आजच जगायचं
आजच होऊया पावसात ओलेचिंब,
नंतर कुठली श्रावणसरी, नंतर कुठला थेंब.
क्षणाक्षणात भरूया आनंदाचे रंग,
उद्याचा काय भरवसा? आजच होऊया दंग.
हातात हात तुझा घेऊन,
खूप दूर आता चालायचं;
मग नको अपूर्ण स्वप्न,
मग नको विरहाचं जळणं.
बनुनी मेघ नभी उडून जाऊया लांब.
नंतर कुठली श्रावणसरी, नंतर कुठला थेंब.
श्वासात श्वास असेपर्यंत
प्रेमातच जगायचं;
उद्यावर नको ढकलू आयुष्य,
आजच भरभरून जगायचं.
जाणे एकट्याचे जरी, असावा तरी तुझाच संग.
नंतर कुठली श्रावणसरी, नंतर कुठला थेंब.
आजच होऊया पावसात ओलेचिंब,
नंतर कुठली श्रावणसरी, नंतर कुठला थेंब.
प्रविण ज्यो. तायडे
अमरावती
