पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

शाळेतील दिवस

प्रस्तावना -



शाळा... हा शब्द ऐकताच तुमच्या डोळ्यांसमोर काय येतं?


 माझ्या डोळ्यांसमोर तर शाळेच्या असंख्य गोड आठवणी उभ्या राहतात. जुने मित्र-मैत्रिणी, प्रेमळ शिक्षक, कधी अभ्यास न केल्यावर मिळालेला छडीचा मार, एकत्र डबा खाणे, मन लावून अभ्यास करणे, एकमेकांच्या खोड्या काढणे, एकमेकांना समजून घेणे आणि शिक्षकांची मजा घेणे... हे सगळं आजही तितकंच जिवंत वाटतं.

  तुम्हाला शाळेचा पहिला दिवस आठवतो का? शाळेत जायचं म्हणून रडणं, नवीन मित्र बनवणं, नवीन वर्ग, नवीन पुस्तके... आणि अभ्यास केला नाही तर शिक्षकांची बोलणी किंवा कधी छडीचाही मार! त्या वेळी राग यायचा, पण आज त्या सगळ्या आठवणी मनात हसू आणतात.   

शाळेच्या अशा कितीतरी आठवणी आहेत, ज्या शब्दांत पूर्णपणे व्यक्तच करता येत नाहीत. त्या फक्त मनात जपून ठेवाव्या लागतात .     

 खरंच, आयुष्यातील सर्वात सुंदर काळ कोणता असेल, तर तो म्हणजे शाळेतील दिवस. आज जर कोणी मला विचारलं, "तुला आयुष्यात पुन्हा काय हवं आहे?" तर मी नक्कीच माझे शाळेतील दिवस परत मागेन. कारण त्या दिवसांमध्ये निरागसता होती, मैत्री होती, आनंद होता आणि आयुष्यभर जपून ठेवाव्यात अशा असंख्य गोड आठवणी होत्या.



Chapter - 1.   शाळेचा पहिला दिवस.

"शाळेचा पहिला दिवस..." हा शब्द ऐकताच प्रत्येकाच्या मनात काही ना काही आठवणी नक्कीच जाग्या होतात.

तुम्हालाही तुमचा शाळेचा पहिला दिवस आठवतो का?

मला तर फारसा आठवत नाही. पण जेव्हा मी एखाद्या छोट्या मुलाला किंवा मुलीला पहिल्यांदा शाळेत जाताना पाहते, तेव्हा मनात एकच प्रश्न येतो – "आपणही लहानपणी असेच होतो का?" आईचा हात घट्ट पकडून शाळेत जाणं, थोडी भीती वाटणं, रडणं, गोंधळून जाणं... हे सगळं किती निरागस होतं! नंतर आपण पहिलीत जातो आणि आपल्या शिक्षणाच्या प्रवासाची खरी सुरुवात होते. नवीन मित्र-मैत्रिणी, नवीन पुस्तके, नवीन वर्ग आणि रोज काहीतरी नवीन शिकण्याचा आनंद. त्या वेळी ना भविष्याची चिंता होती, ना कोणतंही टेन्शन. मनाला वाटेल तसं हसायचं, खेळायचं आणि प्रत्येक दिवस मनापासून जगायचा.

शाळेच्या आठवणी म्हटल्या की फक्त अभ्यासच नाही, तर शाळेबाहेर मिळणारे खाऊदेखील आठवतात. शाही पेप्सी, पाणीपुरी, रगडा, बर्फी, हजमोला, सोना-चांदी, चांद तारे, सुके गुलाबजाम, पार्ले-जी, हॅपी हॅपी बिस्किट... हे सगळे पदार्थ आजही आठवले की चेहऱ्यावर हसू येतं.

आणि शाळेच्या मध्यान्ह भोजनाची आठवण तर खासच! त्याचबरोबर २६ जानेवारी, १५ ऑगस्ट आणि १ मे या दिवशी ध्वजारोहणानंतर मिळणारा खाऊ – केळं, बिस्किट आणि छोटंसं बिस्किटाचं पाकीट. तेव्हा आपण मित्रांमध्ये हसत म्हणायचो, "आपली शाळा किती गरीब आहे!" पण आज त्या आठवणी आठवल्या की मन भरून येतं.

खरंच, शाळेतील ते दिवस पुन्हा जगायला मिळाले तर त्यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणताच नाही. शाळेच्या त्या गोड, निरागस आणि आनंदी आठवणी आयुष्यभर आपल्या मनात जपलेल्या राहतात.


Chapter - 2. -  मित्र-मैत्रिणी – शाळेतील जिवाभावाचे नाते.

शाळेतील मित्र-मैत्रिणी हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर नात्यांपैकी एक असतात. आमच्या शाळेत पहिली ते चौथीपर्यंत मुलं आणि मुली एकाच वर्गात शिकायचो. त्यानंतर पाचवी ते दहावीपर्यंत फक्त मुलींचीच शाळा होती. पण त्या दिवसांच्या आठवणी आजही मनात ताज्याच आहेत.

मैत्रिणी या रक्ताच्या नात्यातील नसल्या, तरी त्या आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनतात. शाळेत गेल्यावर त्या भेटणार आहेत, हीच भावना शाळेत जाण्याचा उत्साह वाढवायची. वर्गात अभ्यास करायचा, शिक्षकांचं लक्षपूर्वक ऐकायचं आणि मधल्या सुट्टीची आतुरतेने वाट पाहायची.

मधली घंटा झाली की दहा मिनिटांत डबा संपवून आम्ही लगेच खेळायला पळायचो. लपाछपी, लिंगोरचा, हॉलीबॉल, फुटबॉल, बॅडमिंटन असे कितीतरी खेळ आम्ही मनसोक्त खेळायचो. त्या छोट्याशा सुट्टीतही किती मोठा आनंद मिळायचा!

शनिवारी दुपारची शाळा असायची. त्या दिवशी अभ्यासापेक्षा गप्पा, हशा आणि मजा जास्त व्हायची. आणि मग रविवारची सुट्टी... त्या दोन दिवसांचा आनंद काही वेगळाच असायचा.

आणखी एक आठवण आजही मनात ताजी आहे. दुसऱ्या दिवशी एखाद्या सणानिमित्त सुट्टी असली की वर्गात सूचना यायची, "सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की उद्या..." एवढं ऐकताच आम्ही सगळे एकाच आवाजात, "सुट्टी!" असं ओरडायचो. तो आनंद शब्दांत सांगणं कठीण आहे.

शाळेत कधी कविता म्हणायला किंवा प्रार्थना म्हणायला उभं केलं की कितीही प्रयत्न केला तरी सगळ्यांचा आवाज एकसारखा कधीच यायचा नाही. तरीही त्या विस्कळीत सुरांतही एक वेगळीच जादू होती, जी आजही मनात घर करून आहे.

खरंच, शाळेतील मित्र-मैत्रिणी आणि त्यांच्यासोबत घालवलेले ते क्षण आयुष्यभर जपून ठेवावेत असे आहेत. काळ पुढे जातो, माणसं मोठी होतात, पण शाळेची मैत्री आणि त्या गोड आठवणी कधीच जुन्या होत नाहीत.


Chapter - 3. शिक्षक आणि त्यांचे मार्गदर्शन.

शाळेच्या सुंदर आठवणी म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यांसमोर येतात ते म्हणजे आपले शिक्षक. जसं आई-वडिलांमुळे घराला आधार मिळतो, तसंच शिक्षकांमुळे शाळेला खरी ओळख मिळते. शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात योग्य दिशा दाखवणारे, चांगल्या-वाईटाची जाणीव करून देणारे आणि भविष्य घडवणारे व्यक्तिमत्त्व असतात.

आमच्या शाळेतील शिक्षकही अगदी तसेच होते. प्रत्येक गोष्ट संयमाने समजावून सांगणे, शिकवताना वेगवेगळी उदाहरणे देणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला समजेल अशा पद्धतीने शिकवणे, हा त्यांचा स्वभाव होता. कधी ते रागवायचे, ओरडायचे, पण त्यामागे नेहमीच आमचं भलं दडलं असायचं. त्यामुळे त्यांच्या रागातही प्रेम आणि काळजी जाणवायची.

