सैतान
मीरारोड हत्याकांड दुर्दैवी सरस्वती वैद्य हिस भावपूर्ण श्रद्धांजली
*भावनाशून्य राक्षसा तुज, पिशाच्च कोणते जडे*
*प्रेमी की सैतान तू ,केलेस देहाचे तुकडे..*
भूक वासनेची शमली, गरज तुझी भागली
वृत्ती राक्षसाची ऐसी,विटंबना शरीराची केली,
निर्दयी,निष्टूर विकृतीचे विचित्र दर्शन घडे
प्रेमी की सैतान तू ?केलेस देहाचे तुकडे..
प्रेम नावाला कलंक, अर्थ प्रेमाचा ना ठावे
अमानुष हत्या करुनी,बट्टा माणुसकीला लावे
विक्षिप्त मनोवृत्ती पाप्याची कुबुद्धि अशी नडे
प्रेमी की सैतान तू ?केलेस देहाचे तुकडे..
प्रेम केले तुझ्यावर, हाच गुन्हा तिचा ठरला
विश्वासघातकी सैतानाने, गळा कसा चिरला..
माणसाच्या चेहऱ्यामागे हैवान निर्दयी दडे
प्रेमी की सैतान तू? केलेस देहाचे तुकडे..
लाज श्र्वापदास यावी कृत्य अमानुष पाहुनी
लचके तोडती गिधाडे, तू तर केलास कहर त्याहुनी
चिंधड्या जाहल्या देहाच्या, रक्ताचे पडले सडे
प्रेमी की सैतान तू ?केलेस देहाचे तुकडे..
म्हणती प्रेम पवित्र आहे,घोर पातक मग का घडले?
मृत्य पश्चातही क्रूरतेने,शरीर श्र्वानांस खाऊ घातले..
मरणानंतरही देहाचे निघाले दुर्दैवी धिंडवडे
प्रेमी की सैतान तू? केलेस देहाचे तुकडे..
©️®️
-प्रणाली म्हात्रे
-विक्रोळी मुंबई
