आंतर राष्ट्रीय महिला दिवस
आंतरराष्ट्रीय महिला दिवस
होतेच मनात माझ्या, आहे ना मी लेक जिजाईची-अहिल्याबाईंची ,होणारच मी राणी झाशीची ,
आहे माझ्या पदरी पुण्याई सावित्रीची , घेऊन मी ओंजळ शिरीष पैं च्या शब्द फुलांची , शांताबाई शेळक्यांची आणि इंदिराबाई संतांची ,
ओवाळत गेले त्यांच्या प्रतिभेच्या सहस्त्र किरणांना ,मी माझ्या भारावलेल्या मनाने , आणि सरले चार पाऊले पुढे ....
निर्भयता , मातृत्व , नेतृत्व , आणि कर्तृत्व गाजवून ,
आकाशात नक्षी कोरत , मारली भरारी ,
दूर करून पंखांची उब , ओलांडला उंबरा
सोडून दिलं दबकणं , घाबरणं , शब्द ही उच्चारायला न धजणं
तोडून दिला अरेरावीचा पिंजरा ,
सताड उघडलं टोमण्यांच्या बाणांनी विद्ध झालेलं मन
प्रयत्न केला , एक आदर्श माता बनण्याचा ,
तिमिराच्या केसांत किरणांची मोरपिसे खोवण्याचा
दुःखाच्या भयाण अंधारात आशेची एखादी पणतीही
राज्य करू शकते हे दाखवण्याचा
आणि मी यशस्वी झाले , बीजातले हिरवेपण जपत गेले ,
रुक्ष , कोरड्या खडकावरतीही रुजत गेले ,
आणि ... रोज आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करत गेले .
सुषमा ठाकूर