झाडं कोसळलं मायेचं
मला हुरहूर वाटते, आई तु घरात नसताना,
अंगी येई हत्तीच बळ, आई तुला पाहताना.
आई कष्टाची मूर्ती, राबली घरं- शेतात,
भूख तिने भागवली, पाण्याच्या घोटात.
तिला आनंद होई, आम्हा पाहून जेवताना..
मला हुरहूर वाटते.....
तिच्या डोळ्यातलं सपान, मला रोजच सांगायची.
आम्ही शिकावे म्हणून, काटकसर करायची.
आधी पुस्तक आणायची, साडी फाटकी असताना.
मला हुरहूर वाटते...
येई, तिच्या डोळ्यात पाणी, आम्हा सुखात पाहून.
झाले काळजाचे तुकडे, आज तिला जातांना पाहून.
हरपली सावली, झाड पडले मायेचे,
आता पोरका झालो, सगेसोयरे असताना.
मला हुरहूर वाटते....
सुखा दुःखात. ती सोबत असायची,
आले जरी दुःख,
आम्हा पाठीशी घालायची.
रुतला नाही कधी काटा, पायी चालताना,
शिवले नाही कधी दुःख, हात मायेचा असताना.
मला हुरहूर वाटते आई घरात नसताना.
प्रवीण ज्यो. तायडे
अमरावती