आजही आमच्या काही शिक्षकांच्या आठवणी मनात अगदी ताज्या आहेत. आमचे गणिताचे एक सर कामानिमित्त दुबईसारख्या अनेक देशांत फिरून यायचे. ते तिथल्या भाषा आणि अनुभव आमच्यासोबत शेअर करायचे. गणित हा विषय ते इतका सोपा करून शिकवायचे की कठीण वाटणारी उदाहरणेसुद्धा सहज समजायची.

पण त्यांना राग आला की त्यांचा एक वेगळाच अंदाज असायचा. ते म्हणायचे, "Mad, Cap, Nonsense... तुला काही कळत नाही का? मूर्ख!" हा त्यांचा संवाद इतका प्रसिद्ध झाला होता की ते वर्गातून गेल्यावर आम्ही त्यांच्या बोलण्याची मजेशीर नक्कल करायचो आणि सगळा वर्ग हसून लोटपोट व्हायचा.

आमच्या दुसऱ्या एका सरांचा संवादही तितकाच प्रसिद्ध होता – "दात तोडून घशात घालीन!" ते हे वाक्य म्हणाले की सगळे शांत बसायचे. तर आणखी एक सर प्रत्येक मुलीला प्रेमाने "बाळ" म्हणून हाक मारायचे. त्यांच्या त्या एका शब्दातही आपुलकी आणि माया जाणवायची.

आमच्या मुख्याध्यापिकांनी आम्हाला शिस्तीचं महत्त्व शिकवलं. केसांच्या दोन वेण्या, स्वच्छ गणवेश, वेळेवर शाळेत येणं आणि नियमांचं पालन करणं यावर त्यांचा नेहमी भर असायचा. कधी उशिरा शाळेत गेलो तर शिक्षा म्हणून शाळेच्या मैदानाला तीन फेऱ्या माराव्या लागायच्या. त्या वेळी ती शिक्षा वाटायची, पण आज विचार केला तर त्यातूनच वेळेचं महत्त्व आणि शिस्त शिकायला मिळाली.

खरंच, शिक्षक फक्त पुस्तकातील धडे शिकवत नाहीत, तर ते जीवन जगण्याचे धडेही देतात. आज आम्ही जे काही आहोत, त्यामध्ये आमच्या शिक्षकांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या शिकवणी, त्यांचं मार्गदर्शन, त्यांचा राग, त्यांचं प्रेम आणि त्यांच्या असंख्य आठवणी आजही मनात कायम आहेत.

शाळा कधीच विसरता येत नाही आणि शाळेचे शिक्षक तर आयुष्यभर आपल्या हृदयात जपले जातात. 🌸📚


Chapter - 4. शाळेतील खोड्या आणि मजेदार क्षण.

शाळेतील दिवस म्हटलं की अभ्यासाबरोबरच आठवतात त्या खोड्या, धमाल, मस्ती आणि मनमोकळं हसणं. आमच्या शाळेतही अशा अनेक आठवणी आहेत, ज्या आजही आठवल्या की नकळत चेहऱ्यावर हसू उमटतं.

आमच्या वर्गात दोन ग्रुप होते. एक ग्रुप थोडा अॅटिट्यूड दाखवणारा होता, तर आमचा ग्रुप अगदी साधा आणि मनमिळावू होता. आमच्या ग्रुपमध्ये अकरा मैत्रिणी होत्या. दुसऱ्या ग्रुपमध्येही जवळपास तेवढ्याच मुली होत्या. त्यांच्या ग्रुपमधील काही मुली मॉनिटर होत्या. कधी-कधी त्या आमच्या ग्रुपमधील मुलींची नावं लिहायच्या. त्यामुळे राग यायचा, पण मनात वैर कधीच नव्हतं. उलट त्या मनाने चांगल्याच होत्या. आमच्यात कधी भांडण व्हायचं, तर काही वेळातच पुन्हा सगळं सुरळीत व्हायचं.

आमच्या वर्गाच्या एक मॅडम नेहमी म्हणायच्या, "तुमचा वर्ग खूप गोंधळ करतो, अभ्यासात लक्ष नाही." पण त्या वेळी मॉनिटर असलेली एक मैत्रीण लगेच म्हणायची, "मॅडम, आमच्या वर्गाला नावं ठेवू नका. आम्ही अभ्यास करतो." तिचं हे धाडसी बोलणं मला खूप आवडायचं.

आमच्या ग्रुपमध्ये मी आणि माझी एक जिवलग मैत्रीण नेतृत्व करायचो. आम्ही सगळ्यांना समजून घ्यायचो आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालायचो. आमच्या ग्रुपची एक खास गंमत म्हणजे आम्ही एकमेकींना बिस्किटांच्या नावांनी हाक मारायचो. कोणाला पार्ले-जी, कोणाला मोनॅको, कोणाला मारी गोल्ड, तर कोणाला दुसरं एखादं मजेशीर नाव. आज त्या नावांची आठवण झाली तरी हसू आवरत नाही.

माझी एक जिवलग मैत्रीण होती. आमच्या ग्रुपमधील दुसऱ्या एका मैत्रिणीने तिचं टोपणनाव "जंबो" ठेवलं होतं. मग मीही मजेत तिला "काश्मीर" म्हणायचे. अशा छोट्या-छोट्या गोष्टींमध्येच आमचा आनंद दडलेला होता.

एकदा आम्ही लपाछपी खेळत होतो. सगळ्या जणी एकाच ठिकाणी लपलो होतो. अचानक आम्ही धावत बाहेर पडलो आणि एका मैत्रिणीचा पाय दुसरीच्या पायात अडकला. क्षणार्धात आम्ही सगळ्याच एकमेकींवर पडलो. लागलं कमी, पण हसलो इतकं की डोळ्यात पाणी आलं. आजही तो प्रसंग आठवला की मनापासून हसू येतं.

आम्ही नेहमी शेवटच्या बाकावर बसायचो. पण शिक्षकांनी प्रश्न विचारला की उत्तर मात्र आमच्याकडूनच आधी यायचं. त्यामुळे शिक्षकांनाही आश्चर्य वाटायचं की, "मागच्या बाकावर बसणाऱ्या मुली एवढा अभ्यास कधी करतात?" आम्ही खोडकर होतो, पण अभ्यासातही मागे नव्हतो.

कधी बाकाखाली बसून भुतांच्या गोष्टी सांगायचो, तर कधी बाकावर पेनने टकटक करून वेगवेगळे आवाज काढायचो. उपस्थिती घेताना मोठ्या आवाजात "Yes Teacher!" किंवा "Present!" म्हणण्यातही एक वेगळीच मजा होती.

परीक्षेच्या दिवसांत मात्र थोडी भीती वाटायची. शिक्षक नेहमी म्हणायचे, "तुमचे वीस गुण आमच्या हातात आहेत, त्यामुळे नीट वागा." हा त्यांचा संवाद आम्ही कधीच विसरू शकणार नाही. आणि अजून एक वाक्य कायम कानावर पडायचं – "समजलं नाही तर कितीही वेळा विचारा." पण प्रत्यक्षात विचारायला गेलो की एकदाच समजावून सांगायचे आणि म्हणायचे, "सराव करा, मग सगळं येईल." त्या वेळी थोडी चिडचिड व्हायची, पण आज त्या आठवणी आठवल्या की त्यातही गोडवा जाणवतो.

खरंच, शाळेतील या छोट्या-छोट्या खोड्या, हशा, मैत्री आणि निरागस क्षण हेच आयुष्यभर मनात जपून ठेवण्यासारखे असतात. वेळ पुढे जातो, पण त्या आठवणींचा आनंद कधीच कमी होत नाही.


Chapter - 5.खेळ, सहली आणि अविस्मरणीय कार्यक्रम.

शाळेच्या आठवणी म्हटलं की सहली, खेळ आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम मनात हमखास येतात. प्रत्येक कार्यक्रमात एक वेगळाच आनंद असायचा आणि त्या क्षणांची मजा शब्दांत व्यक्त करणं खरंच कठीण आहे.

तुम्हालाही तुमची शाळेची सहल आठवते का?

मला माझी शाळेची सहल आजही अगदी स्पष्ट आठवते. मी दुसरीत असताना आमची सहल भीमाशंकर, देहू, आळंदी आणि शनी शिंगणापूर येथे गेली होती. पहाटे चार वाजता आमची बस निघाली होती. सुरुवातीला घर सोडताना मला खूप रडू आलं होतं, पण थोड्याच वेळात मी स्वतःला सावरलं आणि सहलीचा आनंद घ्यायला सुरुवात केली.

