अधिकमास
विषय..अधिक महिना
18.5.26
अधिक महिना
माझे माहेरचे आले आवतन
करी माय बाप प्रेमभरे मन
जावयाचे करुनी लाड कोड
मोडते म्हणे मी त्याची खोड ॥..... 1
भरभरून कौतुक अमाप
प्रेमाने ओसंडे मायबाप
लेकीची नजर ओलावती
पाहून सुंदर ही संस्कृती ॥....2
तीन वर्षाने हा अधिकमास
करी जन्माचे सार्थक खास
दानधर्म अन् पवित्र कार्य
घडवितसे हाती महत्कार्य ॥......3
तीस तीन चे महत्व अमाप
नष्ट व्हावे या जन्माचे पाप
जामात असे विष्णू समान
पूजिता त्यासी मिळे सन्मान ॥......4
तेहतीस वाण अनारशांचे
संगे वस्त्र अलंकार प्रेमाचे
लेकबाळी नेसली साडी-चोळी
रीत निभावुनी माय झाली मोकळी ॥........5
लेक-जावई लक्ष्मीनारायण
भरू दे सुखाने त्यांचे जीवन
मायबापांच्या आशीर्वादाने
फुलू दे नाते प्रेमबंधाने ॥.........6
.........................................................
©पल्लवी उमेश
जयसिंगपूर
