Back to Book Details Report Reviews

त्या, पिशवीचं ओझं

घरची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झाली होती की दोन वेळचे जेवण मिळणेही कठीण झाले होते. पोटाची खळगी भरण्यासाठी आईला घराबाहेर पडावे लागले. आई अशिक्षित नव्हती; तिला शिक्षणाचे महत्त्व समजत होते. “माझा मुलगा शिकला तरच हे दारिद्र्य बदलू शकते, नाहीतर आयुष्यभर गरिबीतच मरावे लागेल,” ही जाणीव तिच्या मनात खोलवर रुजली होती. म्हणूनच माझ्या शिक्षणासाठी मिळेल ते काम करण्याचा तिने निर्धार केला होता.
आईला खात्री होती की आजचे कष्ट उद्या नक्की फळ देतील. पण तिच्या एकटीच्या मजुरीवर घर चालत नव्हते. बाजार महाग झाला होता, गरजा वाढत होत्या. अशात आमच्या शेजारच्या काकूंनी आईला सल्ला दिला, “प्रविण आता थोडा मोठा झाला आहे. त्यालाही शेतात निंदण-खुरपणाला घेऊन जा.”
आईच्या मनाला ते पटत नव्हते. एवढ्या लहान मुलाने कसे काम करावे? पण गरिबीपुढे भावना हरत होत्या. मग एक तोडगा निघाला—मला फक्त नावापुरते कामावर न्यायचे, प्रत्यक्ष काम आईच करायची आणि माझ्या नावाने अर्धी मजुरी घ्यायची.
त्या रात्री आईने मला जवळ बसवून सांगितले,
“तुझी शाळा सकाळी असते. शाळा सुटली की मी ज्या शेतात असेन तिथे यायचे. तुला काही काम करायचे नाही. फक्त माझ्या जवळ राहायचे.”
मी निरागसपणे “हो” म्हटले.
दुसऱ्या दिवसापासून माझे आयुष्य बदलले. सकाळी शाळा आणि दुपारी शेत. शाळा सुटली की मी धावत आईकडे जायचो. आई माझ्यासाठी जुने कपडे आणि डब्यात भाकर-चटणी घेऊन यायची. शाळेचा गणवेश काढून मी ती फाटकी कपडे घालायचो आणि आईसोबत शेतात कामाला लागत असे. आई मला काम करू देत नसे, पण मी तिच्या मागे मागे फिरत मदत करत राहायचो.
हळूहळू घरात थोडे पैसे शिल्लक राहू लागले. गरिबी अजून होती, पण आशेचा किरणही दिसू लागला होता.
एक दिवस आम्ही वैद्य नावाच्या शेतकऱ्याच्या शेतात काम करत होतो. काम करता करता मला एका झुडपाजवळ एक छोटी पिशवी दिसली. मी ती उघडून पाहिली… आत दोनशे पन्नास रुपये होते.
त्या काळी दोनशे पन्नास रुपये म्हणजे माझ्यासाठी मोठा खजिनाच होता. माझ्याकडे शाळेची पुस्तके घेण्यासाठी पैसे नव्हते. ते पैसे पाहताच माझ्या मनात विचारांचे वादळ उठले. मला वाटले—देवानेच ही पिशवी माझ्यासाठी पाठवली असावी.
मी स्वप्न पाहू लागलो.
“उद्या मी नवीन पुस्तके घेणार… खूप अभ्यास करणार… मोठा माणूस बनणार…”
गरीब मुलाची स्वप्नेही किती साधी असतात!
पण ती पिशवी पारधी समाजातील मदारी नावाच्या बाईची होती. काही वेळाने ती रडत रडत सर्वांना विचारू लागली, “माझी पिशवी कुणाला दिसली का?”
मी तिला विचारले, “पिशवीत काय होते?”
ती म्हणाली, “माझे सोन्याचे भांडे होते.”
मी पुन्हा विचारले, “आणखी काय?”
पण ती पैशांबद्दल काहीच सांगत नव्हती. त्यामुळे माझ्या मनात शंका आली. मला वाटले, ही बाई खोटे बोलते आहे. जर मी पिशवी दिली तर ती सोन्याचे भांडे मागेल मग मी कुठून आणून देणार? म्हणून मी गप्प बसलो.
लोभ हळूहळू माझ्या मनावर कब्जा करू लागला होता. मला वाटत होते, मदारीने मला पिशवी उचलताना पाहिले असावे आणि आता ती खोटा दावा करत असेल.
पैशाचा मोह फार विचित्र असतो. पतंगाला माहीत असते की दिव्याजवळ गेलो तर जळून जाईल, तरी तो तिकडेच झेपावतो. मीही त्या दिवशी नकळत मोहाच्या आगीत जळत होतो.
मदारीचे प्रयत्न निष्फळ ठरत होते. शेवटी ती म्हणाली,
“माझी देवी फार जागृत आहे. आज रात्री मी तिची पूजा करीन. देवी मला सांगेल की पिशवी कुणी घेतली. मग मी देवीला सांगेन—त्याला संपवून टाक!”
हे ऐकताच माझ्या अंगावर काटा आला. मी घाबरलो. लघुशंकेला जातो असे सांगून मी ती पिशवी दुसऱ्या शेतात लपवून ठेवली.
त्या क्षणापासून माझ्या मनात भीतीचे वादळ उठले. सतत वाटत होते—ती देवी मला पाहते आहे… मला शाप देणार आहे… मी मरून जाईन.
पण दुसरीकडे मन म्हणत होते—
“या पैशांनी मी पुस्तके घेणार आहे. चांगल्या कामासाठीच तर वापरणार आहे.”
मला तेव्हा समजत नव्हते की चोरी म्हणजे चोरीच असते. कारण काहीही असो, चुकीचे काम पापच असते.
आई माझ्यासोबत होती. तिला माझ्यावर पूर्ण विश्वास होता. “माझा मुलगा असे काही करणार नाही,” असेच तिला वाटत होते.
संध्याकाळ झाली. आम्ही घरी आलो. पण माझ्या मनात भीती घर करून बसली होती. “जर मी मेलो तर आईचे काय होईल?” हा विचार मला पोखरत होता.
रात्री झोपताना मी मनोमन देवाला प्रार्थना केली—
“देवा, मला माफ कर. पुन्हा असे कधी करणार नाही.”
दिवसभराच्या थकव्याने लगेच झोप लागली.
सकाळी डोळे उघडले आणि मला आश्चर्य वाटले—मी जिवंत होतो! मला काही झाले नव्हते. मला वाटले, “माझा देव तिच्या देवीपेक्षा मोठा आहे.”
त्या रात्री जोरदार पाऊस झाला होता. पिशवीची आठवण सतत येत होती. पण तिला आणायला जाणे शक्य नव्हते. आईने मला शाळेसाठी हाक मारली आणि मी पुन्हा नेहमीप्रमाणे शाळेला गेलो.
आता शाळेत माझे नवीन मित्र झाले होते. इंग्रजी, गणित, नवीन विषय… सगळेच वेगळे वाटत होते. माझे मन हळूहळू शिक्षणात रमू लागले होते. ती शाळा, ती मस्ती, तो अभ्यास—माझी नवी दुनिया बनत होती.

वय वाढत होते, शरीर बदलत होते, पण एक गोष्ट बदलली नव्हती माझा पेहराव. मी अजूनही गावचा गावठी बनून रहायचो पण आता परिस्थिती बदलली होती. सर्व मुलांचे कपडे स्वच्छ असत, शिक्षक देखणे दिसत, मॅडम सुंदर दिसायच्या. त्यांना पाहून मलाही स्वतःमध्ये बदल जाणवू लागला होता.

माणूस परिस्थितीनुसार बदलत असतो. परिवर्तन हा जीवनाचा नियम आहे.
शाळा सुटली. क्लास टीचर म्हणाले,
“उद्या प्रत्येकाकडे पुस्तकं असली पाहिजेत.”
सरांचे शब्द ऐकताच मला त्या पिशवीची आठवण झाली.
त्या दिवशी मी मित्रांसोबत न जाता हळूच त्या शेताकडे वळलो जिथे मी पिशवी लपवली होती. धडधडत्या मनाने मी शोधायला सुरुवात केली… आणि ती पिशवी मला तिथेच मिळाली.
मी दोनशे पन्नास रुपये काढले. रिकामी पिशवी पुन्हा त्या शेतात फेकून दिली आणि घरी आलो.
घरी आल्यावर मी आईला सर्व खरं खरं सांगितलं आणि ते पैसे तिच्या हातात ठेवले. आई काहीच बोलली नाही. पण तिच्या मनात दुःख होत ते तिच्या डोळ्यात मला दिसत होत. ती पैसे परत करायला गेली होती, पण नंतर तिलाही भीती वाटली—“आता पैसे परत केले तर लोक आपल्यालाच चोर म्हणतील.”
म्हणून ते पैसेही परत झाले नाहीत… आणि त्या पैशांची पुस्तकेही आणली गेली नाहीत.
बरेच दिवस ते पैसे घरात तसेच पडून राहिले. नंतर त्यांचे काय झाले, मला आठवत नाही. पण ती घटना मात्र आयुष्यभर माझ्या मनात कोरली गेली.
आजही मला जाणवते—
चांगली कामे आपण लवकर विसरतो, पण चुकीची कामे मन कधीच विसरत नाही.
लोक चांगल्या गोष्टींची आठवण ठेवतात…
पण आपल्या चुका आपले मन आयुष्यभर जपून ठेवते. त्या पिशवीचं ओझ आजही माझ्या मनावर कायम राहिलं.

Reviews


Your Rating

blank-star-rating

Left Menu