थांबनारे पावसा
कोसळणाऱ्या पावसा आता थोडा थांब नारे
धरणे भरली,नद्या ओसंडल्या किती हा अट्टाहास
तू असा ओसंडलास तर शेतकरी कसा जगेल?
शेती त्याची वाहून गेली तर आत्महत्या करेल.
असा रे कसा लहरी तू,कधी तोंड लपवतोस
कधी नको इतका कोसळतोस
बघ तरी लोकांचे किती हाल होताहेत
घरात त्यांच्या पाणी शिरून जीव मुठीत घेऊन जगताहेत.
विजा कडाडताहेत,काळे कुट्ट मेघ जीवाला घबरवताहेत.
जिकडे तिकडे हा हा कार,बास नारे आता
मानवाने निसर्गालाच आव्हान दिलं म्हणून रागवलास का?
काय करू म्हणजे तू शांत होशील सांगशील का?
जाणले आम्ही तुझ्या पुढे आम्ही किती क्षुद्र आहोत
कितीही आधुनिक झालो तरी तुझ्यापुढे अगतिक आहोत.
वरुण देवा बास आता थांबव हा रुद्रावतार
येऊदे नारायणाला आता अवकाशात
पसरु दे सूर्याची किरणे आता धरतीवर
श्रावणमासी हर्ष मानसी पसरु दे पृथ्वीवर
अर्चना कुलकर्णी