बसमध्ये आम्ही सगळे मिळून "भारत माता की जय!" अशा घोषणा देत होतो. गाणी, गप्पा, हशा आणि मित्र-मैत्रिणींसोबतचा प्रवास यामुळे वेळ कसा गेला तेच कळलं नाही. सर्वप्रथम आम्ही भीमाशंकरचे दर्शन घेतले. त्यानंतर देहू, आळंदी आणि शनी शिंगणापूर येथे जाऊन दर्शन घेतलं, प्रसाद घेतला आणि अनेक सुंदर आठवणी मनात साठवल्या.

त्या सहलीनंतर मात्र मी पुन्हा कधीच शाळेच्या सहलीला जाऊ शकले नाही. कारण मला बसचा खूप त्रास व्हायचा. तरीही ती एकमेव सहल माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आठवणींपैकी एक आहे.

शाळेतील स्नेहसंमेलन हा तर आमच्या सगळ्यांच्या आवडीचा कार्यक्रम असायचा. लहान मुलांचे निरागस नृत्य, सुंदर गाणी, नाटिका आणि विविध कलागुण पाहताना खूप आनंद व्हायचा. प्रत्येक विद्यार्थ्याने केलेली मेहनत त्या मंचावर दिसून यायची.

क्रीडा स्पर्धा देखील तितक्याच उत्साहात पार पडायच्या. धावण्याच्या शर्यती, विविध खेळ आणि स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची मजा काही वेगळीच असायची. स्पर्धेदरम्यान ऐकू येणारा उत्साहवर्धक आवाज अजूनही कानात घुमतो – "शौर्य राम बंधू चिवडा... ह्या वर्गाला निवडा!" अशा घोषणा देत आम्ही आमच्या वर्गाला प्रोत्साहन द्यायचो.

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे दिवस तर विशेष उत्साहाचे असायचे. शाळेच्या आवारात सुंदर रांगोळ्या काढल्या जायच्या, ध्वजारोहण व्हायचं, देशभक्तीपर गीते सादर केली जायची आणि रंगीबेरंगी तिरंगी फुगे आकाशात सोडले जायचे. त्या क्षणी प्रत्येकाच्या मनात देशप्रेमाची भावना जागी व्हायची.

याशिवाय भाषण स्पर्धा, गायन, नृत्य, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि शेवटी होणारं बक्षीस वितरण हेही तितकंच अविस्मरणीय असायचं. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून प्रत्येक कार्यक्रम संस्मरणीय बनायचा.

आज काळ खूप पुढे गेला आहे. प्रत्येकजण आपल्या आयुष्यात व्यस्त झाला आहे. पण शाळेतील ते खेळ, सहली, स्नेहसंमेलने आणि आनंदाचे क्षण आजही मनाच्या एका कोपऱ्यात कायमचे जपलेले आहेत.

खरंच... काही आठवणी कधीच जुन्या होत नाहीत. त्या काळासोबत अधिकच सुंदर होत जातात. शाळेचे ते दिवसही अगदी तसेच आहेत.


Chapter - 6. शाळा – एक सुंदर आठवण.

शाळा... हा फक्त एक शब्द नाही, तर प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि निरागस आठवण आहे. शाळा ही अशी जागा आहे, जिथून आपल्या आयुष्याची खरी सुरुवात होते. इथेच आपण पहिल्यांदा अक्षर ओळखतो, मैत्री करतो, चांगल्या-वाईटाची जाण शिकतो आणि मोठी स्वप्नं पाहायला सुरुवात करतो.

पण ही सुरुवात कधी शेवटाकडे जाते, हे कळतही नाही. एकामागून एक वर्ग पार करत आपण दहावीत पोहोचतो आणि नकळत आपल्या बालपणाचं शेवटचं पान समोर येतं. म्हणूनच म्हणतात, "दहावी म्हणजे बालपणाचं शेवटचं पान." या एका विचारानेही मन भरून येतं.

शाळा सोडताना मनात अनेक प्रश्न होते. शिक्षक पुन्हा भेटतील का? मित्र-मैत्रिणी पुन्हा रोज भेटतील का? शाळेची घंटा, वर्ग, मैदान, खोड्या, अभ्यास, शिक्षकांचा राग आणि त्यांचं प्रेम... हे सगळं पुन्हा अनुभवायला मिळेल का? त्या दिवसांत ज्या गोष्टींचा कधी कंटाळा यायचा, त्याच गोष्टी शाळा संपल्यानंतर खूप हव्याहव्याशा वाटू लागल्या.

