पोरी जरा जपून
पोरी जरा जपून
नको ग पोरी पळू पुढे,
थांब अवचित, बघ मागे,
वाऱ्याची गती पाहून,
पोरी जरा जपून... ॥१॥
संस्कारांचे वारे घरात,
पण पाऊल तुझे दारात,
नको वाहवत जाऊ,
पोरी जरा जपून... ॥२॥
वस्त्रांची तुझी ओळख,
दिली मी संस्कारांनी,
संस्कारास जपत,
पोरी जरा जपून... ॥३॥
शिक्षणाने तुज सावरले,
बुद्धीनेही घडवले,
स्वबळावर उभी तू,
पोरी जरा जपून... ॥४॥
नको करू अहंकार,
नको करू स्वैराचार,
खंबीर चाल पुढे,
पोरी जरा जपून... ॥५॥
विद्वत्तेच्या शिखरावर,
राज्य असे कालांतर,
नको डगमगू तू,
पोरी जरा जपून... ॥६॥
पुरुषांची जात ही न्यारी,
एक नारी तू आजची,
दिव्यदृष्टी जागी ठेव,
पोरी जरा जपून... ॥७॥
अवकाशी भरारी तुझी,
अभिमानास पात्र तू,
पंखात तुझ्या बळ अपार,
पोरी जरा जपून चाल... ॥८॥
– पल्लवी उमेश, जयसिंगपूर
