पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कला मला ती अवगत नाही





कला मला ती अवगत नाही

काय करावे कळतच नाही
थांबवू कसे रडणे बाळाचे
क्षणासाठी दिली जबाबदारी
तरी मला हे जमत का नाही
पण कसे सांभाळत असते ही
कला मला ती अवगत नाही

पहाटे उठून कधी आवरते
सडा रांगोळी कधी घालते
स्वयंपाक करून डबे भरते
नंतर आम्हांस ती उठविते
वेळेचे गणित ही आखते कशी
कला मला ती अवगत नाही

नोकरीवरून येताना रोज घरी
लोकल,बाजारहाट करते अशी
मुलांच्या वेळा ती पाळते कशी
पायाला भिंगरी फिरती तिच्या
होमवर्क घेता स्वयंपाक बनवते
कला मला ती अवगत नाही

रात्री मात्र तयारी उद्याची करते
सासू सासऱ्यांची सेवा ही करते
ओटा आवरून स्वच्छता राखते
पडल्या पडल्या मात्र गाढ झोपते
संसाराचा गाडा सुरळीत हाकते
कला मला ती अवगत नाही

नवदुर्गेचे रूप प्रत्यक्ष हे अवतरले
घर माझे सौभाग्याने उजळविले
तूच सखी, तूच प्रीती,सर्वस्व तूच
गृहलक्ष्मी बनुनी आली स्वामिनी
तुझ्यासारखी तूच असे सखी माझी
तुझ्या कष्टांची जोड मला नाही
संसार सुखाचा करण्याची दृष्टी...
ही कला मला ती अवगत नाही.
...................कला मला ती अवगत नाही........

.............................................................
पल्लवी उमेश
जयसिंगपूर
1 जुलै,2026





पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू