चिमणी होऊन जगता यावं
माणसांनी असावं चिमणा-चिमणी सारखं सर्वसामान्य, अतिसामान्य......
म्हणजे काय होतं की पिंज-यात जखडले जाण्याची भीती रहात नाही........
वाट्टेल तेव्हा वाट्टेल तिथे जाण्याचं, बसण्याचं,उडण्याचं
विशेष म्हणजे घरटं बांधून रहाण्याचं स्वातंत्र्य मिळतं.....
कुठल्याच राज्यात आपण परराज्यातले होत नाही.
आपला आपला चिवचिवाट सुरू ठेऊ शकतो बिनधास्तपणे......
आता बोक्या-मांजरांपासून रहावंच लागत सावध कुठेही गेलं तरी.......
अंडी आणि पिल्लं सांभाळावीच लागतात कोणत्याही ठिकाणी.....
ते ही कसब लीलया पेलतातच की चिमण्या.
कुठलंही वैशिष्ट्य नाही......
ना रंग, ना रूप, ना सुस्वर तरीही
निसर्गाचा समतोल अवलंबून असतो चिमण्यांच्या संख्येवर......
कमी झाली त्यांची संख्या आणि बंद झाले आवाज की जाणवतं.... असण्याची दखल कुणी घेतली नाही तरी नसणं सलत राहत,
संपूर्ण जीवनचक्र दोलायमान करतं ...........
...........यत्किंचित अशा चिमण्यांचं न दिसणं!
......सौ.अर्चना धनंजय संबरकर, परभणी
