दुखू दे!
दुखू दे!
कधी कधी दुखणंसुद्धा चांगलं असतं,
वेदनांच्या राखेतूनच
नवं जगणं उगवत असतं.
किती दिवस सुखाचे?
त्यातूनही मन भंगलंच असतं,
हसऱ्या चेहऱ्यामागेही
दुःख दडलं असतं.
मित्राच्या नात्यात रक्त कधी आडवं येत नसतं,
भावाचं काय, मित्राचं काय
दोघांच्याही शिरांत
तेच लाल रक्त वाहत असतं.
संकटात जो हात धरून उभा राहतो,
तोच आपला माणूस असतो,
बाकीचं जग तर
स्वार्थापुरतंच जवळ असतं.
रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मैत्रीच नात मनाने जुळत असतं,
ज्याच्या शब्दांत विश्वास असतो,
तेच नातं खरं असतं.
अश्रूंनाही वाहू दे,
मन हलकं होत असतं,
प्रत्येक वेदनेनंतर
आयुष्य नव्यानं फुलत असतं.
म्हणून दुखू दे...
दुःखातूनच माणूस घडत असतो,
सोनं जसं अग्नीत तावून निघतं,
तसंच आयुष्यही उजळत असतं.
दुखू दे!
कधी कधी दुखणंसुद्धा चांगलं असतं,
वेदनांच्या राखेतूनच
नवं जगणं उगवत असतं.
प्रविण ज्यो. तायडे
अमरावती
