शालू भाजीवाली
वळणावरची भाजीवाली
(८ ८ ८ ८)
वळणावरच्या रस्त्यालागुन बसते शालू भाजीवाली
हिरवे गोंदण हातावरती कुंकु लालसे शोभे भाळी
पाट्या भाजीच्या सभोवती घेऊन बसे शालू ताई
शिकली नव्हती पाटीपुस्तक हिशेब तीचा चोख तरीही
मालू,हेमू,पिंगे अण्णा, जमू लागती तिच्या सभोती
कुणास लागे हरित मसाला कुणास लागे शीत काकडी
दुधीदोडके कवळी भेंडी गवारतोंडलि ढब्बू मिरची
ताजी भाजी ताजी भाजी एकच गलका शालुभोवती
कोणी मागे भरीत वांगी कुणा हवी काटेरी बुटकी
उद्या आणते तुमच्यासाठी शालू त्यांची बोळवण करी
आंबट चूका, पालकमेथी ठेवी झाकुनि ओल्याखाली
मोलभाव करती गिर्हाइके शालू त्यांना पुरुनी ऊरी
भटक्या गायी येता जाता टोपलीतली खाती भाजी
ललाटातले न्हेइत नाही शालू जोडे तीची पुस्ती
कुणा मुक्याचे हावभावही शालू अगदी जुस्त ओळखी
आपुलकीने बोलत त्यांशी मुठभर शेंगा त्यांना देई
सणासुदीलासुद्धा शालू घरी आवरुन धंद्यास येइ
दोन लेकरे गोड गोजिरी तिच्याचपाशी अवतीभवती
कधी चुकूनी आली नाही ठळक जाणवे गैरहजेरी
वळणावरचा रस्ताही मग चुकचुक करत दिसाड्या राही
--गीता गरुड.