आमचे शिक्षक नेहमी म्हणायचे, "शाळा आणि हे बाक इथेच राहणार आहेत, फक्त तुम्ही इथून पुढच्या प्रवासाला जाणार आहात." त्या वेळी या वाक्याचा अर्थ पूर्णपणे समजला नव्हता. पण आज त्यामागचं सत्य मनाला जाणवतं.

शाळेचा निरोप घेताना आम्ही रडलो नाही. कारण आम्हाला वाटलं, आम्ही रडलो तर आमच्या शिक्षकांनाही वाईट वाटेल. म्हणून हसतमुखाने निरोप घेतला. पण आज जेव्हा शाळेची आठवण येते, तेव्हा मन नकळत त्या दिवसांकडे धाव घेतं.

आजही वेळ मिळाला की मी माझ्या शाळेत जाते. माझ्या शिक्षकांना भेटते, वर्गात फेरफटका मारते, मैदानाकडे पाहते... आणि जुन्या आठवणी पुन्हा जिवंत होतात. त्या प्रत्येक कोपऱ्यात माझं बालपण दडलेलं आहे. कधी डोळेही पाणावतात. पण शिक्षकांच्या चेहऱ्यावरचं तेच प्रेमळ हास्य पाहिलं की मन पुन्हा आनंदाने भरून जातं.

फक्त एकच गोष्ट खटकते... शाळा तशीच असते, शिक्षकही भेटतात, पण रोज सोबत असणाऱ्या मैत्रिणी मात्र आता तिथे नसतात. त्यांची उणीव कायम जाणवते.

आयुष्यात पुढे जायचं असेल तर काही गोष्टी मागे सोडाव्याच लागतात. पण याचा अर्थ त्या विसरायच्या असतात, असा नाही. शाळा आणि शाळेच्या आठवणी या आयुष्यभर आपल्या मनात जपून ठेवण्यासारख्या असतात.

आजही मी माझ्या शाळेला भेट देते आणि प्रत्येक वेळी तिथून परतताना मनात एकच विचार येतो...

"किती सुंदर होतं ते बालपण... आणि किती सुंदर होते ते शाळेतील दिवस!"

तुम्हीही कधी तुमच्या शाळेत पुन्हा जाऊन त्या आठवणी जगल्या आहेत का ?


निष्कर्ष

शाळा ही फक्त शिक्षण देणारी संस्था नसते, तर ती प्रत्येकाच्या आयुष्याला योग्य दिशा देणारी एक सुंदर शाळा असते. इथे आपण अक्षरज्ञानाबरोबरच माणुसकी, मैत्री, शिस्त, आदर, प्रेम आणि जीवन जगण्याची कला शिकतो.

काळ पुढे सरकत जातो, आपण मोठे होतो, प्रत्येक जण आपल्या आयुष्यात व्यस्त होतो. पण शाळेच्या आठवणी मात्र कधीच जुन्या होत नाहीत. त्या आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात कायम जिवंत राहतात. कधी एखादं जुनं गाणं, शाळेची घंटा, गणवेश किंवा जुना फोटो पाहिला की नकळत मन पुन्हा त्या दिवसांत जाऊन पोहोचतं.

या पुस्तकातून मी माझ्या शाळेच्या काही गोड आठवणी तुमच्यासमोर मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. कदाचित या आठवणी वाचताना तुम्हालाही तुमचे शाळेतील दिवस, तुमचे मित्र-मैत्रिणी, शिक्षक आणि ते निरागस क्षण आठवले असतील.

आयुष्यात कितीही मोठे झालो, कितीही यश मिळवलं, तरी आपल्या शाळेचं स्थान कोणीही घेऊ शकत नाही. कारण शाळा आपल्याला फक्त शिक्षणच देत नाही, तर सुंदर आठवणींची अमूल्य शिदोरीही देऊन जाते.

शेवटी एवढंच म्हणेन...

"शाळा कधीच विसरता येत नाही... कारण तिथेच आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण जगलेले असतात."

हे पुस्तक वाचण्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद.

                                                   – लेखिका : साक्षी




पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू