पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आठवणींचे कपाट

आठवणींचे कपाट

 

उघडू नये कधीच गोदरेजचे कपाट

ठासून भरलेल्या आठवणी असतात आत

कधीच घडी न मोडलेल्या साडया

अंगावर घेतात धडाधड उड्या

कोसळतो आठवणींचा धबधबा ॥

 

आठवणी अगणित

प्रत्येक घटनेशी निगडित

नकळत मन आठवू लागते हिशोब

" ही साखरपुडयाची , 

अष्टपुतळी मामाकडची

वरमाला घातली ती लग्नाची ,

 स्वागत समारंभाची , गृहप्रवेशाची " 

ही ऽsमालिका आठवणींची

संपता संपेना

डोहाळे जेवणाची , बारशाची,

सासरची , माहेरची

" अहोंनी " गुपचूप आणलेली 

प्रेमाची काश्मीरची ॥

 

प्रत्येक साडीची अविस्मरणीय आठवण

जपून ठेवली आजन्म साठवण ॥

मना !

आवर रे मोह , उघडायचा लॉकर

कोसळेल अंगावर

वेदनांचा ओहोळ

एकाहून एक दागिने अमूल्य

चेतवतील वेदनांचे शल्य ,

नकळत तू होशील आठवणीत दंग II

 

अंगठी साखरपुडयाची , 

जोडीला माळ सोन्याची

बोरमाळ , पोहे हार , 

लक्ष्मी हार ,चपला हार

दागिने सोन्याचे, मोत्यांचे, जडावाचे

चार पदरी तन्मणी , 

सोन्यात गाठवलेला

दिमाखात वक्षावर रुळलेला

पाटल्या भरीव , पाटल्या नक्षीच्या

भक्कम तोडे शिंदेशाही,

बांगडया मात्र नाजुक किणकिणणाऱ्या

मनाची तार छेडणाऱ्या

हिरव्या रंगाला शोभणाऱ्या

गेलास ना हरवून मना !

सगळ्या दागिन्यांवरुन 

प्रेमाने फिरवला हात मात्र,

हाती आले मंगळसूत्र

दागिन्यांचा मुकुट राज

त्याचा वेगळाच बाज. ॥

 

काळाने सारे दूर हिरावले

 दागिने लॉकरमध्ये 

कायमचे विराजमान झाले

साड्या पडल्यामागे

त्यांचे उडून गेले रंग

आयुष्यात उरला एकच

पांढरा रंग

नाही गळ्यात मंगळसूत्र

सारे वैभव नाममात्र ॥

 

अश्रूंचा येईल महापूर

धूसर सारे दूर दूर ॥

 

नका उघडू गोदरेजचे कपाट

लॉकर तर बंदच ठेवा

बंदिस्त ठेवा अनमोल ठेवा

नकोच त्या आठवणी ॥

 

सुलभा

२४ .५ .२०२२

पुणे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू