बहर
★बहर★
काळ्या सावळ्या ढगाला कडेला चंदेरी तार...
जणू अनुभवसंपन्न प्रवास आणि एक स्मितरेषा..
कोसळतो तो कधीतरी अविरत ढगफुटीसारखा...
मोकळं मोकळं होऊन परत बहरुन यायला...
त्या एका अश्रूची किंमत तरी किती अनमोल...
असतो एका थेंबात जगलेल्या क्षणांचा
परिमल..
आठवणीत तो एकेक अश्रू साठत जातो..
आणि त्याचीच धुवांधार पारदर्शी बरसात होते...
जपलेल्या क्षणांची मऊ गोधडी होते...
हळूच उलगडताना मन चिंब करते..
धरणीत जिरताना ते अश्रू नवनिर्मितीचं बीज रुजवतात...
फुलतो हिरवागार निसर्ग,आणि रंगांचा गालिचा...
पानगळ अलगद बाजूला सारायची..
अन कोवळ्या अंकुराची रुजवात करायची..
नवीन स्वप्न,नवीन आशा, दाराशी थांबलेली..
कवेत घेऊन त्यांना नवीन दिशा मिळावी...
जगण्याचा उत्सव करत गुलालाची उधळण...
विस्मरणात जावं अवघं रंगहीन रितेपण...
बहावा फुलावा पिवळाधमक सोनेरी..
झळाळी पसरावी बहरणाऱ्या किनारी...
- ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे