलं नाही. उलट तो माझ्यावर झालेले चांगले संस्कार आणि त्यांचं माझ्यावरील प्रेम याची जाणीव करून देतो.
अशा प्रकारे माझ्या मामांकडून मी आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकले आहे. त्या शिकवणी आणि संस्कार माझ्यासोबत आयुष्यभर राहतील.
Chapter -5 माझ्यासाठी मामा म्हणजे...
माझ्यासाठी मामा म्हणजे काय, हा प्रश्न जर कुणी मला विचारला तर त्याचं उत्तर एका वाक्यात देणं खूप कठीण आहे. कारण मामा हे माझ्यासाठी फक्त एक नातं नाही, तर माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहेत.
मी आधीही सांगितलं आहे की माझे मामा माझे वडील नाहीत, पण माझ्यासाठी ते वडिलांपेक्षा कमीही नाहीत. माझ्या आयुष्यात त्यांनी वडिलांची जागा घेतली आहे असं म्हणायला मला अजिबात संकोच वाटत नाही.
आई-वडिलांनंतर जर कोणीतरी मनापासून जीव लावणारं, काळजी घेणारं आणि आपल्या आनंद-दुःखात सोबत उभं राहणारं नातं असेल, तर ते म्हणजे मामा.
माझ्यासाठी मामा म्हणजे माझा जीव की प्राण आहेत. आयुष्यात अनेक वेळा मला त्यांच्या प्रेमाची, काळजीची आणि आधाराची जाणीव झाली आहे. त्यामुळे परिस्थिती कशीही असो, काळ कसा बदलो, पण मनाने एकमेकांची साथ कधीही सोडायची नाही, अशी भावना माझ्या मनात कायम आहे.
मामा आणि भाचीचं आमचं नातं हे फक्त रक्ताचं नातं नाही, तर विश्वास, आपुलकी आणि जिव्हाळ्याने बांधलेलं एक सुंदर नातं आहे.
देवाच्या कृपेने माझ्या मामांना साथ देणारी आणि आमच्या घराला प्रेमाने सांभाळणारी अशी मामीही मला मिळाली आहे. माझ्यासाठी त्या देखील तितक्याच जवळच्या आहेत. त्यांचं प्रेम, काळजी आणि समजूतदारपणा यामुळे घराला एक वेगळीच ऊब मिळते.
आता त्यांच्या आयुष्यात एक छोटी परी आली आहे आणि ती म्हणजे माझी लाडकी बहीण. तिच्याशिवाय मला करमतच नाही.
तिचं नाव "अनुश्री" आहे आणि हे नाव ठेवण्याचा मान मला मिळाला, ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. हे नाव मी माझ्या मामा आणि मामीच्या नावांवरून सुचवलं होतं. घरातील सगळ्यांनाच ते नाव खूप आवडलं आणि विशेष म्हणजे मामांनाही ते खूप आवडलं.
खरं तर मी हे नाव आधीपासूनच मनात ठरवून ठेवलं होतं. मुलगा झाला तर कोणतं नाव ठेवायचं आणि मुलगी झाली तर कोणतं नाव ठेवायचं, याचा विचार मी आधीच केला होता. पण ही गोष्ट मी कोणालाच सांगितली नव्हती. योग्य वेळ आल्यावर मी ते नाव सांगितलं आणि सगळ्यांनी ते आनंदाने स्वीकारलं.
आज या सगळ्या आठवणींकडे पाहिलं की मन आनंदाने भरून येतं.
आमच्या नात्यात प्रेम आहे, आपुलकी आहे, काळजी आहे, आधार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांबद्दलचा विश्वास आहे.
आणि म्हणूनच माझ्यासाठी मामा म्हणजे —
एक हक्काचं नातं, एक आधार, एक विश्वास आणि आयुष्यभरासाठी जपून ठेवण्यासारखी एक सुंदर आठवण.
निष्कर्ष -
या पुस्तकाच्या माध्यमातून मी माझ्या आयुष्यातील एका अतिशय महत्त्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या नात्याविषयी माझ्या भावना, आठवणी आणि अनुभव तुमच्यासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.
मामा हे फक्त एक नातं नसतं, तर ते प्रेम, माया, आधार, विश्वास आणि आपलेपणाची भावना असते. प्रत्येकाच्या आयुष्यात या नात्याचं महत्त्व वेगळं असतं, पण माझ्यासाठी हे नातं माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.
लहानपणीच्या आठवणी, सणांचा आनंद, मिळालेले संस्कार, संघर्षाच्या काळात मिळालेला आधार आणि प्रत्येक क्षणी जाणवलेली आपुलकी यामुळे हे नातं माझ्यासाठी आणखी खास बनलं आहे.
आजच्या धावपळीच्या जगात माणसं व्यस्त होत आहेत, नात्यांमध्ये अंतर निर्माण होत आहे, पण नाती टिकवण्याचा प्रयत्न आपणच करायला हवा. कारण पैसा, संपत्ती आणि यश यापेक्षा माणसं आणि त्यांचं प्रेम अधिक मौल्यवान असतं. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक नात्याची किंमत करा, त्यांना वेळ द्या आणि त्यांच्यासोबतचे क्षण मनापासून जगा. कारण वेळ निघून जाते, पण आठवणी कायम आपल्या सोबत राहतात.
आणि शेवटी एकच सांगावंसं वाटतं —
जर तुमच्या आयुष्यात मामा असतील, तर त्यांच्यावर मनापासून प्रेम करा, त्यांचा आदर करा आणि त्यांच्यासोबतच्या आठवणी जपा. कारण काही नाती ही देवाने दिलेली सर्वात सुंदर भेट असतात.
माझ्यासाठी मामा म्हणजे —
एक हक्काचा माणूस, एक आधार, एक विश्वास आणि आयुष्यभर जपून ठेवावंसं वाटणारं एक सुंदर नातं.
धन्यवाद!
लेखिका - साक्षी .
